अगस्त्य तारा : दक्षिण खगोलार्धात नौका (आरगो नेव्हिस) किंवा (कॅरिना) या तारकासमूहातील अगस्त (कॅनोपस) हा मुख्य तारा आहे म्हणून याला कॅरिनातील ‘आल्फा’ असेही म्हणतात. या तार्यामची दक्षिणक्रांती 530 व विषुवांश सुमारे ६ ता. २० मि. आहेत [→ क्रांति विषवांशु]. त्यामुळे ज्या स्थळाचे उत्तर अक्षांश ३७ पेक्षा जास्त आहेत तेथून हा तारा दिसत नाही. भारतात सर्व ठिकाणांहून दिसू शकतो, मात्र क्षितिजापासून फार वर दिसत नाही. पुणे-मुंबई विभागात त्याचे अधिकतम ⇨ उन्नतांश फेब्रुवारीत रात्री आठ-नऊ वाजण्याच्या सुमारास तो याम्योत्तर वृत्ताच्या आसपास असताना असतात. ईजिप्तमधील अलेक्झांड्रिया शहराजवळ कॅनोपस गाव आहे, त्यावरून कॅनोपस हे नाव पडले असण्याची शक्यता आहे. ३१ उत्तर अक्षांशवर अलेक्झांड्रिया या शहरी हा तारा दक्षिणेकडे उगवला की थोड्याच वेळात (दक्षिणेकडेच) मावळतो, तसेच थोड्या उत्तरेकडील अथेन्स शहरी तो दिसतच नाही, हे पूर्वी लक्षात आलेले होते.

अगस्त हा तारा महत्तम’[→ तारा] या प्रकारात मोडतो. त्याचा व्यास सूर्याच्या १३४ पट, पृष्ठफळ १९,००० पट, घनफळ २४,२०,००० पट व अंगभूत दीप्ती २००० पट आहे. आकाशातील सर्व ताऱ्यांत व्याध हा तारा सर्वाधिक तेजस्वी असून तेजस्वीपणात दुसरा क्रमांक अगस्त्याचा लागतो. त्याची ⇨प्रत-०·८६ इतकी आहे. सूर्यापासून त्याचे अंतर ९८ प्रकाशवर्षे आहे. अगस्त्याचा वर्णपट वैशिष्ट्यपूर्ण आहे. हा तारा पिवळट रंगाचा आहे. पृथ्वीच्या वातावरणातील प्रक्षोभामुळे त्याचे प्रकाशमान व रंग सारखे बदलत असतात व त्यात निळ्या व लाल रंगांच्या छटा येतात.  

तलाव, नद्या, विहिरी यांचे पाणी अगस्त्योदय झाला म्हणजे निवळू लागते म्हणून त्याला भारतात ‘जलशोधक’ म्हणण्याचा प्रघात आहे. साधारणपणे ऑगस्टाच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते मेच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत हा तारा केव्हा ना केव्हा तरी, रात्री वा पहाटे दक्षिण आकाशात कोठे ना कोठे दिसतो. इतर वेळी दिसत नाही. पुराणातील अगस्त्य ऋषींच्या नावावरून या ताऱ्यास हे नाव पडले आहे.

फडके, ना.ह.