मृगशीर्ष : (मृग, ओरायन). भारतीय २७ नक्षत्रांतील पाचवे नक्षत्र. याचे दोन चरण वृषभ व दोन मिथुन राशींत येतात. या नक्षत्राचा निम्मा भाग खगोलीय विषुववृत्ताच्या उत्तरेस व बाकी दक्षिणेस आहे. भारतात या नक्षत्राचा आकार हरणासारखा कल्पिला आहे. पायांचे चार, शीर्षाचे तीन, शेपटीचे तीन व पोटात घुसलेल्या बाणाचे तीन असे याचे लहानमोठे तेरा मुख्य तारे असून हरणाचा पुढचा डावा खूर व मागील उजवा खूर दाखविणारे तारे ठळक आहेत. बाणाची रेषा आग्नेयीस वाढविल्यास त्या रेषेवर व्याध हा मोठा तारा लागतो व या व्याधाने हरणास बाण मारला आहे, अशी कल्पना आहे. पाश्चात्य देशांत या तारकासमूहाचा आकार ओरायन नावाच्या योध्दयाचा असल्याची कल्पना आहे व यातील ताऱ्यांची संख्याही वेगळी आहे. वरचे दोन तारे त्याचे खांदे, खालचे दोन तारे हे पाय, जवळजवळ खगोलीय विषुववृत्तावर असलेले मधले तीन तारे कमरपट्टा, त्या खालील तीन तारे खड्‌ग, उत्तरेकडील ४ वा ५ तारे म्हणजे सोटा (गदा), पश्चिमेकडील पाच तारे मिळून ढाल अशा वर्णनाचा योद्धा कल्पिला आहे.

खगोलीय विषुववृत्तावर होरा ५ ता. ३० मि. [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] च्या आसपास हा तारकासमूह असून तो सहज डोळ्यात भरणारा व सुंदर आहे. हा हिवाळ्यात रात्रभर दिसू शकतो व जानेवारीत रात्री ९ च्या सुमारास खस्वस्तिकी (निरीक्षकाच्या थेट माथ्यावर) येतो. याचे शास्त्रीय स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. ईशान्येस आल्फा (कांक्षी वा बेटलज्यूझ), नैर्ऋत्येस बीटा (रीगेल), वायव्येस गॅमा (बेलाट्रिक्स) व आग्नेयीस कापा (सेफ) या ताऱ्यांचा मोठा आयत बनला असून त्याच्या मध्यभागी समान अंतरावर, सरळ रेषेत पूर्वेकडे झीटा (अलनिकट), मध्ये एप्सायलॉन (अलनिलम) व पश्मिमेकडे डेल्टा (मिंटाफा) असे तीन तारे आहेत. एप्सायलॉनच्या दक्षिणेस सी, थीटा आणि आयोटा उत्तरेस लँब्डा, फाय, फाय ईशान्येस क्साय, काय, काय व न्यू आणि पश्चिमेस ओमिक्रॉन – २, पाय, पाय, पाय व पायहे व अन्य मंद तारे आहेत. यातील काही महत्त्वाच्या ताऱ्यांची विशेष माहिती पुढे दिली आहे. या तारकासमूहातील सर्वांत तेजस्वी ताऱ्यांचा उपयोग अन्य ताऱ्यांच्या व तारकासमूहांच्या स्थानांचे दिग्दर्शन करण्यासाठी संदर्भ म्हणून होतो.

(१)आल्फा ओरिऑनिस : (कक्ष). याचा वर्णपटीय प्रकार M2 Ib असून रंग गडद नारिंगी आहे. हा चल तारा असून ५·७५ वर्षांच्या दीप्तीच्या आवर्तन कालावधीत याच्या दृश्य प्रतिमध्ये [→प्रत] ०·४ पासून १·३ पर्यंत चढ-उतार होत असतात. याची निरपेक्ष प्रत  −७·९ आहे. याचा व्यास सूर्याच्या व्यासाच्या ३०० ते ४८५ पट (आकारमान सु. अकरा कोटीपट) वाढतो. याचे वस्तुमान सौर वस्तुमानाच्या पाचपट (काहींच्या मते १५ ते २० पट) असून याची घनता सूर्याच्या घनतेच्या एक चौदा लक्षांश आहे. हा सु. ६५० प्रकाशवर्षे अंतरावर असून याचे तापमान ३,००० के आढळले आहे. याची दीप्ती सूर्याच्या एक लक्षपट आहे. इ. स. पू. पहिल्या शतकात चिनी ऐतिहासिक कागदपत्रांत कांक्षी हा तारा पिवळ्या रंगाचा होता, असा उल्लेख आहे. ताऱ्यांच्या उत्क्रांतीत त्याचा रंग निळा, पांढरा, पिवळा व तांबडा या क्रमाने बदलतो. चिनी उल्लेखानुसार कांक्षीचा रंग गेल्या २,००० वर्षांत पिवळ्यापासून तांबडा झाला असून आकार दुप्पट झाला आहे. यावरून तो तरुण राक्षसी तांबडा तारा आहे, असा निष्कर्ष निघतो.

(२)बीटा ओरिऑनिस : (राजन्य). याची दृश्य प्रत ०·१०, निरपेक्ष प्रत – ८·२ व वर्णपटीय प्रकार B8 Ia असून हा सु. ८०० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. पांढऱ्या निळसर रंगाच्या या ताऱ्याची दीप्ती सूर्याच्या १५० सहस्त्रपट असून त्याचा दूर जाण्याचा वेग सेकंदाला २० किमी. पर्यंत असल्याचे आढळले आहे.

(३)गॅमा ओरिऑनिस : वर्णपटीय प्रकार B2 III असलेला हा तारा २४० प्रकाशवर्षे अंतरावर आहे. याची दृश्य प्रत १·६५ आहे.

(४)एप्सायलॉन ओरिऑनिस : या निळसर ताऱ्याची दृश्य प्रत १·७ आहे. हा सूर्याच्या ६०० पट तेजस्वी, दहापट आकारमानाचा, वीसपट घनतेचा असून ह्याचे तापमान सूर्याच्या तापमानाच्या चौपट असावे.

(५)थीटा ओरिऑनिस : हे ताऱ्यांचे बहुकूटक (तीनापेक्षा अधिक ताऱ्यांनी बनलेला गट) असून यातील ६,७, ७·५ व ८ या प्रतींच्या चार ताऱ्यांनी बनलेली आकृती समलंब चौकोन ‘ट्रॅपिझियम’ म्हणून प्रसिद्ध आहे. हा सुप्रसिद्ध चौकोन मृग अभ्रिकेच्या मध्यभागी दिसतो व यामुळेच ही अभ्रिका चकाकते असे मानतात.


(६)झीटा ओरिऑनिस : १०० प्रकाशवर्षे दूर असलेल्या या त्रिकूटाची (तीन ताऱ्यांच्या बनलेल्या गटाची) दृश्य प्रत १·७ आहे. याच्या किंचित दक्षिणेला सुप्रसिद्ध अश्वशीर्ष अभ्रिका असून ही नुसत्या डोळ्यांनी दिसू शकते.

यांशिवाय या तारकासमूहात डेल्टा, आयोटा, लँब्डा ओरिऑनिस इ. अनेक तारकायुग्म (ताऱ्यांच्या जोड्या), कित्येक तारकागुच्छ व अभ्रिका येतात. सिग्मा ओरिऑनिस हे सुंदर बहुकूटक असून यातील चार सहचर तारे १० प्रतिपेक्षा अधिक तेजस्वी आहेत. यातील आठ तारे ६ सेंमी. व्यासांच्या दुर्बिणीतून दिसू शकतात.

या तारकासमूहावरून वर्णपटीय B प्रकारच्या ताऱ्यांना ओरायन प्रकारचे तारे असेही म्हणतात. ओरिऑनिड नावाने ओळखल्या जाणाऱ्या उल्कावृष्टीचा उद्‌गमबिंदू या नक्षत्रात असून ही वृष्टी २२ ऑक्टोबरच्या सुमारास रात्री नुसत्या डोळ्यांनी दिसते. या वेळी सामान्यतः तासाला २० उल्का पडताना दिसतात. या उल्कावृष्टीचा संबंध हॅली या धूमकेतूच्या कक्षेशी असल्याचे आढळले आहे. 

वेदांचे प्राचीनत्व दर्शविण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ओरायन नावाचा एक संशोधनपर प्रबंध लिहिलेला आहे. ऋग्वेदातील काही ऋचांचा आधार घेऊन वेदकाली वर्षारंभीचा सूर्य मृग नक्षत्रात होता, असे त्यांनी त्या प्रबंधात दाखविले आहे. सध्या तो मीन राशीअखेर असतो. वसंत संपातबिंदूची वक्री गती (सु. ७२ वर्षांत १ अंश पश्चिमेस होणारी गती) विचारात घेऊन व इतर माहितीचा आधार घेऊन या ऋचा इ. स. पू. ४००० वर्षे या कालानंतर लिहिलेल्या असणे शक्य नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे. 

फलज्योतिष व धार्मिक विधींच्या दृष्टीने या नक्षत्राची देवता सोम मानली आहे. हे नक्षत्र मृदू, तिर्यङ्‌मुख व क्लीब आहे, असे समजतात. मैत्री व शुभकार्यास हे नक्षत्र चांगले असून या नक्षत्रावर जन्मलेली व्यक्ती गुणी, विनयशील, प्रेमळ व सन्मार्गी असते, असे मानलेले आहे.

मृगातील अभ्रिका : (एनजीसी १९७६, एम ४२). ही सुप्रसिद्ध सुंदर तेजोमय अभ्रिका उत्सर्जन प्रकारची [→ अभ्रिका] असून हिची दृश्य प्रत ४ आहे. योद्ध्याच्या तलवारीच्या प्रदेशांकडे नुसत्या डोळ्यांनी पाहिले असता ही अंधुकशी दिसते. हिचा विस्तार २० प्रकाशवर्षे असून ती पृथ्वीपासून १,६०० प्रकाशवर्षांहून अधिक अंतरावर आहे. हायड्रोजन आयनांचे (विद्युत् भारित अणूंचे) समूह किंवा ढग असलेल्या आकाशातील प्रदेशांपैकी पृथ्वीला सर्वांत जवळ असलेला हा प्रदेश आहे. मृग अभ्रिका ही आकाशातील सर्वांत मोठी व फार क्रियाशील अभ्रिका नसली, तरी पृथ्वीला जवळ असल्यामुळे अभ्रिकांच्या अभ्यासाच्या दृष्टीने तिचे विशेष महत्त्व आहे. 

तेजस्विता, वर्णपटांतील ठळक रेषा व निळसर प्रकाश यांनी O आणि B वर्गांतील तारे सहज ओळखता येतात. ते उच्च वस्तुमानाचे असल्यामुळे त्यांचे एकंदर आयुष्य कमी असते. त्यामुळे हे तारे जेव्हा एखाद्या तारकागुच्छात आढळतात तेव्हा ते अलीकडील काळात म्हणजे सु. गेल्या काही कोटी वर्षांत निर्माण झाल्याचे समजते. असे तारे मृग नक्षत्रात बहुसंख्येने असून योद्ध्याच्या पट्ट्यांतील व तलवारीतील तारे या काळात निरनिराळ्या वेळी जन्मास आलेले असावेत. मृग अभ्रिकेतील उत्तेजित वायू, ढग व त्यांतील तप्त तरूण तारे यांचे साहचर्य लक्षात घेतल्यास तेथील ताऱ्यांचा जन्म गेल्या दशलक्ष वर्षांपेक्षाही कमी काळातील असावा आणि त्या प्रदेशात नवीन तारे निर्माण होत असावेत, असे दिसते. त्यामुळे हे नक्षत्र ताऱ्यांचे संवर्धन करणारे आकाशगंगेतील मोठे क्षेत्र आहे, असे मानण्यात येते. 

हायड्रोजन रेणूंच्या थंड ढगांच्या अंतर्भागातील घडामोडींची माहिती साध्या प्रकाशीय दुर्बिणींद्वारे मिळू शकत नाही. त्यांच्या अभ्यासासाठी रेडिओ दूरदर्शक, व्यतिकरणमापक, वर्णपटमापक, पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असलेल्या अवकाश प्रयोगशाळा वगैरेंचा वापर करावा लागतो. या प्रकारे केलेल्या निरीक्षणांद्वारे वरील O व B ताऱ्यांविषयींच्या निष्कर्षांना पुष्टी मिळाली आहे. 

नेने, य. रा. ठाकूर, अ. ना.