ह्यूइश, अँटनी : (११ मे १९२४). ब्रिटिश खगोल भौतिकीविद. ३ मिमी. ते ३० मी. तरंगलांबी असलेल्या रेडिओ तरंगांचे ठराविक कालखंडाने पृथक् पृथक् स्पंदांच्या रूपात उत्सर्जन करणाऱ्यापल्सार(पल्सेटिंग रेडिओस्टार) ताऱ्यांचा शोध लावल्याबद्दल त्यांना रेडिओ ज्योतिषशास्त्रज्ञसर मार्टिन राइल यांच्याबरोबर १९७४ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. निरीक्षणात्मक ज्योतिष-शास्त्रातील संशोधनाला यामुळे प्रथमच नोबेल पारितोषिक मिळाले.

ह्यूइश यांचा जन्म इंग्लंडमधील फॉई (कॉर्नवॉल) या गावी झाला. त्यांचे उच्च शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज येथे झाले व १९४६ मध्ये ते तेथील राइल यांच्या नेतृत्वाखालील रेडिओ ज्योतिषशास्त्रविषयक गटात दाखल झाले. १९७१–८९ या काळात ह्यूइश केंब्रिजमधील कॅव्हेंडिश लॅबोरेटरीमध्ये रेडिओ ज्योतिषशास्त्र या विषयाचे प्राध्यापक होते. नंतर ते तेथे गुणश्री प्राध्यापक झाले. त्या आधी १९६७ साली ते या विद्यापीठातील मूलार्ड रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी येथील संशोधन प्रकल्पाचे मार्गदर्शक होते, तेव्हा पदवीधर साहाय्यक जोसिलीन बेल यांनी केलेल्या एका निरीक्षणाचे महत्त्व ह्यूइश यांच्या लक्षात आले. बेल यांनी नियमित अशा आकृतिबंधातील रेडिओ संकेत किंवा स्पंद ओळखून काढले होते. हे स्पंद पार्थिव व्यत्ययांमुळे (पृथ्वीवरील अडथळ्यांमुळे) किंवा काहींच्या अटकळींनुसार अगदी दूरच्या ग्रहांशी संदेशवहन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रज्ञावंत जीवरूपांमुळे निर्माण होत नाहीत, असे ह्यूइश यांनी निश्चितपणे ठरविले आणि हे स्पंद म्हणजे विशिष्ट ताऱ्यांकडून होणारी ऊर्जेची उत्सर्जने आहेत, हे त्यांनी निश्चित केले. तसेच त्यांनी सौरवाताचे जमिनीवरून मापन केले आणि सौर ध्रुवापासूनच्या त्याच्या वर्धित गतीचा शोध लावला.

ह्यूइश यांचे संशोधनपर अनेक लेख विविध ज्ञानपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. ते मूलार्ड रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरीचे प्रमुख (१९८२–८८) आणि बेल्जियन रॉयल ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस (१९८९) व ॲकॅडेमिया यूरोपिया (१९९६) यांचे सदस्यत्त्व होते. ते इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे परदेशी फेलो, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे परदेशी सन्मानीय सदस्य (१९७७) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे सन्माननीय फेलो (१९८५) होते.

ह्यूइश यांना केंब्रिज विद्यापीठाचे हॅमिल्टन पारितोषिक (१९५१), रॉयल ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे एडिंग्टन पदक (१९६८), इंटरनॅशनल यूनियन ऑफ रेडिओ सायन्सेसचे डेलिंजर पदक (१९७२), केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे हॉपकिन्स पारितोषिक (१९७२), रॉयल सोसायटीचे ह्यूझ पदक (१९७७), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे वैनू बाप्पू पारितोषिक (१९९८) इ. मानसन्मान मिळाले.

 

पहा : पल्सार रेडिओ ज्योतिषशास्त्र.

ठाकूर, अ. ना.