कॅस्टर : (कश, आल्फा जेमिनोरम). पुनर्वसू नक्षत्रातील उत्तरेकडील दोन तेजस्वी ताऱ्यांपैकी पश्चिमेकडचा कमी तेजस्वी तारा. विषुवांश होरा ७ ता.२९ मि., क्रांती + ३२० [→ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धती], प्रत १⋅५ प्रत अंतर ४५ प्रकाशवर्षे. कॅस्टर व पॉलक्स ही ग्रीक पुराणातील जुळ्या मुलांची नावे आल्फा व बीटा जेमिनोरम यांना दिलेली आहेत.ही नावे दिली त्यावेळी कॅस्टर पॉलक्सपेक्षा जास्त तेजस्वी होता म्हणून तो आल्फा ठरविला, पण तेव्हापासून कॅस्टरची दीप्ती कमी झाली. कॅस्टर तारा दृश्य तारकायुग्म (प्रदक्षिणाकाल ३५० वर्षे) असून यातील प्रत्येक घटक वर्णपटदर्शी (वर्णपटाच्या निरीक्षणानेच युग्म आहे असे ओळखता येणारे)युग्म आहे. शेजारीच आणखी एक अंधुक तारकायुग्म आहे.

फडके, ना. ह.