कार्यक्षमता, यंत्रांची : कोणत्याही यंत्रापासून कार्य मिळविण्यासाठी त्या यंत्राला बाहेरून शक्तीचा पुरवठा करावा लागतो. यंत्राला पुरविलेल्या या शक्तीला आदान शक्ती म्हणतात. या शक्तीपैकी काही भाग यंत्राच्या निरनिराळ्या भागांमध्ये होणाऱ्या घर्षणात खर्च होतो व बाकीची शक्ती उपयुक्त कार्य करते. या उपयुक्त शक्तीस प्रदान शक्ती म्हणतात. या दोन शक्तींच्या गुणोत्तरास यंत्राची कार्यक्षमता (काक्ष.) म्हणतात.

यंत्राची काक्ष.=

प्रदान शक्ती

आदान शक्ती

=

प्रदान शक्ती

प्रदान शक्ती + घर्षणात वाया जाणारी शक्ती

कार्यक्षमता नेहमी अर्थातच एकापेक्षा कमी असते. ती शतमानातही देण्याची पद्धत आहे. एंजिनांच्या संबंधात उपयुक्त अश्वशक्ती व निर्देशित अश्वशक्ती यांच्या गुणोत्तरास यांत्रिक काक्ष. म्हणतात. याच धर्तीवर ऊष्मीय काक्ष., विद्युतीय काक्ष. इ.संज्ञा प्रसंगानुसार वापरल्या जातात.

वैद्य, ज.शि.