पेन्सिल : प्रामुख्याने कागदावर लिहिण्यासाठी, आरेखनासाठी वा रेखाटनासाठी वापरण्यात येणाऱ्या आणि लाकूड, धातू वा प्लॅस्टिक यांच्या दंडगोलाकार अथवा इतर आकाराच्या संरक्षक कवचाने लेखनासाठी वा अन्य कामासाठी प्रत्यक्ष वापरावयाचा पदार्थ (उदा., ग्रॅफाइट) वेष्टित केलेला असतो अशा साधनाला पेन्सिल असे म्हणतात. विशिष्ट प्रकारच्या पेन्सिलींचा उपयोग धांतूवर, काचेवर व प्लॅस्टिकवर खुणा करण्यासाठीही करण्यात येतो. स्लेट पाटीवर लिहिण्याच्या पेन्सिलींना सामान्यत: कवच नसते. तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये कुंकू, भुवया कोरण्याचे साहित्य इत्यादींत विशिष्ट पेन्सिलींचा वापर करण्यात येतो.

इतिहास : ईजिप्शियन व रोमन लोक प्राचीन काळी लेखनासाठी शिसे असलेल्या पेन्सिली वापरीत असत, असे उल्लेख आढळतात. मध्ययुगात शाईने कागदावर खुणा करण्यासाठी penicillus नावाचा ब्रश वापरीत असत. या लॅटिन शब्दाचा अर्थ लहान शेपटी असा आहे. या शब्दाचा अपभ्रंश होऊन पेन्सिल हा शब्द तयार झाला आणि मराठी भाषेत तोच रूढ झाला आहे. पंधराव्या शतकात इटलीत कथिल व शिसे यांच्या मिश्रधातूपासून तयार केलेल्या दंडगोलाकार तुकड्याचा (सिल्व्हर पॉइंट) वापर लिहिण्यासाठी वा आरेखनासाठी करीत असत. अशा साधनाच्या कागदावरील खुणा खोडण्यासाठी पावाच्या तुकड्याचा उपयोग करीत. इ. स. १४०० च्या सुमारास बव्हेरियामध्ये ग्रॅफाइटाचा शोध लागला त्या वेळी त्याला प्लंबॅगो (किंवा ब्लॅक लेड-काळे शिसे) म्हणजे शिशाप्रमाणे कार्य करणारा हे नाव देण्यात आले (आधुनिक पेन्सिलीत ग्रॅफाइट वा अन्य पदार्थ वापरण्यात येत असला, तरी सर्वसामान्य भाषेत त्याचा उल्लेख पेन्सिलीचे शिसे असाच करण्यात येतो आणि अशा पेन्सिलीला शिसपेन्सिल-लेड पेन्सिल – असेच महणण्यात येते). ग्रॅफाइट हे नाव पुढे १७८९ मध्ये ए. जी. व्हेर्नर यांनी graphein (म्हणजेलिहिणे) या ग्रीक शब्दावरून दिले. १५६४ मध्ये इंग्लंडमधील कंबर्लंडभागातील बॉरोडेल येथे अतिशय शुद्ध ग्रॅफाइटाचे साठे सापडले त्यामुळे आधुनिक पेन्सिलीचा उदय होण्यास मोठी चालना मिळाली. या ग्रॅफाइटाचा उपयोगकरूनतयार केलेलेआधुनिक पेन्सिलीचे पूर्वस्वरूप म्हणतायेईल असे साधन प्लंबॅगो या नावाने लोकप्रिय होते. हे साधन सुरुवातीला नुसत्या तुकड्याच्या स्वरूपातील ग्रॅफाइटाचे आणि नंतर योग्य आकार दिलेल्या काड्यांमध्ये ग्रॅफाइटाचा तुकडा ठेवून व भोवती दोरा गुंडाळून तयार केलेले असे. जरूरीप्रमाणे दोरा उलगडावा लागत असे. १५६५ मध्ये कोनराट फोन गेस्नर यांनीDe omni rerum fossilium genereया आपल्या पुस्तकात लाकडी धारकामध्ये घातलेल्या ग्रॅफाइटाच्या साधनाचा उल्लेख केलेला आढळतो. ग्रॅफाइटाचे तुकडे पिसांच्या पोकळ भागात, नळ्यांत किंवा धातूच्या धारकांत वापरण्याची पद्धत नंतर प्रचारात आली. नंतरच्या काळात हे ग्रॅफाइट दुर्मिळ झाल्यामुळे ग्रॅफाइटाच्या चूर्णाला डिंक, रेझिने, सरस व इतर आसंजक (चिकटविणाऱ्या) पदार्थांच्या साहाय्याने वापरण्यायोग्य आकार देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. दरम्यान बव्हेरिया, श्रीलंका, कोरिया, मेक्सिको व मॅलॅगॅसी (मादागास्कर) येथे ग्रॅफाइटाचे साठे सापडले. १६६२ मध्ये जर्मनीतील न्यूरेंबर्ग येथे ग्रॅफाइटयुक्त शिसे तयार करण्यात आले. १७६१ मध्ये कास्पार फाबर यांनी असे शिसे असलेल्या पेन्सिली तयार करण्याचा कारखाना सुरू केला. या शिशात गंधक व ग्रॅफाइट हे १ : २ या प्रमाणात होते. १६८३ मध्ये फर किंवा सीडार झाडाचे लाकूड शिशावर कवच म्हणून वापरून व लाकडाच्या कवचाचे भाग सरसाने एकमेकांना चिकटवून पेन्सिल तयार करण्याच्या पद्धतीचे जे. पेट्टस यानी प्रथम वर्णन केले. या पद्धतीने इंग्लंडमध्ये १७८९ मध्ये पेन्सिली तयार होऊ लागल्या. युद्धामुळे अठराव्या शतकात इंग्लंडमधून फ्रान्समध्ये पेन्सिलींची होणारी आयात मंदावली व पेन्सिलीचे शिसे फ्रान्समध्ये तयार करण्याचे काम नेपोलियन बोनापार्ट यांनी एन्. जे. काँते यांच्याकडे सोपविले. त्यांनी ग्रॅफाइट व मृत्तिका एकत्र दळून त्यापासून शिशाच्या कांड्या केल्या व त्या भट्टीत भाजल्या. भाजलेली कांडी कांडीच्या व्यासाइतक्या व्यासाच्या अर्धवर्तुळाकृती खाचा असलेल्या लाकडी कवचांत बसवून कवचाचे दोन भाग सरसाने चिकटवून पेन्सिल तयार केली. याच सुमारास जोसेफ हार्डमथ यांनी काँते यांच्या पद्धतीप्रमाणेच पण स्वतंत्र रीत्या व्हिएन्ना येथे पेन्सिल तयार केली आणि मृत्तिकेच्या प्रमाणात बदल करून निरनिराळ्या कठिणतेचे शिसे तयार केले. काँते यांच्या पद्धतीत पुढे सुधारणा होऊन पेन्सिल तयार करण्याची आधुनिक पद्धत प्रचारात आली. १८३९ मध्ये योहान लोटा फोन फाबर यांनी काँते यांच्या पद्धतीत सुधारणा केल्या. शिशाच्या लगद्यावर दाब देऊन साच्यातून बहि:सारण पद्धतीने शिसे तयार करणे व यंत्रांच्या साहाय्याने कवचाकरिता लागणाऱ्या लांब पट्ट्या कापून त्यांना खाचा पाडणे. या त्यांच्या महत्त्वाच्या सुधारणा होत. १८५७ मध्ये कार्ल पुशर यांनी कॉपिंग पेन्सिलीचे शिसे तयार केले. यांत रंजकद्रव्य असून असे शिसे भाजत नाहीत.

 

जॉन डिक्सन यांनी अमेरिकेत १८२७ मध्ये पेन्सिली तयार करण्यास सुरुवात केली. विल्यम मन्‍रो या पेन्सिल उत्पादकांच्या वुड या सहकाऱ्यांनी पेन्सिल निर्मितीसाठी प्रथम यंत्रे वापरली. १८७६ मध्ये चौरस छेदाऐवजी गोलाकार छेदाचे शिसे प्रचारात आले. इंग्लंडमध्ये १८४६ मध्ये व्हार्निश दिलेल्या पेन्सिली तयार होऊ लागल्या. १९३० नंतरच्या दशकात शिसे कवचाला मजबूतपणे धरून राहील अशा प्रकारे पेन्सिली तयार करण्यात येऊ लागल्या व त्यामुळे पेन्सिलीचे टोक वारंवार मोडण्याचे प्रमाण कमी झाले.

फ्रेंच ॲकॅडेमीच्या १७५२ च्या अहवालात मॅगेलन नावाच्या गृहस्थांनी पेन्सिलीच्या खुणा खोडण्यासाठी पावाच्या तुकड्याऐवजी काउचुकचा (रबराचा) उपयोग करावा असे सुचविले. रबर हा शब्द १७७० मध्ये जोसेफ प्रीस्टली यांनी रबराच्या या उपयोगावरूनच प्रचारात आणला. आधुनिक खोडरबरात व्हल्कनीकरण केलेले (गंधकाची प्रक्रिया केलेले) वनस्पतिज तेल, पमीस दगडाची बारीक पूड गंधक यांचे रबराने बंधित केलेले मिश्रण असते. एका टोकास खोडरबर बसविलेल्या पेन्सिलीचे एकस्व (पेटंट) १८५८ मध्ये अमेरिकेत देण्यात आले.

 

मॉडर्न व हॉकिन्झ यांनी १८२२ मध्ये यांत्रिक पेन्सिल प्रथम प्रचारात आणली. ए. टी. क्रॉस यांनी एक यांत्रिक पेन्सिल तयार केली आणि मोठ्या व्यासाच्या शिशाच्या यांत्रिक पेन्सिलीचे एकस्व १८७७ मध्ये देण्यात आले. या पेन्सिलीतील शिसे स्प्रिंगच्या दाबाखालील जबड्यांत बसविलेले असे. १८९५ मध्ये धारक टोपण फिरवून लहान व्यास असलेले शिसे पुढे आणण्याची यांत्रिक योजना वापरात आली. सुरुवातीस यांत्रिक पेन्सिलींसाठी कोणत्याही व्यासाचे शिसे वापरीत असत पण नंतर ०.०४६ इंच (१.१६८ मिमी.) व्यासाचे शिसेबहुतेक ठिकाणी प्रमाणभूत मानण्यात येऊ लागले. १९३८ मध्ये ०.०३६ इंच (०.९१४ मिमी.) व्यासाचे शिसे प्रचारात आले. १९५० नंतरच्या दशकात बॉल-पॉइंट पेन्सिली वापरात आल्या. बॉल-पॉइंट पेन्सिल व बॉल-पॉइंट पेन यांतील मुख्य फरक म्हणजे बॉल-पॉइंट पेन्सिलीच्या खुणा खोडता येतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आरेखनासाठई यांत्रिक धारकयुक्त पेन्सिलींचा वापर वाढत्या प्रमाणात होऊ लागला. या पेन्सिलींत स्क्रूने घट्ट करता येणाऱ्या पकडीची जागा धारकाच्या वरच्या टोकावर दाबून कार्यान्वित करता येणाऱ्या स्प्रिंगयुक्त जबड्यांनी घेतली. यांत्रिक पेन्सिलींच्या अभिकल्पाबाबत (आराखड्याबाबत) अनेक एकस्वे देण्यात आलेली असून अशा पेन्सिलींचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.


इ. स. १९५९ मध्ये लाकडी पेन्सिलींचे जागतिक उत्पादन २,५०,००,००० ग्रोस झाले (१ ग्रोस = १४४ नग). त्यापैकी अमेरिकेत १,००,००,००० ग्रोस झाले. त्याखालोखाल जर्मनी, जपान व रशिया या देशांत उत्पादन झाले.

 

कच्चा माल : पेन्सिल निर्मितीसाठी मुख्यत: कवचाकरिता लाकूड,  धातू,  प्लॅस्टिक  आणि  शिशासाठी  ग्रॅफाइट  व मृत्तिका यांची  गरज असते. कॅलिफोर्नियन इन्सेन्स सीडार (लिबोसेड्रस डेक्यूरेन्स) व रेड सीडार (जूनिपेरस व्हर्जिनियाना) यांचे लाकूड सामान्यत: वापरले जाते. तथापि स्थानिक परिस्थितीनुसार उपलब्ध झाडांचे लाकूडही वापरले जाते. ८५% कार्बन असलेले ग्रॅफाइट चांगले समजण्यात येते. ग्रॅफाइटाबरोबर मिसळावयाची मृत्तिका स्थानिक परिस्थितीनुसार वापरतात. तयार झालेल्या पेन्सिलींवर अंतिम संस्कार करण्यासाठी लॅकर, रंगद्रव्ये, मेणे, वसाम्ले, तेले, सरस इत्यादींची आवश्यकता असते.

लेखनाच्या पेन्सिली

 

प्रत :काळे शिसे तयार करताना वापरण्यात येणाऱ्या ग्रॅफाइट व मृत्तिका यांच्या प्रमाणावर पेन्सिलीची प्रत अवलंबून असते. बी(B) या अक्षराने दर्शविलेल्या प्रतीची पेन्सिल मऊ असून एच्. (H) या अक्षराने दर्शविलेल्या  कठीण  असतात.  पेन्सिलींच्या  प्रती  ८ बी ते १० एच् यांच्या दरम्यान असून एकूण प्रतींची संख्या २० आहे. एफ् ही प्रतदोन्हींच्या मधली असते. सामान्यत: ८ बी ते एफ् पर्यंतच्या पेन्सिली मऊ असून त्या चित्रकलेसाठी वापरतात. यात ग्रॅफाइटाचे प्रमाण जास्त असते. एच् बी ते १० एच् च्या पेन्सिली कठीण असतात. यांचा उपयोग आरेखनासाठी करतात. ९ एच्. १० एच् ह्या पेन्सिली दगड. ॲल्युमिनियम इत्यादींवरील आरेखनासाठी वापरतात. त्यांत मृत्तिकेचे प्रमाण जास्त असते. लिहावयाच्या पेन्सिली ३ बी ते ३ एच् पर्यंतच्या असतात. त्यांना काही वेळा १, २, २ १/२, ३, ४ असे क्रमांक देण्यात येतात. 

 

पेन्सिलीच्या खुणेचा गडदपणा हा शिशाने केलेल्या खुणेतील कणांचे आकारमान व संख्या यांवर अवलंबून असतो, तर शिशाचा कठीणपणा हा कागदाच्या तंतूंकडून शिशाचे अपघर्षण (घासल्याने व खरवडल्याने झीज होणे) किती प्रमाणात रोखले जाते यावर अवलंबून असते.

 

निर्मिती : काळ्या पेन्सिलींचे शिसे तयार करण्यासाठी प्रथम मृत्तिका व ग्रॅफाइट एकत्रित दळून (क्वचित ओलसर स्थितीतही) पाण्यात मिसळतात. त्यांचे चांगले मिश्रण करून ते चांगले मळून घट्ट राडा तयार करतात. नंतर तो राडा बहिःसारण दाबयंत्राच्या दंडगोलात भरतात. या दंडगोलाला लहान भोक असलेली एक मुद्रा (डाय) बसविलेली असते व ती हिरा, नील, अकीक (अँगेट) अथवा सिमेंटेड कार्बाइड याची बनविलेली असते. राडा दाबल्यास मुद्रेच्या भोकातून शिशाची अखंड कांडी मिळते. ही कांडी पेन्सिलीच्या लांबीएवढी (सु. १८ सेंमी.) तोडून तुकडे करतात व ते वाळवितात. नंतर ते ८७१ º -१,२०४ º से तापमान असलेल्या भट्टीत भाजतात. सामान्यत: तापमान १,०३७ º-१,०९३º से. एवढे ठेवतात. भाजलेले ठिसूळ शिसे नंतर वसा (स्निग्ध पदार्थ), वसाम्ले व मेण (किंवा मेणाशिवायही) यांच्या मिश्रणात भइजवितात. जादा मेण काढण्यासाठी शिशावर रासायनिक क्रिया करतात. लाकडाच्या कवचात घालावयाचे शिसे हे सामान्यत: १.८ मिमी. ते ४.३ मिमी. या दरम्यानच्या व्यासाचे बनवितात, तर मऊ शिसाची झीज लवकर होत असल्याने व त्याची शक्ती कमी असल्यामुळे ते जास्त व्यासाचे बनवितात. यांत्रिक पेन्सिलीचे शिसे हे ०.९१४ मिमी. ते १.१६८ मिमी. व्यासाचे असते.

 

लाकडी पेन्सिली तयार करण्यासाठी सामान्यत: अर्ध्या पेन्सिलीइतकी जाडी, चार ते सात पेन्सिलींइतकी रुंद व तयार करावयाच्या पेन्सिलीपेक्षा थोडी जास्त लांबी असलेल्या फळीवर अर्धवर्तुळाकार समांतर खाचा पाडतात आणि या खाचांमध्ये त्यांच्या व्यासाइतक्याच व्यासाचे शिसे बसवितात. नंतर वरील आकाराचीच व तशाच अर्धवर्तुळाकार खाचा पाडलेली दुसरी फळी पहिल्या फळीला आसंजकाने चिकटवितात व आसंजक वाळेपर्यंत दाबाखाली धरून ठेवतात. १९४० सालानंतर आसंजक म्हणून सरसाऐवजी पॉलिव्हिनिल अँसिटेट पायसाचा वापर बहुतेक ठिकाणी होऊ लागला. चिकटविलेल्या फळ्यांमधून नंतर यंत्राच्या  साहाय्याने  पेन्सिली  कापून  काढतात  व  त्यांना  गोल, षट्कोनी,   अष्टकोनी   आकार   देतात. सुतारांनी  वापरावयाच्या  पेन्सिली  घरंगळू नयेत  म्हणून  चपट्या  करतात.  प्रत्येक पेन्सिलीवर  यानंतर  जरूरी  प्रमाणे लॅकरचे३  ते  १०  थर  देतात,  पॉलिश  करतात,  उत्पादकाचा  शिक्का  मारतात व जरूर तर एका टोकाला धातूच्या पत्र्याचे वलय बसवून त्यात खोडरबर बसवितात. पेन्सिल निर्मितीतील  हे  टप्पे  पूर्वी  हाताने करीत असत,आता सर्व काम स्वयंचलित यंत्रांनी करण्यात येते. यंत्रांच्या साहाय्याने तासाला सु. २०,००० पेन्सिलींचे उत्पादन करता येते.

 

सर्वसामान्यत: पेन्सिलीची लांबी सु. १८ सेंमी. असते. काही सु. ३७ सेंमी. पर्यंतही लांब असतात. काही पेन्सिली सु. ८-१० सेंमी. लांब व बारीक जाडीच्या असतात. काही पेन्सिलींवर लाकडी वा इतर कोणतेच कवच नसते, त्यांच्यावर फक्त रंगाचे लेप दिलेले असतात.


प्रकार : वर दिलेले वर्णन काळ्या शिशाच्या लाकडी साध्या पेन्सिलींबाबतचे आहे. याशिवाय रंगीत शिशाच्या, पाटीवरच्या, कागदी वा मेणाच्या, यांत्रिक इ. प्रकारांच्या पेन्सिली प्रचारात आहेत. रंगीत शिशाच्या पेन्सिली काळ्या पेन्सिलीप्रमाणेच तयार करतात. असे शिसे तयार करण्यासाठी पाण्यात विरघळणारी व न विरघळणारी रंगद्रव्ये, भरीचा पदार्थ, वंगण वा तेलकट पदार्थ आणि बंधक यांचा वापर करतात. मृत्तिका व संगजिरे (टाल्क) हे भर म्हणून वसा, वसाम्ले वा मेण यांचा तेलकट पदार्थ म्हणून नैसर्गिक डिंक कृत्रिम डिंक व सेल्युलोज ईथरे यांचा बंधक म्हणून सामान्यत: वापर केला जातो. कॉपिंग पेन्सिलीचे शिसे हे रंगद्रव्ये व बंधक यांचे तर ज्याच्या खुणा पुसता येत नाहीत असे शिसे मिथिल व्हायोलेट, ग्रॅफाइट व बंधक यांचे तयार करतात. ही सर्व प्रकाराची शिसे तयार करण्यासाठी घटक पदार्थ एकत्रित करून त्यांचा राडा तयार करतात, मुद्रेतून ओढून कांड्या करतात, त्या वाळवितात, भाजत नाहीत व त्यांवर लाकडी कवच घालतात. काही वेळा एकाच पेन्सिलीत दोन रंगी शिसे असते.

 

यांत्रिक पेन्सिली टोपण वा विशिष्ट कळ दाबल्यास शिसे पुढे सरकणाऱ्या वा टोपण फिरवून शिसे पुढे ढकलणाऱ्यापद्धतीच्या असून त्याकरिता विविध प्रकारच्या यंत्रणा वापरण्यात येतात. अशा पेन्सिलींमुळे टोक करण्याचा त्रास वाचतो. त्यांचे शिसे काळ्या शिशाच्या पेन्सिलीप्रमाणेच असते. मात्र त्याचा व्यास कमी असतो. ह्या पेन्सिलींचे कवच प्लॅस्टिकचे वा धातूचे असते. यांना स्वयंचलित पेन्सिली असेही म्हणतात.

 

स्लेट पाटीवर लिहावयाची पेन्सिल ही मऊ स्लेट, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, सोपस्टोन इत्यादींची करतात. काही           स्लेट पेन्सिलींवर लाकडी कवच असते परंतु बहुधा त्या कवचरहित असतात.

 

लांबच्या लांब अरुंद कागदी पट्टी शिशावर सर्पिलाकार गुंडाळून कागदी पेन्सिली बनवितात. जरूरीप्रमाणे ही कागदी पट्टी उलगडून पेन्सिलीचा वापर करतात. 

 

काच, धातू इत्यादींवर खुणा करण्यासाठी वापरावयाच्या पेन्सिलीतील शिसे तयार करण्यासाठी मेणात काजळी व इतर रंजकद्रव्ये मिसळतात. असे शिसे लाकडी कवचात घालतात. खुणा करावयाचा पृष्ठभाग थोडा गरम करावा लागतो व तो गरम असतानाच त्यावर अशा पेन्सिलीने लिहिले जाते वा खुणा केल्या जातात. 

 

वर वर्णन केलेल्या पेन्सिलींशिवाय इतर अनेक प्रकारांच्या खास पेन्सिली तयार करण्यात येतात. उदा., मेणाचे जास्त प्रमाण असलेल्या ग्रीज वा मेण पेन्सिली, चित्रकारांकरिता कोळशांचा गाभा असलेल्या पेन्सिली, पाण्यात विरघळणाऱ्या रंगीत व ओल्या वा कोरड्या स्थितीत वापरात येणाऱ्या पेन्सिली इत्यादी. 

भारतीय उद्योग : १९१५ मध्ये भारतात पहिला पेन्सिल कारखाना कलकत्ता येथे सुरू झाला. त्यापूर्वी देशाची पेन्सिलीची गरज जपान, जर्मनी, इंग्लंड इ. ठिकाणाहून आयात करून भागविण्यात येई. १९१८ मध्ये मद्रास व १९३१ मध्ये कलकत्ता येथे प्रत्येकी एक असे दोन नवीन कारखाने सुरू झाले. ह्या कारखान्यांतून अल्पसे उत्पादन होई परंतु जर्मनी-जपान येथून आयात होणाऱ्या पेन्सिलींमुळे त्यांची म्हणावी तशी प्रगती होऊ शकली नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पेन्सिलींची मागणी वाढली व आयात बरीच कमी झाल्याने वरील कारखान्यांची प्रगती झाली, तसेच काही नवीन कारखानेही सुरू झाले. या काळात एकूण दहा कारखाने उत्पादन करीत होते व त्यांची एकूण उत्पादनक्षमता प्रतिवर्षी ३.८६ लक्ष ग्रोस होती. त्यापैकी निम्मी क्षमता युद्धकाळापूर्वी अस्तित्वात असलेल्या तीन कारखान्यांची होती. तथापि योग्य कच्चा माल उपलब्ध न झाल्याने उच्च दर्जाच्या पेन्सिली तयार होऊ शकल्या नाहीत. युद्धानंतरच्या काळात पेन्सिलींची आयात परत होऊ लागली. परिणामतः अनेक कारखाने बंद पडले. १९५० मध्ये जकात मंडळाने या धंद्यास तीन वर्षांचे संरक्षण दिले व आयातीवर बंधने घातली. याच सुमारास दिल्ली व मुबंई येथे एकेक नवीन कारखाने सुरू झाले. १९५३ मध्ये प्रतिवर्षी ११ लक्ष ग्रोस उत्पादनक्षमतेचे ११ कारखाने होते. तथापि ह्या कारखान्यांकडून उच्च दर्जाच्या पेन्सिलींची गरज भागविली जात नसल्याने त्यांची आयात वाढली. १९५२-५३ मध्ये ४,०६,२१३ ग्रोस पेन्सिलींची आयात झाली. १९५३ मध्ये सरकारने संरक्षक कर रद्द केला व आयात कर लादला. त्यामुळे भारतीय कारखान्यांची वाढ होऊ लागली व सर्व प्रकारच्या पेन्सिलींचे उत्पादन होऊ लागले. १९५५ मध्ये या धंद्याला स्थिरता आली. १९६२ मध्ये १५ कारखाने (एकूण उत्पादनक्षमता १७,२०,२०० ग्रोस प्रतिवर्षी) होते. त्यांपैकी केरळात २ (४५,००० ग्रोस) तामिळनाडू २ (६,००,००० ग्रोस), प. बंगालात २ (१,६५,००० ग्रोस), गुजरातेत २ (९७,२०० ग्रोस), महाराष्ट्रात ४ (४,८०,००० ग्रोस), पंजाबात १ (१,२०,००० ग्रोस) व दिल्लीत २ (२,१३,००० ग्रोस) असे कारखाने होते. १९६३ मध्ये ११ लक्ष ग्रोस उत्पादनक्षमतेचे ११ कारखाने उत्पादन करीत होते. ह्या कारखान्यांतून काळ्या, रंगीत व कॉपिंग या प्रकारांच्या उच्च दर्जाच्या पेन्सिली विविध प्रतींत, आकार व आकारमानांत तयार करण्यात येत. १९५७ नंतर शेजारच्या राष्ट्रांना पेन्सिलीची निर्यात होऊ लागली. ही निर्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, ब्रह्मदेश, न्यासालँड, नेपाळ, एडन, बहरीन इ. देशांना करण्यात येते.

 

भारतातील पेन्सिलींचे उत्पादन, आयात व निर्यात यांची आकडेवारी 

(उत्पादन हजार ग्रोसमध्ये व आयात-निर्यात ग्रोसमध्ये दिलेली आहे). 

 

प्रकार 

१९५७ 

१९६१ 

काळी :

उत्पादन 

५९०.२० 

८६१.८२ 

 

आयात 

३,०३,४८७ 

९,४११ 

 

निर्यात  

—–

१,९९० 

कॉपिंग : 

उत्पादन 

४९.४५ 

१२२.३८ 

 

आयात 

२४,००९ 

३,५९३ 

 

निर्यात  

—-

२५ 

रंगीत :

उत्पादन 

७५.४५ 

१५४.२६ 

 

आयात 

५३,२९० 

६,४०० 

 

निर्यात  

——-

२५ 

एकूण :

उत्पादन 

७१५.१० 

११३८.४६ 

 

आयात 

३,८०,७८६ 

१९,४०४ 

 

निर्यात  

——– 

२,०४०  

पेन्सिलीकरिता लागणारे लाकूड अमेरिका व पूर्व आफ्रिकेतून पूर्वी आयात करण्यात येई. तथापि त्याऐवजी भारतात कदंब, सातवीण, देवदार, लाल सावर, तून (ताडू), रुद्राक्ष, शिवण, आंबा, कुंबळ, पेटारी, वारंग, भोरसळ, रुमा, मस्तकी इ. वनस्पतींचे लाकूड वापरले जाते. ८५% चे ग्रॅफाइट मेक्सिको, सायबीरिया, बव्हेरिया, कोरिया, श्रीलंका, बोहीमिया व प. जर्मनी येथून आयात करण्यात येते. इतर साहित्य स्थानिक उपलब्धतेनुसार वापरले जाते.

 

भारतीय मानक संस्थेने काळ्या पेन्सिलींसाठी भारतीय मानक क्र. १३७५-१९५९ प्रसिद्ध केलेले आहे. त्यात आरेखनाच्या, सुताराच्या, स्टेनोच्या व नित्य वापराच्या पेन्सिलींचा समावेश आहे. प्रत्येक पेन्सिलीवर उत्पादकाचे नाव, चिन्ह, प्रत इ. माहिती देणे सक्तीचे करण्यात आले आहे.

 

पहा : ग्रॅफाइट

 

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part VI, New Delhi, 1965.

 

गोखले, श्री. पु. मिठारी, भू. चिं.