मेणबत्ती : मेण, घन चरबी वा तत्सम पदार्थांनी तंतुमय वात संतृप्त होईपर्यंत (पूर्णपणे भिजेपर्यंत) वातीभोवती थर देऊन तयार होणाऱ्या दंडगोलाकार वस्तूस सामान्यतः ‘मेणबत्ती’ असे म्हणतात. मेणबत्त्या विविध आकारमानांच्या बनवितात.

इतिहास : मेणबत्तीचा शोध कधी लागला याबद्दलची माहिती उपलब्ध नाही. प्राचीन काळातील लोकांना तिची माहिती होती पण तिचे स्वरूप आजच्यासारखे नव्हते. थीब्झ येथील ईजिप्शियन थडग्यांवर मेणबत्त्यांच्या व त्यांच्या धारकांच्या आकृत्या कोरलेल्या आढळल्या आहेत. अशाच प्रकाराच्या मेणबत्त्या क्रीट येथे सापडल्या असून त्या इ. स. पू. ३००० च्या काळातील मिनोअन संस्कृतीतील होत्या. प्राचीन ईजिप्शियन लोक निमुळत्या व दंडगोलाकृती मेणबत्त्या वापरीत. या मेणबत्त्या वेतासारख्या गवताचा भेंडयुक्त गाभा द्रव चरबीने संतृप्त करून बनवीत. यालाच ‘रश कँडल’ असे म्हणत. पुढे तंतुमय वातीचा शोध लागल्यावर ती वितळलेल्या चरबीत बुडवून व थंड करून, मेणबत्ती योग्य जाडीची होईपर्यंत अशी क्रिया पुनःपुन्हा करून मेणबत्ती तयार करण्यात येऊ लागली. प्राचीन रोमन लोकांच्या मेणबत्त्या ह्या मेण व चरबी यांच्या मिश्रणापासून बनविलेल्या असून त्या एका टोकाकडे निमुळत्या होत गेलेल्या असत. अशाच प्रकाराच्या इ. स. पहिल्या शतकातील मेणबत्त्या फ्रान्समधील व्हेंझो-ला-रोमन येथे सापडल्या आहेत.

मध्ययुगात (इ. स. ११०० ते १३५०) यूरोपमध्ये गरीब लोक प्रकाशासाठीन ‘रश कँडल’ वापरीत. या मेणबत्त्या भेंड चरबीत वा विशिष्ट तेलात भिजवून तयार करीत. या काळात मेण-चरबी मिश्रणाच्या मेणबत्त्या प्रचलित होत्या. मात्र फक्त मेणाच्या बत्त्या फार महाग असल्याने त्यांचा वापर श्रीमंत वर्गच करी. चरबीच्या बत्त्यांना ‘डिप्स’ असे म्हणत. ही चरबी मांसापासून मिळवीत. सुतांचा जुडगा वितळलेल्या चरबीत बुडवीत व थंड करीत. बत्तीची जाडी आवश्यक तेवढी होईपर्यंत ही क्रिया बऱ्याच वेळा करीत. मधमाशीच्या मेणाच्या बत्त्या टांगलेल्या वातीवर वितळलेले मेण बऱ्याच वेळा ओतून बनवीत आणि तिच्या पृष्ठाचा उंचसखलपणा जाण्यासाठी ती कठीण पृष्ठावर फिरवीत असत.

मेणबत्त्या तयार करणे हा पूर्वी एक घरगुती उद्योग समजला जात असे. मध्ययुगात शहरांची वाढ होत असताना तो एक खास उद्योग समजण्यात येऊ लागला. पॅरिस, लंडन इ शहरांत चरबी व मधमाश्यांचे मेण यांपासून मेणबत्त्या करणाऱ्यांच्या वेगवेगळ्या गिल्ड (संघटना) होत्या. तेराव्या शतकात पॅरिसमध्ये गिल्डचे सभासद, घरोघरी जाऊन मेणबत्त्या तयार करीत. चरबीची मेणबत्ती कंदिलात बसविण्याची कल्पना याच काळात उदयास आली. आजही यूरोपच्या काही भागांत घरीच मेणबत्त्या करण्यात येतात.

पंधराव्या शतकापर्यंत मेणबत्त्या तयार करण्यासाठी साचे उपलब्ध नव्हते. सिऊर ब्रेझ या पॅरिसवासीयांनी प्रथमच चरबीच्या बत्त्यांसाठी साचा तयार केला. मात्र हा साचा मधमाश्यांच्या मेणासाठी उपयुक्त नव्हता.

अठराव्या शतकाअखेर वसातिमी देवमाशाच्या (स्पर्म व्हेलच्या) तेलापासून स्फटिकरूपाने मेण वेगळे करण्यात आले व बत्तीसाठी त्याचा वापर करण्यात येऊ लागला. हे मेण ठिसूळ असून त्याच्या बत्त्या जाळल्यास घाण वास येत नसे, तसेच उन्हाळ्यात त्या मऊ होत नसत व वाकतही नसत. या मेणबत्त्या म्हणजे पहिल्या मानक (प्रमाणभूत) बत्त्या होत. तिचे वजन सु. ०·०७५६ किग्रॅ. इतके असून ती ५·९२ ग्रॅ/तास या वेगाने एकसंध जळे. या मेणास कठीणपणा येण्यासाठी त्यात मधमाश्यांचे मेण मिसळण्यात येऊ लागले व १८६० मध्ये अशा मेणमिश्रणाच्या मेणबत्त्या तयार करण्यात येऊ लागल्या. पुढे ओझोकेराइट या खनिज हायड्रोकार्बन मेणाचा वापर बत्त्यांसाठी करण्यात येऊ लागला. याचा उकळबिंदू उच्च असल्याने ते चरबी व मधमाश्यांच्या मेणात मिसळल्यास मेणमिश्रण फारच कठीण बनते.

इ. स. १८५५ मध्ये इंग्लंडमध्ये ऑइल शेल (तेलयुक्त शेल खडक) व दगडी कोळसा यांच्यापासून आणि १८५९ मध्ये खनिज तेलापासून पॅराफीन मेण मिळविण्यात यश आले. हे मेण पांढरे वा निळसर पांढरे व पारदर्शक असून त्याचा वितळबिंदू कमी आहे. त्यामुळे त्यापेक्षा कमी तापमानास ते मऊ व आकार्य (कोणताही आकार घेणारे) होई. म्हणून त्यात सेरेसीन व स्पर्म तेल मिसळण्यात येई आणि ते मिश्रण बत्तीसाठी वापरीत.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ग्लिसराइडयुक्त चरबीच्या ज्वलनात घाण वास येण्यास जबाबदार असलेला घटक शोधून काढण्यात आला, तसेच चरबीचे अपघटन करून (रेणूचे तुकडे करून) त्यापासून घन ⇨ वसाम्ले वेगळी करण्यात यश आले. यांपैकी पामिटिक व स्टिअरिक अम्ले जाळल्यास घाण वास येत नाही, पॅराफिनात मिसळल्यास ते घट्ट होते व बत्त्या चांगल्या प्रकाश देतात, असे आढळून आले. यामुळे पॅरॅफिनात स्टिअरिक अम्ल मिसळून त्यापासून चांगल्या प्रकाराच्या मेणबत्त्या बनविण्यात येऊ लागल्या.

टाकणखार, पोटॅशियम नायट्रेट वा नवसागर यांच्या सौम्य विद्रावात कापसाची दुहेरी वात मुरवून मेणबत्तीसाठी तिचा वापर १८२५ मध्ये डब्ल्यू, काबॉसेरेस यांनी प्रथम केला. अशी वात जळताना वाकते, पर्यायाने ऑक्सिडीभवनास (ऑक्सिजनाशी संयोग होण्यास) मदत करते व राखेचे काचीभवन होते. यामुळे राख झटकणे वा जळकी वात कापणे ह्या गोष्टी टळतात, असे आढळून आले. हल्ली अशा वाती यंत्राने करण्यात येतात.

निर्मिती: आधुनिक मेणबत्तीनिर्मितीचे साचा यंत्र १८३४ मध्ये जोसेफ मॉर्गन यांनी तयार केले. या यंत्रात आतापर्यंत बऱ्याच सुधारणा झाल्या असून ते स्वयंचलितही बनविण्यात आले आहे. मेणबत्तीनिर्मितीचे प्रमुख तीन टप्पे पुढीलप्रमाणे आहेत : (१) वातनिर्मिती, (२) मेणमिश्रण तयार करणे आणि (३) साच्याच्या साहाय्याने मेणबत्तीची अखंडित निर्मिती.

(१) वातनिर्मिती : उच्च प्रतीच्या पीळदार कापूस वा लिनन यापासून विणून वा पीळ देऊन योग्य जाडीची वात तयार करतात. एकाच दिशेने जळेल, जळलेला भाग वाकून ज्योतीच्या ऑक्सिडीभूत भागात घूसून पूर्ण ज्वलन होईल अशी ही वात असते. वातीची सच्छिद्रता वा केशाकर्षण (सूक्ष्म नलिकांद्वारे द्रव पदार्थ वर ओढून घेण्याची क्षमता) असे असते की, मेण वितळताच ते वातीतून त्वरित ज्योत भागाकडे जाते. यानंतर अकार्बनी लवणांच्या विद्रावात वाती काही काळ भिजत ठेवतात व साच्यात आणण्यापूर्वी त्या सुकवितात. यामुळे वातीचे ज्वलन मंद होते. लवणांत न भिजविल्यास वात जलद जळते व ज्योत वितळलेल्या मेणात घुसून विझते. शिवाय वात जळण्याचा वेग कमी झाल्यास तीत जास्त मेण शोषले जाते, वातीचा जास्त भाग जळतो व ज्योतीचा भडका होण्याचा धोका उद्‌भवतो.


(२) मेणमिश्रण: मेणबत्तीसाठीचे मेणमिश्रण तयार करण्यासाठी त्यातील घटकांचे प्रमाण हवामानानुसार विविध देशांत वेगवेगळे आढळून येते. सर्वसामान्यतः त्यात पॅराफीन (६०%), स्टिअरिक अम्ल (३५%), मधमाश्यांचे मेण (५%) असते. क्वचित त्यात अत्यल्प प्रमाणात कँडेलिल्ला वा कार्नोबा मेण मिसळतात. मधमाश्यांच्या मेणापासून तयार करण्यात येणाऱ्या मेणमिश्रणात शुद्ध मधमाश्यांचे मेण वा ५०% पॅराफीनयुक्त मधमाश्यांचे मेण आणि घट्ट होणारे दुसरे मेण व स्टिअरिक अम्ल मिसळलेले असते.

पॅराफीन मेण कठीण व आकार्य नसावे, तसेच त्याचा वितळबिंदू ४४º– ५६º से. च्या दरम्यान असावा. शुद्ध पॅराफीन मेण उष्णतेने जलद वितळते व वाहून जाते आणि मेणबत्ती वाकडी होते, तर कठीण मेण साच्याला चिकटते. हे सर्व टाळण्यासाठी त्यात २–३% स्टिअरीन मिसळतात. पॅराफीन मेणाचा वितळबिंदू ५१º से. पेक्षा जास्त असल्यास त्यात स्टिअरिन जास्त प्रमाणात मिसळतात. मिश्रणात ३% स्टिअरिन असल्यास दृढता, रंग व ज्वलन या दृष्टीने मेणबत्ती चांगली बनते. रंगीत मेणबत्त्यांसाठी ॲनिलीन रंजकासारख्या मेण विद्राव्य (मेणात विरघळणाऱ्या) रंजकांचा वापर केला जातो.

मेण मिश्रण साच्यात ओतण्यापूर्वी ते स्वच्छ व प्रवाही असणे आवश्यक असते. बाष्पवेष्टित किटलीत मेण वितळवतात. प्रत्यक्ष ज्योतीवर मिश्रण करणे वा बराच काळ तापविणे टाळतात. नाहीतर मेण करपते व मिश्रणाचा रंग बदलतो. बहुतेक घटक शुद्ध स्वरूपातच वापरण्यात येतात.

(३) साच्यातून अखंडित निर्मिती: एकाच वेळी ५०–५०० मेणबत्त्या तयार होतील इतक्या साच्यांच्या रांगा व अनेक साचे यंत्रात असतात. यात अखंड वातीचा, तसेच तयार झालेली मेणबत्ती साच्यातून बाहेर ढकलण्यासाठी सरकत्या दट्ट्याचा वापर करण्यात येतो. साचा उच्च प्रतीच्या कथिलाचा करतात व त्याच्या आतला भार फारच गुळगुळीत करण्यात येत असल्यामुळे मेणबत्तीला योग्य ती चकाकी येते. साचे एका धातूच्या टाकीत रांगेने उभे ठेवतात. ही टाकी गरम व थंड करण्याची व्यवस्था असून त्या व्यवस्थेद्वारे मेणबत्तीच्या प्रकारानुसार उष्णतेचा पुरवठा व शीतकरण यांचा वेग नियंत्रित करता येतो.

साच्यात मेणबत्तीच्या तळाचा भाग वरती असून तो क्षितिज समांतर उघडा असतो. या उघड्या भागातून साच्यात गरम मेण ओततात. मेणबत्तीचे निमुळते टोक बंद असून ते एका पोकळ दट्ट्याला जोडलेले असते. साच्याच्या खाली असलेल्या रिळावरून दट्‌ट्यातून वात साच्यात येते व ती साच्याच्या बाजूपर्यंत नेली जाते. साचा थंड झाल्यावर दट्ट्या वर उचलला जाऊन मेणबत्ती वर ढकलली जाते व वरच्या बाजूस असणाऱ्या चिमट्यात वा चौकटीत ढकलली जाते. त्याच वेळी दुसऱ्या मेणबत्तीसाठी वात साच्यात येते. पहिल्या मेणबत्तीची वात टोकाकडून कापून चिमट्यातून अलग करतात. मेणमिश्रण साच्यात ओतल्यानंतर मेणबत्ती बाहेर पडण्यात सु. २०–३० मिनिटे लागतात. अशा यंत्रात एका वेळी ५०० मेणबत्त्या याप्रमाणे एका तासात तीन वेळा मेणबत्त्या तयार होतात.

काही खास उपयोगासाठी चरबीच्या डिप्स अजूनही तयार करतात. वितळलेल्या मेणातून लांब वात ओढून ‘टेपर’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या मेणबत्त्या तयार करतात.

उपयोग व धार्मिक महत्त्व: मेणबत्तीचा उपयोग प्रामुख्याने प्रकाशासाठी करण्यात येतो. याशिवाय इतर विविध कारणांसाठी तिचा उपयोग करण्यात येतो. फार पूर्वीच्या काळी मेणबत्तीचे बारा सारखे भाग करून तिच्या ज्वलनाने दिवसाचा काल ठरवित असत. सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये लिलाव पुकारण्यापूर्वी मेणबत्ती पेटवीत व ती पूर्ण जळेपर्यंत लिलावाच्या बोली होत.

वाढदिवस व ख्रिसमस सण साजरा करण्यासाठी मेणबत्ती वापरली जाते. पणतीच्या आकाराच्या मेणबत्त्या भारतात दिवाळीस वापरल्या जातात. ख्रिश्चन लोकांत मेणबत्त्यांना अविनाशत्व, चिरंतन अमरत्व, सार्वकालिकता, सौंदर्य व दैविकता असते, असे मानण्यात येते. रोमन कॅथलिक चर्चमध्ये संस्कार म्हणून मेणबत्त्या जाळीत. चर्चमध्ये वर्षभर वापरण्यात येणाऱ्या मेणबत्त्या ‘कँडल मास डे’ (२ फेब्रुवारी) या दिवशी पवित्र करण्यात येत. मोठी ‘पास्काल’ मेणबत्ती ईस्टरच्या आधीच्या पवित्र शनिवारी पवित्र करण्यात येई आणि त्या रविवारी व ‘फीस्ट डे’ ला (ईस्टर नंतरच्या चाळीसाव्या दिवशी) जाळतात. मुख्य वेदीजवळ वा पवित्र संस्काराच्या वेदीजवळ सहा मेणबत्त्या जाळण्यासाठी लागतात. यांपैकी एक कायम पेटती असते. वेगवेगळ्या धार्मिक समारंभांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मेणबत्त्या लागतात. ‘नामकरण मेणबत्ती’ ही मुलाच्या हातात द्यावी लागते. उपासनेसाठी घरी व चर्चमध्ये लहान मेणबत्ती वापरतात. तसेच व्यक्ती आजारी असताना, अंत्यसंस्कारप्रसंगी व स्माशानभूमीतही मेणबत्त्या वापरतात.

बऱ्याच प्रॉटेस्टंट चर्चमध्ये वेदीवर प्रकाशासाठी मेणबत्त्या लावतात. ज्यू लोकांच्या धार्मिक व ऐतिहासिक समांरभासाठीही मेणबत्त्या जाळणे महत्त्वाचे मानले जाते. शाहूऑटपूर्वीच्या शुक्रवारी व सणाच्या दिवशी दोन पांढऱ्या मेणबत्त्या घरी व देवळात लावतात. ‘खानूका’ या ज्यू सणाच्या प्रसंगी रंगीत वा सोनेरी मेणबत्त्या वापरतात. आई-वडीलाच्या मृत्यूच्या पहिल्या वर्षदिनी चोवीस तास मेणबत्ती लावतात.

भारतीय उद्योग : दुसऱ्या महायुद्धापूर्वी ब्रह्मदेशातून मोठ्या प्रमाणावर मेणबत्त्या आयात करीत असत. दुसऱ्या महायुद्धात ही आयात बंद झाली म्हणून भारतीय मेणबत्ती उद्योगास चालना मिळाली आणि कलकत्ता व आसामच्या भागात मेणबत्ती उद्योगाची वाढ झाली. त्याच सुमारास निर्मितीस लागणारे स्टिअरीनही येणे बंद झाले व देशातील स्टिअरीनचा वापर करण्यात येऊ लागला. १९४३ मध्ये देशात १६० लहान उत्पादक मेणबत्त्या करीत असत. १९४७ मध्ये मेणाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे फक्त ४० उत्पादक निर्मिती करु लागले, तर १९४९ मध्ये उत्पादक व उत्पादन पुष्कळच घटले. सध्या मेणबत्तीच्या निर्मितीस लागणारा कच्चा माल भारतातच उपलब्ध होऊ लागल्याने कच्च्या मालाची आयात बंद करण्यात आलेली आहे. मेणबत्ती उत्पादन हे कुटिरोद्योग स्वरूपाचे असल्याने त्याच्या उत्पादकांची व एकूण उत्पादनाची आकडेवारी उपलब्ध नाही. काही प्रमाणात मेणबत्त्यांची आफ्रिका व मध्य पूर्वेतील देशांना निर्यात करण्यात येते.

मेणबत्ती धारक: मेणबत्ती ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनास ‘मेणबत्ती धारक’ असे म्हणतात. दोन वा अनेक मेणबत्त्या असणाऱ्या धारकास कँडेलाब्रम, भिंतीना लावलेल्या धारकास स्कोन, तर छतास टांगण्यात येणाऱ्या धारकास झुंबर असे म्हणतात. पूर्वी मेणबत्ती धारक हे श्रीमंतीचे द्योतक समजण्यात येत असल्याने ते मौल्यवान वस्तूंपासून तयार करीत असत. हे धारक विविध आकारांत आकारमानांत व नमुन्यांत कलात्मक दृष्ट्या बनवीत.

मेणबत्ती धारक फार प्राचीन काळापासून प्रचारात आहेत. ह्या धारकांत लोखंडी काट्यावर बत्ती खोवून वा खोबणीत ठेवण्यासाठीची व्यवस्था असते. मध्ययुगात काट्याचे धारक वापरीत. त्यानंतर खोबणीचा प्रकार वापरात आला. सतराव्या शतकात कलात्मक धारक बनविण्यात येऊ लागले. तसेच धांतूशिवाय टेराकोटाचे व प्लॅस्टिकचेही धारक विसाव्या शतकात वापरात आले. घरी धारक ठेवण्यासाठी १·५ मी. उंचीचे खास फर्निचर सतराव्या-अठराव्या शतकात वापरात आले. एका मेणबत्तीचा प्रकाश अल्प व मंद असल्याने भरपूर प्रकाश मिळण्यासाठी विविध आकारांची व प्रकारांची दीपाच्छादने वापरण्यात येऊ लागली. सोळाव्या शतकात ते चकचकीत चांदीचे वा पितळेचे बनवीत असत. पुढे आरसा, रॉक क्रिस्टल वा लोलक यांच्या कापांची दीपाच्छादने वापरात आली. [⟶ हंड्या व झुंबरे].

संदर्भ : 1. Faraday, M. Chemical History of a Candle, New York, 1958.

             2. Klenke, W. W. Candle making, Peoria, 1946.

             3. Laklan, C. The Candle Book, 1957.

             4. O’Dea, W. T. The Social History of Lighting, London, 1958.

             5. Roy, M. L. A. The Candle Book, Brattleboro, 1938.

गोखले, श्री. पु. मिठारी, भू. चिं.