वस्त्रे : कोणत्याही तंतूंच्या धाग्यांपासून विणकामाद्वारे अथवा अन्य प्रकारे बनविलेले कापड किंवा कापडी वस्तू अशी वस्त्राची स्थूल व्याख्या करता येते. कापूस, रेशीम, लोकर, ॲस्बेस्टस यांसारख्या नैसर्गिक तंतूंप्रमाणेच नायलॉन, रेयॉन, पॉलिएस्टर, तंतुरूप काच इ. कृत्रिम वा मानवनिर्मित तंतूही कापडाच्या धाग्यांसाठी वापरतात. मागावर अथवा सुयांनी विणून, फासे वा टाके घालून किंवा गोफाप्रमाणे गुंफून धाग्यांपासून कापड बनवितात. तसेच धाग्यांना गाठी मारून जाळीदार कापड बनविता येते व धागे चिकटवून व लाटूनही कापड बनवितात. व्यापक अर्थाने रबर वा प्लॅस्टिक यांचे पटल, फेसाळ द्रव्याचे पटल यांचा संयोग करून बनविण्यात येणाऱ्या चादरीसारख्या पातळ व लवचिक द्रव्यालाही वस्त्र म्हणता येईल. 

मराठी विश्वकोशात कापड उद्योग, कापड छपाई, कापडावरील अंतिम संस्करण, किनखाब, खडीकाम, खादी उद्योग, गणवेश, गालिचे, जर व कलाबतू, तयार कपडे, पाटोळा, पैठणी, पोशाख व वेशभूषा, फुलकरी, फेल्ट, बांधणी, बाटिककाम, भरतकाम, रेशीमकाम, विणकाम, शाल, साडी, सूत, सूतकताई, हातमाग उद्योग, हातमोजे व पायमोजे, हातरुमाल, हिमरू, होजिअरी वगैरे वस्त्रांशी निगडित असलेल्या स्वतंत्र नोंदी आलेल्या आहेत. यांशिवाय महत्त्वाचे तंतू (उदा., काच, तंतुरूप कापूस तंतु, कृत्रिम तंतु, नैसर्गिक ताग फ्लॅक्स रेशीम लोकर हेंप इ.), कापडांचे काही महत्त्वाचे प्रकार (उदा., मलमल, फ्लॅनेल, लिनन इ.) आणि कापडाशी संबंधित प्रक्रिया (उदा., रंजनक्रिया) यांच्यावरही स्वतंत्र नोंदी आलेल्या आहेत. या नोंदींमधून त्या त्या विषयाचा इतिहास थोडक्यात आलेला आहे, म्हणून प्रस्तुत नोंदीत ऐतिहासिक माहिती दिलेली नाही. 

वस्त्रांचे प्रकार : उपयोग, रचना व पोत, अन्य गुणवैशिष्ट्ये व जेथे वा ज्याने कापड प्रथम बनविले त्या स्थळाचे व व्यक्तीचे नाव यावरून विविध कापडांना वेगवेगळी नावे दिली आहेत. या नावांमागे विशिष्ट कल्पना व परंपरा होत्या. नंतर त्या व्यापक होत गेल्या तशाच बदलतही गेल्या. उदा., मुळात जंगली रेशमी किड्यापासून मिळणाऱ्या रेशमापासून बनविलेल्या कापडाला टसर म्हणत. आता सुती व संमिश्र  धाग्यांचे टसर कापड बनवितात. खादी मुळात सुती कापड होते, पण ते रेशीम, लोकर व कृत्रिम धागे वापरूनही बनविण्यात येऊ लागले आहे. यामधून कापडाचे व पर्यायाने वस्त्रांचे भिन्न भिन्न प्रकार निर्माण होत गेले व त्यांना वेगवेगळी नावे पडत गेली. कापड उद्योगाचा विकास मुख्यत्वे ग्रेट ब्रिटनमध्ये व नंतर अमेरिकेत झाल्याने कापडाचे प्रकार व वस्त्रे यांना मुख्यतः इंग्रजी नावे देण्यात आली. हीच नावे अन्य भाषांतही रूढ झाली. प्रस्तुत लेखात पुढे वस्त्रांच्या काही महत्त्वाच्या प्रकारांची थोडक्यात माहिती दिली आहे. तीमध्ये शक्य तेथे देशी वा मराठी नावे व अन्यत्र इंग्रजी नावेच दिलेली आहेत. 

अंगोरा कापड : अंगोरा बोकडापासून मिळणाऱ्या मोहेर लोकरीपासून बनविलेले कापड. हे साध्या विणीचे कापड मऊ असून शाली, गालीचे वगैरेंकरीता ही लोकर वापरतात. सुताबरोबरही हिचे कापड बनवितात.  

अजिजी कापड : भारतात बनणारे रंगीत पट्‌ट्यांचे सुती मसलीन (मलमल). रेशमी व रेयॉनचेही बनवितात. 

अनुरेखनाचे कापड : साध्या विणीचे, पातळ, जवळजवळ पारदर्शक सुती कापड. रासायनिक संस्करण करून हे पारदर्शक व पाणी धरून ठेवणार नाही असे केलेले असते. आराखडे, आकृत्या वगैरेंचे अनुरेखन (ट्रेसिंग) करण्यासाठी हे वापरतात. 

अपघर्षक कापड : पॉलिश वा अपघर्षक कारकांना आधार देण्यासाठी वापरण्यात येणारे कापड. सामान्यतः सुती ड्रिल, कधीकधी टि्‌वल व जीन याकरिता वापरतात. याच्या एका बाजूवर आसंजक (चिकट पदार्थ) वा रेझिनाच्या मदतीने एमरी, कार्बोरंडम यांसारखे अपघर्षक खरखरीत पदार्थ चिकटवलेले असतात. हे कापड उद्योगधंद्यात धातू व अन्य पदार्थ यांना खरवडून व घासून गुळगुळीत करण्यासाठी किंवा पॉलिश करण्यासाठी वापरतात. 

अपहोल्स्ट्री कापड : विणताना वा नंतर छपाईने विविध रंगाकृती काढलेले, जाड मजबूत विणीचे कापड. हे विविध विणी वापरून विणतात. याकरिता सूत, फ्लॅक्स, रेशीम, कृत्रिम तंतू इत्यादींचे विविध धागे वापरतात. फर्निचरवरची व अन्य आवरणे, पडदे, अभ्रे, गालिचे तसेच मोटारगाडी, रेल्वे, विमाने यांतील आसने इत्यादींकरिता याचा उपयोग करतात. शिवाय अस्तर, आत भरावयाचे कापड, शोभिवंत वस्तू इत्यादींकरिताही हे वापरतात. 


अलवान : (आलवण). एक प्रकारचे तांबडे कापड. देवांची आसने, विधवांचे कपडे, धार्मिक विधी वगैरेंसाठी हे वापरतात. 

अल्पाका कापड : दक्षिण अमेरिकेतील ⇨ अल्पाका या सस्तन प्राण्याच्या लोकरीपासून तयार करण्यात येणारे कापड. ही लोकर सूत, रेयॉन वा अन्य लोकरीबरोबर वापरूनही कापड बनवितात. सामान्यतः हे काळे व बहुधा चमकदार असते. कोट, शाली, अस्तर इत्यादींकरीता हे वापरतात. 

ॲस्ट्राखान कापड : रशियाच्या ॲस्ट्राखान भागातील काराकुल मेंढीच्या कातड्यासारखे दिसणारे कापड. याच्या वरच्या बाजूस लहानमोठे टाके घालून वेटोळ्यांनी कापड पूर्णपणे झाकले जाऊन त्याला कुरळे रूप प्राप्त होते. लोकर, मोहेर, सूत, रेयॉन याकरिता वापरतात. सुयांनी विणलेले कापड कमी प्रतीचे असते. हे कोट, तसेच कॉलर, बाह्या सुशोभित करण्यासाठी वापरतात. 

ॲस्बेस्टस कापड : ॲस्बेस्टस या खनिजाचे धागे अज्वलनशील असल्याने आगनिवारक कापडासाठी वापरतात. हे धागे अम्‍लरोधकही असतात. हे कापड अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांचे कपडे, भट्‌टीतील नळाची आवरणे, इतर औद्योगिक उष्णतानिरोधक चादरी, सिनेमा व नाट्यगृहातील पडदे वगैरेंकरिता वापरतात. [⟶ ॲस्बेस्टस]. 

आग्रा जाळीदार कापड : पातळ, पारदर्शक, साध्या विणीचे जाळीदार रेशमी कापड. हे ताठर व मजबूत कापड मुख्यतः झालरीकरिता वापरतात. 

आतपरोधी कापड : उन्हाने ज्याचा रंग विटत नाही असे कापड.  

आयरिश पॉपलीन : आयर्लंडमध्ये बनविण्यात येणारे लिननचे वा सुती तलम पॉपलीन. मुळात हे कापड चीनमध्ये रेशमी ताणा आणि लोकरीचा बाणा वापरून बनवीत. पुढे आयर्लंडमध्ये याची नक्कल करण्यात येऊ लागली. सदरे, नेकटाय इत्यादींकरिता हे वापरतात. 

आयरिश लिनन : आयर्लंडमधील फ्लॅक्सपासून बनविण्यात येणारे तलम व वजनाला हलके कापड. पैकी उंची कापड हातमागावर विणतात. हातरुमाल, कॉलर इत्यादींकरिता याचा वापर करतात. 

आर्म्युर कापड : छोटे उंचवटे भासतील अशा पृष्ठभागाचे कापड. हे मुळात रेशमी बनवीत, आता सर्व वा संमिश्र धाग्यांचे बनवितात. पडदे, अभ्रे, आच्छादन, कपडे वगैरेंकरिता हे वापरतात. 

ऑक्सफर्ड कापड : काहीसे जाड, साध्या, टि्‌वल वा बास्केट विणीचे सुती वा रेयॉनचे कापड. हे सहज मळते. सदरे, जाकीट, स्कर्ट, उन्हाळी कपडे वगैरेंसाठी हे वापरतात.


ऑनिंग पट्टेदार कापड : साध्या विणीचे घट्ट, मजबूत, जाड डक, कॅनव्हास कापड. याचे रंगीत पट्टे विणलेले किंवा छापलेले असतात. मोठ्या छत्र्या, राहुट्या, छत, छपऱ्या इत्यादींसाठी हे वापरतात. याचे पट्टे पुष्कळदा भडक रंगांचे असतात. कधीकधी यात कृत्रिम तंतूंचे (ॲक्रिलिक वा काचेचे) धागेही वापरतात. 

ऑर्गंडी कापड : तलम, पातळ, वजनाला अगदी हलके, ताठर, पारदर्शक व साध्या विणीचे सुती कापड. सल्फ्यूरिक अम्‍लाची मर्यादित विक्रिया करून निमपारदर्शक नक्षीचे कापड तयार करतात. धुतल्यावर याला फारशा सुरकुत्या पडत नाहीत. हे रंगीत, छापील वा विरंजित (रंग घालविण्याची क्रिया केलेले) असते. साडी, स्त्रियांचे व मुलांचे कपडे, पडदे, झालरी इत्यादींकरिता हे वापरतात. रेशीम, रेयॉन वा अन्य धाग्यांचेही अशा प्रकारचे कापड तयार करतात. 

इंडिया लॉन : (इंडियन लिनन लोण). तलम, घट्ट विणीचे सुती कापड. लिननसारखे दिसावे म्हणून त्याच्यावर चकाकी आणणारे अंतिम संस्करण करतात. भारतात हे सु. ४,००० वर्षांपासून तयार होत असून स्त्रियामुलांच्या कपड्यांकरिता वापरतात. 

उंटांच्या केसांचे कापड : चमकदार, वजनाला हलक्या व अतिशय मऊ असलेल्या उंटाच्या केसांपासून बनविलेले कापड. पिंगट रंगाचे हे कापड कोट, पांघरूण वगैरेंकरिता वापरतात. 

एनॅमल्ड कापड : तेल, पायरोक्सिलीन वा अन्य पदार्थांचे संस्करण करून कातड्यासारखे चमकदार दिसेल असे बनविलेले जाड सुती कापड. आधार म्हणून ड्रिलसारखे कापड वापरतात. पिशव्या, झालर, आच्छादन वगैरेंसाठी याचा उपयोग करतात. 

एरोटेक्स कापड : हवा इकडून तिकडे (आतबाहेर) जाऊ शकणारे खास विणीचे कापड. शोभिवंत कामांसाठी याचा उपयोग होतो. 

ओटोमन कापड : घट्ट, चमकदार, साध्या विणीचे व दोरासारख्या आडव्या उठावदार रेघा असलेले कापड. हे मुळात रेशमी होते. आता लोकरी वा कृत्रिम धाग्यांचेही बनवितात. सायंकालीन कपडे, कोट, पडदे, अभ्रे, आच्छादन इत्यादींसाठी याचा उपयोग होतो. 

ओढणी : डोक्यावरून व खांद्यावरून घ्यावयाचे स्त्रियांचे अरुंद, लांब वस्त्र. याला कधीकधी जरीचे काठ असतात. हे सर्व प्रकारच्या धाग्यांपासून बनवितात. केवळ डोक्यावरून आणि चेहऱ्यावरून घ्यावयाच्या अशा वस्त्राला घुंगट म्हणतात.  

ओस्नाबुर्ग कापड : भरड, मजबत, साध्या विणीचे सुती कापड. यावर पट्टे वा चौकटी छापतात. पिशव्या, पादत्राणांचे अस्तर, आवेष्टन, कामगारांचे कपडे इत्यादींकरिता याचा वापर होतो. जर्मनीतील ओस्नाब्रुक येथे प्रथम बनविल्यामुळे हे नाव पडले.  

औद्योगिक कापड : उत्पादक उद्योगांत कारखान्यातील वापरांसाठी उपयोगात असलेले कापड वा कापडाच्या वस्तू. उदा., गाळण्याचे कापड, यंत्रांचे पट्टे, वाद्या वगैरे. याकरिता सर्व प्रकारचे तंतू वापरतात.


कंबल : सर्व तऱ्हांच्या लोकरी पांघरुणासाठी उत्तर भारतात वापरण्यात येणारे नाव. लोकरीशिवाय अन्य प्राण्यांचे केसही यात वापरतात. जयपूर, दिल्ली, तिबेट येथील कंबली विशेष प्रसिद्ध आहेत.  

कफन : इस्लाम धर्मियांत प्रेतावर घालण्यात येणारे वस्त्र. 

कर्झी  कापड : चमकदार, सूक्ष्म तंतू (लव) असलेले भरड लोकरी कापड. हे टिकाऊ कापड ओव्हरकोट, गणवेश वगैरेंकरिता वापरतात. इंग्लंडमधील याच नावाच्या गावी प्रथम बनविले म्हणून हे नाव पडले. 

कर्झीमीअर कापड : टि्‌वल विणीचे व सूक्ष्म तंतुमय पृष्ठभाग असलेले उच्च प्रतीचे लोकरी कापड. स्त्रियांच्या कपड्यांसाठी वापरतात. 

कॅंडलविक कापड : विरंजित न केलेले मसलीन. मेणबत्तीच्या वातीसारख्या (म्हणून नाव पडले) जाड धाग्यांपासून हे बनवितात. पृष्ठभागावरील फासे कापून याला तंतुमय रूप देतात. गादीवरच्या चादरी, पडदे, अभ्रे वगैरेंकरिता हे वापरतात. 

कँब्रे कापड : रंगीत ताणा व पांढरा बाणा वापरून साध्या विणीने बनविण्यात येणारे सुती कापड. यात पट्टे, चौकटी पण असतात. स्त्रिया-मुलांचे, खेळाडूंचे व कामगारांचे कपडे वगैरेंसाठी हे वापरतात. हे लिनन व रेयॉनपासूनही बनवितात. याचे विविध प्रकार आहेत. 

कॅनव्हास : घट्ट विणीचे मजबूत व वजनदार, जाड सुती किंवा फ्लॅक्सचे कापड. याकरिता दुहेरी वा तिहेरी पीळदार धागा वापरतात. हे निरनिराळ्या जाडीचे व दर्जांचे असते. तंबू, राहुट्या, शीड, बूट, वन कर्मचाऱ्यांचे गणवेश, पिशव्या, प्रवासी सामान, दप्तर वगैरेंसाठी हे वापरतात.  

कॅलिको कापड : साधे व बहुतकरून भडक रंगात छापलेले सुती कापड. मुळात कालिकत (आताचे कोझिकोडे) येथे बनविण्यात येणाऱ्या छापील व चांगल्या बनावटीच्या कापडावरून हे नाव आले असावे (काहींच्या मते कलकत्त्यावरूनही नाव पडले असण्याची शक्यता आहे.) सुरुवातीला शोभिवंत कामासाठी व नंतर घरगुती कपडे, झगे (एप्रन) वगैरेंसाठी हे वापरण्यात आले. 

कॅव्हलरी टि्‌वलकापड : भक्कम, जाडेभरडे कापड. यावर ६३ अंशाला दोन टि्‌वल विणींमुळे उमटून दिसणाऱ्या ठळक रेघा वर आल्याप्रमाणे दिसतात. लोकर, वर्स्टेड, सूत, कृत्रिम धागे यापासून हे बनवितात. घोडदळात घोड्यावर घालावयाच्या वस्तूंसाठी, बर्फावरच्या व अन्य खेळाडूंचे कपडे, गणवेश, ढगळ विजारी वगैरेंकरीता हे वापरतात. 

काउटील कापड : भक्कम, घट्ट विणीचे सुती वा सूत व रेयॉन यांचे कापड. काचोळी, उरोवस्त्र, अस्तर, पट्‌टे इत्यादींकरिता हे वापरतात. 


काऊंटरपेन कापड : आसने, गाद्या, बैठका इ. आच्छादण्यासाठी वापरण्यात येणारे चादरीसारखे कोणतेही कापड. 

काराकुल कापड : काराकुल मेंढीच्या अंगासारखे दिसणारे जाड, लोकरी तंतुमय कापड. स्त्रियामुलांचे कोट, टोप्या, गळपट्टे वगैरेंकरिता याचा उपयोग करतात. 

काश्मीर कापड : काश्मीर जातीच्या मेंढ्यांच्या मऊ लोकरीपासून बनविलेले तलम कापड. मुख्यत्वे शाली, स्वेटर, कोट व अन्य गरम कपड्यांसाठी हे वापरतात. 

कॉटनेड कापड : जाड, भक्कम, भरड व टि्‌वल विणीचे सुती कापड. विजारी, कामगारांचे कपडे, रबरयुक्त कापडाचा आधार, जाड अस्तर इत्यादींकरिता हे वापरतात. 

कॉर्डुरॉय कापड : विणताना ताण्याचे व बाण्याचे भरपूर धागे एकत्र राहतील अशा पद्धतीने विणकाम केल्यास घट्ट, वजदार, भक्कम व जणू दोऱ्याचे (कॉर्ड) विणकाम केले आहे, असा आभास निर्माण करणारे कापड. हे पांढरे वा रंगीत धाग्यांचे आणि सरळ वा टि्‌वल विणीचे असते . या दणकट कापडाला सुरकुत्या पडत नाहीत. कोट, जाकीट, खेळाडूंचे व अन्य कपडे इत्यादींकरीता हे वापरतात. पूर्वी फ्रेंच राजघराण्यातील व्यक्ती हे वापरीत म्हणून याला कॉर्ट्‌-द्यू-रॉय (राजे लोकांचे कापड) म्हणत. 

कृत्रिम (आर्ट) लिनन : (एंब्रॉयडरी क्रॅश). भरतकामासाठी विणलेले साधे लिनन कापड. लिननचे धागे सुयांनी विणून बनविलेले कापड, टेबल क्लॉथ, नॅपकीन वगैरेंसाठी वापरतात. लिननचे धागे सुयांच्या विणकामासाठी सोयीचे असतात. [⟶ लिनन]. 

केंब्रिक : चांगल्या घट्ट विणीचे मऊ सुती वा लिननचे तलम कापड. फ्रान्समधील कॅंब्रे गावावरून हे नाव पडले आहे. मुळात हे कापड चर्चमध्ये वापरण्यात येत असे. हातरुमाल, मुलांचे कपडे, अंतर्वस्त्रे, कॉलर, झगे वगैरेंसाठी हे वापरतात.

केसमेंट कापड : विविध विणींचे व पोतांचे आणि मुख्यत्वे पडद्यांसाठी वापरण्यात येणारे कापड. हे मर्सराइज्‌ड, सुती, रेशमी, मोहेर, रेयॉन, नॉयलॉन धाग्यांचे वा संमिश्र प्रकारचे असते. फर्निचरची आच्छादने, तक्के, लोड इत्यादींचे अभ्रे वगैरेंकरताही हे वापरतात. 

केसांचे कापड : कोणत्याही धाग्याचा ताणा व घोड्याच्या केसाचा बाणा वापरून बनविलेले कापड. अस्तर, वस्तू ताठर बनविणे, पडदे, अभ्रे वगैरेंसाठी हे वापरतात. 

कोव्हर्ट कापड : सामान्यतः लोकरींपासून बनविलेले टि्‌वल विणीचे व ओव्हरकोटासाठी वापरण्यात येणारे फिकट तपकिरी कापड. मुळात हे शिकारीच्या वेळी वापरीत. हे अतिशय टिकाऊ असते. हे सूत, कृत्रिम धागे व संमिश्र धाग्यांचेही असते. कोट, रेनकोट, घोडेस्वारीच्या वेळचे कपडे, खेळाडूंचे कपडे, गणवेश वगैरेंकरीता याचा वापर करतात.  

क्रॅश कापड : जाडेभरडे, खरबरीत पोताचे कापड. भरड व अनियमित धाग्यांपासून साध्या किंवा टि्‌वल विणीचा वापर करून हे तयार करतात. हे बहुधा लिननचे असते मात्र हे सुती, लोकरी वा रेयॉनचेही असते. क्रीडावस्त्रे, उन्हाळी कपडे, पडदे, अभ्रे, रुमाल, आवरणे वगैरेंकरीता हे वापरतात. 


क्रिनोलीन कापड : सुती ताणा व घोड्याच्या केसांचा बाणा यांपासून साध्या, टि्‌वल वा सॅटीन विणीने बनविलेले ताठर, विरविरीत व भक्कम कापड. अस्तर, टोप्यांचे आकार, फुगीर स्कर्टसारखे कपडे इत्यादींत याचा उपयोग होतो. नकली कापड हेंपपासून बनवतात.

क्रेटॉन कापड : शोभिवंत कामांसाठी वापरण्यात येणारे मोठ्या आकृती छापलेले चिटासारखे जाड कापड. मात्र हे चिटाप्रमाणे चमकदार नसते. हे सुती, फ्लॅक्स, कृत्रिम धागे वा यांच्या मिश्र धाग्यांचे असते. पडदे, फर्निचरची आच्छादने वगैरेंसाठी हे वापरतात. 

क्रेप कापड : सूत, रेशीम, रेयॉन, लोकर यांचे अथवा मिश्र धागे वापरून तयार करण्यात येणारे लवचिकपणा असलेले कापड. हा लवचिकपणा कापड विणताना वा नंतरच्या प्रक्रियेने आणतात. यामुळे कापड चुणीदार व उंचवटे असणारे दिसते. असा पोत सर्व कापडभर असून तो सूक्ष्म बुंदक्यापासून ते सालीसारख्या पोतापर्यंतचा असतो. असा पोत पुढील प्रकारे आणतात : सुताला अधिक पीळ देऊन, रासायनिक संस्करण करून, विणताना दिलेला ताण मधूनमधून कमी करून तसेच रूळाने अथवा दाब व उष्णता यांच्या साहाय्याने कापडावर उमटरेखन (उठावदार आकृती उमटवून) करून. अल्पाका, कॅंटन, क्रेप, जॉर्जेट, रोमेन, वुल, सॅड, क्रेप-बॅक-सॅटीन, क्रेप द. शिने इ. क्रेपचे प्रकार प्रसिद्ध आहेत. 

क्लोक कापड : अनियमित उंचवट्यांमुळे पृष्ठभाग फोड आलेल्या त्वचेप्रमाणे दिसणारे कापड. पोषाख, कोट इत्यादींसाठी हे वापरतात.

खण : (चोळखण). खणाळ्यातील (खणाच्या ताग्यातील) एका चोळीपुरता कापडाचा तुकडा. हा सर्वसाधारणपणे दीड हात (६७.५ सेंमी.) लांब असतो. जरीकाठी, बुट्टीदार, चौकटीदार इ. प्रकारचे खण असतात. ते सुती वा रेशमी असतात. मुख्यत्वे चोळी शिवण्यासाठी हा वापरतात व ओटी भरताना देतात. 

खाकी कापड : मुख्यतः खाकी व (ऑलिव्ह) रंगाचे टि्‌वल व ड्रिल कापड. पूर्व भारतात जमिनीच्या मंद पिवळसर तपकिरी रंगावरून हा शब्द आला आहे. सुतीप्रमाणेच लोकरी, लिननचे वा संमिश्र प्रकारचे खाकी कापड बनवितात. सैनिक, पोलीस, रक्षक दले, विद्यार्थी वगैरेंच्या गणवेशासाठी मुख्यतः हे कापड वापरतात. 

खादी : हाताने कातलेल्या सुतापासून हातमागावर बनविलेले विविध प्रकारचे कापड. बहुधा हे भरड असते. यात रेशीम व कृत्रिम धागेही वापरतात. कपडे, राष्ट्रध्वज, पडदे, अभ्रे वगैरेंसाठी हे वापरतात. [⟶ खादी उद्योग]. 

खिशाचे कापड : (पॉकेटिंग). खिशाकरिता वापरले जाणारे सामान्यतः भक्कम सुती कापड (उदा., ड्रिल, टि्‌वल, जीन, सॅटीन). जड, लवदार कपडही वापरतात. याचे अन्य कपडेही शिवतात. 

गवताचे कापड : (स्ट्रॉ). खोड, पाने, साल वगैरे वनस्पति-अवयवांपासून तंतू मिळतात. त्यांच्यापासून विणून, गुंफून वा लाटून कापड (चटई), टोप्या, पिशव्या, पादत्राणे वगैरे बनवितात. 

गॅबर्डीन : घट्ट विणीचे व ४५ (वा ६३) कोनात दिसणारी टि्‌वल वीण असलेले कापड. या वैशिष्ट्यपूर्ण विणीमुळे कापडावर कर्णाच्या दिशेत रेघा दिसतात. हे सुती, लोकरी, रेयॉनचे वा संमिश्र प्रकारचे असते. विविध प्रकारचे कपडे, रेनकोट, गणवेश, पादत्राणे, खेळाडूंचे कपडे इत्यादींकरिता हे वापरतात. 


गादीपाट : (गादलापाट). गाद्या, उश्या इ. बनविण्यासाठी वापरण्यात येणारे पट्‌ट्यापट्‌ट्यांचे वा चौकटीचे जाडसर, काहीसे भक्कम सुती कापड. 

गालिचे : जमिनीवर अंथरावयाचे जाड, जड व सामान्यपणे मऊ कापड. ते विणलेले, फेल्टप्रमाणे बनविलेले, सुयांनी विणलेले, गुंफलेले, बंधकाने चिकटवलेले व लाटलेले असते. सूत, ताग, हेंप, लोकर, गवत, मानवनिर्मित व अन्य तंतू याकरिता वापरतात. हे उलट सुलट वापरता येण्याजोगतेही असतात. हे तंतुमय, सपाट व छापील असतात. [ ⟶ गालिचे]. 

गाळण कापड : चाळणीसारखा उपयोग असलेले विविध प्रकारचे कापड. घट्ट विणीचे कापड बारीक कण, तर सैलसर विणीचे कापड भरड कण गाळून बाजूला काढण्यासाठी वापरतात. रेशमी, सुती, कृत्रिम तंतूंच्या धाग्यांप्रमाणेच तंतुरूप काचेपासूनही हे कापड बनवितात. वीण, धाग्याची जाडी, पोत व वजन यांमध्ये खूप विविधता असते. खाद्य पदार्थ, रंगलेप, खनिज तेल, तसेच विविध रासायनिक उद्योग यांमध्ये हे वापरतात. [ ⟶ गाळण क्रिया]. 

गॉझ कापड : विसविशीत धाग्यांचे व अतिशय विरळ विणीचे कापड. विरंजन व जंतुनाशक प्रक्रिया करून हे मलमपट्‌टीसाठी वापरतात. हव्या त्या रुंदीच्या याच्या पट्‌ट्या काढण्यात येतात. असेच विरळ विणीचे रेशमी व रेयॉनचे कापड पडदे. झालरी वगैरे शोभिवंत कामांसाठी वापरतात. अशा विणीचे कापड प्रथम गाझामध्ये (पॅलेस्टाइनमध्ये) बनल्यामुळे त्याला हे नाव पडले. 

गिंघम कापड : रंगविलेल्या धाग्यांपासून बनविलेले साध्या विणीचे बळकट सुती, लोकरी वा कृत्रिम धाग्यांचे कापड. सामान्यपणे रंगीत धागे वापरूनच कापडावर चौकटी वा पट्टे निर्माण केलेले असतात. कपडे, झगे, पायजमे, पिशव्या इत्यादींसाठी याचा वापर करतात.  

गुंफलेले कापड : धाग्यांचा एक संच एकत्र गुंफून व विशिष्ट आकृतिबंध बनवून तयार केलेले कापड. हे सामान्यतः अरुंद असते. हे नळीसारखे वा वर्तुळाकार पण असते. याकरिता कृत्रिम धागे, लोकर, रेशीम, सूत वा अन्य धागे वापरतात. झालर, बंद, पट्टे, शोभिवंत कामे वगैरेंसाठी याचा उपयोग होतो. 

गोणपाट : (हेसियन). तागाच्या मजबूत धाग्यांपासून बनविण्यात येणारे जाड, भरड कापड. पोती, आवेष्टन, गालिच्याचा तळ, शोभिवंत वस्तू वगैरेंकरिता याचा उपयोग होतो. 

ग्रॅनाइट कापड : पिळदार व कडक लोकरीच्या धाग्यांपासून ग्रॅनाइट वीण वापरून विणलेले कापड. या विणीमुळे कापडाचा पृष्ठभाग लहान, खड्यांनी व्यापलेल्या पृष्ठासारखा (ग्रॅनाइट दगडाप्रमाणे) खरखरीत दिसतो. सुतापासूनही असे कापड बनवितात. हे कापड स्कर्ट, सूट इ. कपड्यांसाठी वापरतात.

ग्रे कापड : मागावरून काढलेले व ज्यावर कोणतीही सुकी वा ओली प्रक्रिया केलेली नाही असे कापड. यापासून बनविलेल्या कपड्यांनाही ग्रे कपडे म्हणतात. अशा सुती कापडाचा रंग करडा नसून सामान्यपणे फिकट बदामी असतो. 

ग्लोरिया कापड : घट्ट विणीचे, वजनाला हलके तलम कापड, रेशमाचा ताणा व सुती बाणा वापरून पूर्वी हे बनवीत. हे दोन्ही धागे मर्सराइज्ड सुताचे वा अन्य कृत्रिम धाग्यांचेही वापरतात. याची वीण सामान्यपणे साधी असली, तरी टि्विल व सॅटीन वीणही वापरतात. हे मुख्यत्वे छत्र्यांकरिता व काही कपड्यांसाठी वापरले जाते. 


घोंगडी : (कांबळे). सामान्यपणे कच्च्या लोकरीपासून बनविलेले सैलसर विणीचे जाडेभरडे कापड. हे बहुधा काळे वा करडे असून अंथरण्या-पांघरण्यासाठी वापरतात. रुंदीच्या दिशेत दोन घोंगड्या शिवून बनविलेल्या वस्त्राला कांबळा म्हणतात. 

चटई : काथ्या, ताग, गवत इ. विणून अथवा गुंफून बनविण्यात येणारे विविध प्रकारचे भरड कापड. आच्छादन, शोभिवंत काम इत्यादींकरिता याचा उपयोग करतात. [⟶ चटया].  

चटई(बास्केट) विणीचे कापड : एकापेक्षा अधिक धागे उभे व आडवे घेऊन विणकाम केल्यास असे चटईप्रमाणे दिसणारे कापड मिळते. हे ख्रिस्ती धर्मगुरूंचे, खेळाडूंचे कपडे बनविण्यासाठी व विशिष्ट प्रकारच्या भरतकामासाठी वापरतात. शार्कस्किन, हॉपसॅक इ. याचे प्रकार होत. 

चद्दर : साध्या वा टि्विल विणीचे, ठराविक लांबी-रुंदीचे गाद्यांवर घालायचे अथवा पांघरण्याचे सुती कापड. विणकामात यावर शंकरपाळ्यांसारखा व मधमाश्यांच्या पोळ्यासारखा आकृतिबंध तयार झालेला असतो. एक प्रकारच्या उबदार (लोकरी वा शेळीच्या केसांच्या) शालीलाही हे नाव देतात. 

चलोटा कापड : भारी प्रतीचे अहमदाबादेला तयार होणारे सुती (मसलीन) कापड. कटिवस्त्रांसाठी हे मुख्यतः वापरतात. याच्यासारख्या येथे तयार होणाऱ्या व भारतभर वापरल्या जाणाऱ्या भारी सुती कापडाला चालटोला म्हणतात. 

चाटी कापड : तागापासून बनविण्यात येणाऱ्या व पोत्यांकरिता वापरण्यात येणाऱ्या गोणपाटाला उत्तर भारतात चाटी म्हणतात. 

चादर : (शीटिंग). सरळ विणीचे, रुंद पन्ह्याचे सुती कापड. कधीकधी याकरिता टि्विल वीणही वापरतात. बहुतकरून हे सुती असते. मात्र नायलॉन, रेशीम, फ्लॅक्स इ. धाग्यांचेही कधीकधी बनवितात. याचा पन्हा ग्राहकाच्या गरजेनुसार ठरतो. मुख्यतः गाद्यांवरील चादरी व औद्योगिक वापरांसाठी (उदा., तेल कापड, आच्छादन, खिडक्यांच्या पडद्या) याचा वापर होतो.

चारखाना कापड : चौकटी असलेले तलम सुती कापड. कधीकधी हे सुती व रेशमी असे संमिश्रही असते. प्रथम हे डाक्क्याला बनवीत. आता भारतात सर्वत्र बनवितात. मोठ्या चौकटींचे कापड अधिक लोकप्रिय आहे. 

चालिस कापड : मऊ, वजनाला हलके, नरम व साध्या विणीचे कापड. हे लोकर, रेयॉन, सूत, रेशीम वा संमिश्र धाग्यांचे असते. सामान्यतः याच्यावर लहान पाने फुले छापतात. स्त्रियामुलांचे कपडे, पायजमा, किमोनो, पलंगपोस, लांब गळपट्टे, झगे वगैरेंकरीता हे वापरतात. 

चाळणी (बोल्टिंग) कापड : न उकळलेल्या रेशमी धाग्यापासून बनविलेले ताठ, पारदर्शक, जाळीदार कापड. आता हे कृत्रिम धाग्यांपासून बनवितात. पीठ चाळण्याकरिता पिठाच्या गिरण्यांमधून हे वापरतात. तसेच जाळी मुद्रण, केसाच्या टोपांचे आधारतळ वगैरेंसाठी वापरतात. 

चिंचिल्ला कापड : जाड, स्पंजसारखे लोकरीचे दुपदरी टि्विल विणीचे वा सुयांनी विणलेले तंतुमय कापड. भक्कमपणासाठी सुती ताणा वापरतात. झुबके व उंचवटे यांमुळे याचे पृष्ठ उंचसखल असते. कोट, गणवेश वगैरेंकरिता हे वापरतात. 


चिटाचे कापड : (चिंट्‌झ). मुळात भारतात बनणाऱ्या ठिपकेदार वा चित्रे, नक्षी काढलेल्या कॅलिको कापडाला हे नाव देण्यात आले होते. आता चमकदार आणि फुले, पाने, पक्षी यांची आल्हाददायक नक्षी छापलेल्या कापडाला हे नाव देतात. याची चमक कायमची वा तात्पुरती असते. उन्हाळी कपडे, मुलांचे कपडे, आच्छादने इत्यादींसाठी हे वापरतात. चमक नसलेल्या चिटाच्या कापडाला क्रेटॉन म्हणतात. 

चीज क्लॉथ : वजनाला हलके, पातळ, सैलसर व साध्या विणीचे सुती कापड. खळ देतात व रंगवितातही (बंटिंग). चहाच्या पिशव्या (टी बॅग्ज), फुगीर कपडे, गॉझ, ताठरपणा आणणारे कापड म्हणून इ. याचे उपयोग आहेत. मुळात हे चीज, लोणी व मांस गुंडाळण्याकरिता वापरीत म्हणून हे नाव पडले.  

चुणीनिरोधक कापड : सहजपणे सुरकुत्या पडत नाहीत असे कापड. सुरकुत्या पडणे हा सुती कापडाचा महत्त्वाचा दोष घालविण्यासाठी त्यावर रासायनिक संस्करण (मुख्यत्वे संश्लेषित रेझिनाचे संस्करण) करून असे कापड बनवितात. ‘धुवा व वापरा’ हे अशाच प्रकारचे कापड होय. [⟶ कापडावरील अंतिम संस्करण]. 

चेल : गुजरातमध्ये बनणारे छापील सुती कापड. बहुधा छपाई कापडभर असते. छपाई तुटक असल्यास याला चीट व रंगीत कापडावर छपाई असल्यास भंडू म्हणतात. 

चेव्ह्यिऑट कापड : सूट व ओव्हरकोट यांकरिता वापरण्यात येणारे जाडेभरडे टि्विडसारखे लोकरीचे कापड. चेव्ह्यिऑट (स्कॉटलंड) येथील लोकरीपासून बनवीत म्हणून हे नाव पडले. आता भरड लोकरी धाग्यांच्या साध्या व टि्विल विणीच्या कापडाला हे नाव देतात. 

चोटी कापड : तागाच्या जाड धाग्यांपासून बनविण्यात येणारे गोणपाट. प्रथम डाक्क्यात बनविण्यात आलेले हे कापड पोत्यांकरिता वापरतात. 

चोप्पट कापड : बिहारमध्ये बनविण्यात येणारे, वजनाला हलके, टफेटासारखे रेशमी कापड. 

चौकटीचे कापड : (चौकडा चेक). सर्वसाधारणपणे चौकोनी आकृती (चौकटी) बनतील अशा रीतीने विणलेले कापड. यात काही पांढरे व अन्य एका वा अनेक रंगांचे धागे असतात. रंगीत धाग्यांच्या चौकटीत मधून मधून पांढरा धागा हे याचे वैशिष्ट्य होय. छापील चौकटीही असू शकतात.  

चौवतर कापड : मद्रासकडे तयार होणारे एक प्रकारचे तलम कापड.  

चौसुती कापड : जाड सुताचे जड व साध्या विणीचे सुती कापड. तंबू, झटकण्या वगैरेंकरीता हे वापरतात. 

छत्रीचे कापड : छत्रीसाठी वापरण्यात येणारे घट्ट विणीचे नायलॉनसारख्या कृत्रिम धाग्यांचे कापड. रेशमी, सुती वा संमिश्र कापडही याकरिता वापरतात. यावर पाणी शोषले न जाता ओघळून जाईल अशा प्रकारची प्रक्रिया करतात. सामान्यतः हे काळ्या रंगाचे असले, तरी विविध रंगांचे व नक्षीचे कापडही असते, ते विशेषतः स्त्रियांच्या छत्र्यांसाठी वापरतात. कधीकधी प्लॅस्टीकचे पटल वा लेप दिलेले कापडही छत्रीसाठी वापरतात. 


छाटी : संन्याशाच्या अंगावरचे वस्त्र.

छापील कापड : पांढऱ्या अगर रंगीत कापडावर लाकडी ठसे, जाळी रूळ, फवारा इत्यादींच्या मदतीने छपाई करून बनविलेले कापड. छपाई एका वा दोन्ही बाजूंना असते. कापडाच्या प्रकारानुसार त्याचे उपयोग होतात. [⟶ कापड छपाई]. 

छापील ताण्याचे कापड : (शॅडो टिश्यू). कापडात ज्या क्रमाने ताण्याचे धागे राहतील तसे ते ठेवून त्यावर विणकामाआधी नक्षी छापतात. पांढरा वा एखाद्या रंगाची छटा असलेला वाणा वापरून कापड विणतात. यामुळे तयार होणाऱ्या नक्षीची बाह्यरेखा व रंग काही प्रमाणात छाया पडल्यासारखा दिसतो. हे सुती कापड पडदे व सैल अभ्रे यांकरिता वापरतात. 

जरतारी कापड : परंपरागत कापडामध्ये जरीचा वापर करून बनविलेले कापड. उदा., सोन्याची, चांदीची वा खोटी (ॲल्युमिनियमची) जर वापरून बनविलेले रेशमी कापड. सामान्यपणे जर रेशमी कापडात ते शोभिवंत करण्यासाठी वापरतात. 

जर्सी कापड : यांत्रिक सुयांनी विणलेले साधे, लवचिक कापड. मुळात हे लोकरीचे बनवीत. नंतर सुती, रेशमी, कृत्रिम तंतू वा संमिश्र धाग्यांचे असे कापड बनविण्यात येऊ लागले. धाग्यानुसार याचे विविध उपयोग होतात. इंग्लंडच्या न्यू जर्सी बेटावर प्रथम खलाशांच्या कपड्यांसाठी बनविण्यात आल्याने हे नाव पडले. कपडे, अंतर्वस्त्रे, खेळाडूंचे पोषाख, स्वेटर, हातमोजे वगैरेंकरीता हे वापरतात. 

जाजम : रंगविलेल्या चिटाचे व तळाला अस्तर असलेले बिछायतीचे वस्त्र. 

जाळीचे कापड : मागावर वा सुयांनी विणून, गुंफून वगैरे प्रकार बनविलेले जाळी असणारे कापड. हे रेशमी, लोकरी, सुती, फ्लॅक्सचे, कृत्रिम वा संमिश्र धाग्यांचे असते. अंतर्वस्त्रे, स्वेटर्स, हातमोजे, उन्हाळी कपडे, क्रीडावस्त्रे, पिशव्या वगैरे असंख्य वस्तूंकरिता हे वापरतात. 

जाळीदार लिनन : विरळ विणीचे फ्लॅक्सचे अथवा फ्लॅक्स व सुताचे मागावर वा सुयांनी विणून बनविण्यात आलेले कापड. हे अतिशय मजबूत असून सहज धुता येते. मुलांचे कपडे, सदरे, अंतर्वस्त्रे, वगैरेंसाठी हे वापरतात. 

जॉर्जेट : क्रेप प्रकारचे वजनाला हलके, तलम कापड. हे रेशीम, रेयॉन, नायलॉन इ. तंतूंपासून बनवितात. लवचिकपणा, नरमपणा आणि सुबकपणा ही याची वैशिष्ट्ये होत. विशेषकरून हे स्त्रियांच्या कपड्यांसाठी व वस्तूंसाठी वापरतात.  

जीन कापड : टि्विल विणीचे मजबूत सुती कापड. सामान्यपणे निळा व करडा हे रंग याला देतात. अर्थात अन्य रंगांचे व पट्टेदार कापडही असते. विजारी, कामगारांचे व खेळाडूंचे कपडे, डॉक्टर व परिचारिकांचे गणवेश, शोभिवंत काम, औद्योगिक वस्तू इत्यादींकरिता हे वापरतात. 

झेफिर कापड : वजनाला हलके, पातळ, तलम व सरळ विणीचे सुती कापड. रंगसामान्यतः फिकट असतो. कधीकधी कापडात मधून मधून चमकदार रंगीत धागे वापरतात. पोषाख, ब्लाऊझ वगैरेंकरिता हे वापरतात. 


टफेटा कापड : दोन्ही बाजूंनी मऊ (सुळसुळीत) असलेले, साध्या विणीचे व बहुधा चमकदार असलेले कापड. मुळात हे रेशमाचे बनवीत. आता सुती, लोकरी वा कृत्रिम धाग्यांचे कापडही बनवितात. सामान्यतः फिकट रंगाचे, छापील, धूपछाँव (रंगपालट दर्शविणारे) प्रकारचे असते. क्वचित याला चमक नसते. अतिशय तलम, साध्या विणीचे रेशमी वस्त्र या अर्थाच्या टफटाह या पर्शियन शब्दावरून हे नाव आले आहे. टि्वल विणीचे (फेल्ले), जवळजवळ पारदर्शक कागदासारखे कडक (टिश्यू पेपर) इ. याचे प्रकार आहेत. हे पोषाख, सूट, पडदे, अस्तर, चादरी, झालर इत्यादींसाठी वापरतात. 

टर्किश टॉवेल : टेरी पद्धतीने विणकाम करताना कापडाच्या एका वा दोन्ही बाजूंवर सर्वत्र लोंबते टाके वा फासे तयार होऊन बनलेले कापड. हे विविध पोतांचे, जाडीचे व वजनाचे असतात. ते एकरंगी, अनेक रंगी, जॅकार्डने विणलेली नक्षी असलेले सुंदर किनारीचे असतात. पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेतात. उपयोगानुसार यांचे आकारमान ठरते. (उदा., आंघोळीचे, हात पुसण्याचे, सागर किनारी अंगाभोवती गुंडाळण्याचे इत्यादी). हे सुती वा लिननचे असतात. सुयांनी विणूनही अशा तऱ्हेचा पृष्ठभाग बनवितात. 

टसर कापड : जंगली रेशमी किड्यांपासून मिळणाऱ्या रेशमापासून बनविलेले कापड. टसर रेशीम नेहमीच्या रेशमापेक्षा भरड, कमी चमकदार व काहीसे ताठ असते. ते चांगल्या प्रकारे रंगविता येत नाही, म्हणून ते तसेच वापरतात. यामुळे कापड बदामी रंगांचे, भरड पोताचे व कमी झगझगीत दिसते. (उदा., शॅंटुंग). 

रेशीम व अन्य धाग्याच्या मिश्रणानेही असे कापड बनवितात. शिवाय तलम सुती ताणा व त्याहून जाड बाणा सरळ विणीने विणून बनविण्यात येणाऱ्या कापडालाही टसर म्हणतात. 

टॅपेस्ट्री कापड : जॅकार्ड पद्धतीने चित्रे, नक्षी विणून बनविलेले जाड, भक्कम व शोभिवंत कापड. हे सुती, लोकरी वा रेशमी असते. भिंतीवर टांगायचे शोभिवंत देखावे, पडदे, गाद्यागिर्द्यांचे अभ्रे, चादरी, आच्छादने, मंडप, छत्र्या वगैरेंकरिता हे कापड वापरतात.  

टिकिंग कापड: मजबूत, टिकाऊ, घट्ट असे साध्या, टि्वल वा सॅटीन विणीचे कापड. यातील ताण्याचे धागे रंगीत असतात व त्यामुळे हे पट्‌ट्यापट्‌ट्यांचे दिसते (कधीकधी हवा तो आकृतिबंध यावर छापतात). हे सुती वा लिननचे असते. याचा उपयोग फर्निचर, उश्या, बैठकी वगैरेंची आच्छादने, अस्तर, तंबू, पडदे इत्यादींसाठी करतात. 

 

टेनिस कापड : मुळात सुती ताणा व लोकरी बाणा वापरून बनविलेले ट्‍विल विणीचे कापड. ब्रॅडफर्ड (इंग्‍लंड) येथे हे प्रथम बनविण्यात आले व टेनिस (म्हणून नाव) वा तत्सम खेळ खेळणाऱ्यांचे कपडे बनविण्यासाठी हे तयार करीत. आता यात अन्य धाग्यांचाही उपयोग करतात. मात्र याचा रंग पांढरा व सायरंगी असतो. अन्य कपड्यांसाठीही हे वापरतात. 

टेरी कापड : (टर्किश कापड). ताण्याचे काही धागे ढिले ठेवून कापडाच्या एका अगर दोन्ही बाजूंवर धाग्याचे फासे निर्माण करून बनविलेले कापड. बहुतकरून हे सुती असते. जॅकार्ड पद्धतीनेही विणतात. रंगीत, नक्षीदारही असते. कापडभर असणाऱ्या फाशांमुळे हे कापड पाणी चांगले शोषून व टिपून घेते. स्नानासाठीचे रुमाल (टॉवेल), झगे, स्नानगृहातील पडदे, मुलांचे कपडे इत्यादींसाठी हे वापरतात. 

टोबॅको कापड : वजनाला हलके, पातळ, सैलसर व साध्या विणीचे सुती कापड. हे चीज क्लॉथसारखे असते. तंबाखूच्या झाडांवर सावली पडावी म्हणून आच्छादनासाठी (म्हणून नाव), मलमपट्टी, पडदे इत्यादींकरीता हे वापरतात. 

टि्वलकापड : टि्वल वीण वापरून बनविलेले मजबूत, टिकाऊ व घट्ट कापड. या विणीत मागावर एक धागा खाली व दोन वा अधिक धागे वर असे विणकाम करतात. यामुळे कापडावर तिरप्या रेघा दिसतात. हे बहुतेक प्रकारच्या धाग्यांचे असते आणि याचे असंख्य प्रकार व उपयोग आहेत (उदा., विविध प्रकारचे कपडे). 


ट्‌वीड कापड : काहीसा केसाळ पृष्ठभाग असलेले खरबरीत, मजबूत लोकरी कापड. लोकर रंगवून तिच्यापासून हाताने धागा कातून हातमागावर हे कापड प्रथम बनवीत असत. स्कॉटलंड व इंग्लंड यांना विभागणाऱ्या ट्‌वीड नदीच्या किनारी भागात हे प्रथम बनविण्यात आल्यामुळे त्याचे हे नाव पडले. हे दोन वा अधिक रंगांच्या धाग्यांपासून बनवितात. यावर चौकटीसारखे अनेक आकृतिबंध विणतात. कोट, सूट, पोषाख वगैरेंकरीता हे वापरतात.

ठाण : बंगालमध्ये शर्टिंग-सुटिंगसाठीच्या ताग्याला ठाण म्हणतात. त्याची लांबी ६.३० ते ४५ मी.पर्यंत असते. सामान्यपणे जाड, योग्य विणीच्या तसेच पीळ दिलेल्या व विरंजित रेशीम वापरून बनविलेल्या कोऱ्या, रेघा वा चौकटी असलेल्या कापडासाठी हा शब्द वापरतात. पीळ न देता बनविलेल्या व नंतर चिकट पदार्थ काढून टाकण्यासाठी धुतलेल्या कापडाला कोरा म्हणतात. हे जपानी हाबुताई कापडासारखे दिसते व छापील साड्या बनविण्यासाठी याचा उपयोग करतात.  

डंगरी कापड : जाड सुतापासून बनविलेले मजबूत, भरड व टिकाऊ कापड. पूर्वी नावाड्यांच्या कपड्यांसाठी वापरीत. आता वरून घालावयाच्या कामगारांच्या कपड्यांसाठी वापरतात. डेनीम कापडाला पर्यायी म्हणूनही हे नाव वापरतात. 

डक : घट्ट व सरळ विणीचे मजबूत, चिवट कापड. हे मुख्यतः सुती व कधीकधी लिननचे असून याचे अनेक प्रकार आहे. हे सर्वांत भक्कम व जड असू शकते. सर्वसाधारणपणे हे पांढरे असते. क्वचित रंगीतही असते. कोट, जाकीट, एप्रन, पट्टे, पिशव्या, तंबू, शिडे इत्यादींकरीता हे वापरतात. (नंबर, आर्मी, औंस इ. नावांनी याचे प्रकार ओळखले जातात.) 

डाक्क्याची मलमल : अतिशय तलम व वजनाला हलके सुती कापड. हाताने कातलेल्या सुतापासून (२५० पेक्षा अधिक बारीक सुतांकाचे) हातमागावर हे कापड विणतात. जगातील एक सर्वोत्कृष्ट मसलीन म्हणून हे कापड गणले जाते. [⟶ मलमल]. 

डायमंड (डायापर) लिनन : चौकटी वा पक्ष्याच्या डोळ्यासारखी नक्षी विणून तयार करण्यात येणारे कापड. असे सुती कापडही बनवितात. त्यात पाणी शोषण्याचा गुण असतो. रुमाल, नॅपकिन, मुलांचे कपडे, आच्छादनासारख्या शोभेच्या वस्तू इत्यादींसाठी याचा वापर होतो. 

डालमियान कापड : पंजाबमध्ये तयार होणारे जाळीदार रेशमी कापड. 

डिमिटी कापड : उठावदार रेघांमुळे पट्टेदार वा चौकटीचे दिसणारे घट्ट सुती कापड. ताण्याच्या दोन, तीन वा अधिक धाग्यांचा गुच्छ करून त्याच्या उठावदार रेघा बनवितात. दोन, तीन वा अधिक ताणे वापरून चौकटी निर्माण करतात. दुहेरी धागा अर्थाच्या ग्रीक शब्दावरून हे नाव पडले आहे. स्त्रिया-मुलांचे कपडे, झगे, पडदे, आच्छादने, पायजमे, अंतर्वस्त्रे वगैरेंसाठी हे वापरतात. पूर्वी रेशीम, फ्लॅक्स व लोकरीचेही असे कापड बनवीत. 

डेनीम कापड : रंगीत (निळा, करडा व तपकिरी) ताण्याचा धागा व पांढरा बाण्याचा धागा वापरून मागावर विणण्यात येणारे सुती टि्वल कापड. हे कापड प्रथम नीम (फ्रान्स) येथे बनविण्यात आले (आणि यावरून हे नाव पडले-सर्ज दि नीम). हे विजारी, कामगारांचे कपडे, आच्छादने यांकरिता, तसेच पातळ वजनाला हलके कापड पडदे, खेळाडूंचे कपडे वगैरेंसाठी वापरतात. कधीकधी हे पट्टेदार वा चौकटीचे असते. 

डोनगल ट्‌वीड कापड : साध्या वा टि्वल विणीचे जाडेभरडे लोकरी कापड. सूट, कोट यांकरिता हे वापरतात. 


डोस्किन कापड : उत्तम प्रतीचे, मध्यम वजनाचे, घट्ट विणीचे आणि मऊ-आखूड तंतुमय लोकरी कापड. विजारी, कोट, घोडेस्वारीच्या वेळचे कपडे, गणवेश, खेळाडूंचे कपडे, जाकीट इत्यादींसाठी हे वापरतात. असेच सुती व रेयॉनचेही कापड असते. 

ड्यूफेल कापड : भरपूर तंतुमय जाडेभरडे लोकरी कापड. प्रथम या नावाच्या गावात बनविले म्हणून नाव पडले. ओव्हरकोट, खेळाडूंचे कपडे इत्यादींकरिता हे वापरतात. 

ड्रजेट कापड : भरड, सैलसर, फेल्टसारखे व एका बाजूला तंतुमय असलेले लोकरी, सुती, ताग वा यांचे संमिश्र कापड. जमिनीवर अंथरण्यासाठी व गालिच्यावर आच्छादण्यासाठी हे वापरतात. सुती ताणा व तागाचा वा उंटाच्या केसांचा बाणा वापरून विणलेल्या जाड्याभरड्या बुरणुसाकरिताही भारतात ही संज्ञा वापरतात.  

ड्रिल कापड : ताण्याचे किंवा बाण्याचे एक व नंतर दोन वा तीन आणि त्यानंतर पुन्हा एक व पुन्हा दोन वा तीन असे धागे विणकामात घेऊन म्हणजे ड्रिल वीण वापरून तयार केलेले कापड. हे बहुधा सुती, कधीकधी लिननचे असते आणि मजबूत असल्याने टिकाऊ असते. (बहुधा विणीचा आकृतिबंध तीन धाग्यांवर पुनरावृत्त होतो म्हणून तीन धागे या अर्थाच्या ट्रिलेक्स या शब्दावरून हे नाव आले). कामगारांचे कपडे, खिसे, बुटांचे अस्तर, पुस्तकबांधणी, उरोवस्त्र वगैरेंकरीता हे वापरतात. 

तंतुरूप काचेचे कापड : काचेच्या तंतूंपासून बनविण्यात येणारे कापड. हे मजबूत व लवचिक असते. उष्णता, हवा, वाफ, रसायने यांचा यावर परिणाम होत नाही. पडदे, आगनिरोधक कपडे, रसायने, विद्युत्‌ व ध्वनी यांचे निरोधन, वस्तू मजबूत बनविण्यासाठी, दिव्यांची आच्छादने वगैरेंकरिता याचा उपयोग होतो. [⟶ काच, तंतुरूप]. 

तंतुरूप/लवदार कापड : कापडाच्या एका वा दोन्ही बाजूंवर फासे तसेच राखून वा एकसारखे कापून तंतुमय रचना निर्माण केली जाते. हे सर्व प्रकारच्या धाग्यांपासून बनवितात. व्हेल्व्हेट, कॉर्डुरॉय, टर्किश टॉवेल वगैरे या प्रकारच्या कापडाची उदाहरणे होत. हे मऊ वा राठही असते. 

तंबूचे कापड : तंबूसाठी वापरले जाणारे मजबूत, जलाभेद्य कापड. विशेषतः डक वा कॅनव्हास यांचे कमीजास्त वजनाचे अनेक प्रकार यात येतात. हे बहुधा सुती वा कृत्रिम धाग्याचे असते. 

तरंगाकार कापड : लोकरीच्या भरड धाग्यांपासून बनविलेले व पृष्ठभाग लाटांप्रमाणे दिसणारे कापड. कधीकधी यात सूत वापरतात व अशा प्रकारचे संपूर्ण् सुती कापड बनवितात. लोकरी कापड टि्वल विणीने वा सुयांनी विणून तयार करतात. निरनिराळ्या कपड्यांसाठी हे वापरतात. 

तागाचे कापड : तागाच्या तंतूंपासून बनविण्यात येणारे कापड. ब्रॅटिस, बकराम, बरलॅप, हेसियन (किंतान, गोणपाट), स्क्रिम, ताडपत्री, गालिचाचे कापड इ. याचे प्रकार आहेत. पोती, पायपुसणी, पिशव्या, आच्छादने, शोभिवंत वस्तू इत्यादींसाठी याचा उपयोग करतात. 

ताडपत्री : भक्कम पण वजनाला हलके जलाभेद्य कापड. मुळात सुती डक कापड डांबराने जलाभेद्य बनवून ते तयार करीत. ताग, हेंप वा कृत्रिम धाग्याच्या कापडाला डांबर, रंग अथवा अन्य द्रव्य लावून ते जलाभेद्य करतात. मुख्यत्वे मालवाहतुकीच्या वेळी माल अथवा वाहन आच्छादण्यासाठी हे वापरतात. तंबू, राहुट्या बनविण्यासाठीही हे वापरतात. 


त्यूल कापड : षट्‌कोणी जाळीचे नाजूक, तलम, पातळ असे रेशमी, सुती वा कृत्रिम धाग्यांचे कापड. त्यूल या फ्रान्समधील गावावरून नाव पडले. स्त्रियांची उंची अंतर्वस्त्रे, झालर, भरतकाम, बुरखा, लग्नाचे व संगीतिकांचे (बॅले) पोषाख व टोप्या, लेस इत्यादींमध्ये याचा वापर करतात.

दमास्क कापड : विणकाम करतानाच जॅकार्डच्या साहाय्याने निरनिराळ्या आकृत्या बनवून तयार करण्यात येणारे जाडसर, चिवट व चमकदार कापड. हे उलटे वापरता येते. हे सुती, रेशमी, लोकरी, लिनन इ. प्रकारचे असते. मुळात हे चीनमध्ये बनविले आणि अंगच्या फुलापानांच्या आकृती असणारे हे उंची रेशमी कापड दमास्कसमधून यूरोपात आले (म्हणून नाव पडले असावे). आता यावर श्रमकौशल्याने बनविलेल्या पानाफुलांच्या वा भूमितीय आकृत्या विणकामातच तयार करतात. टेबलक्लॉथ, नॅपकिन, पडदे, आच्छादन वगैरेंसाठी हे वापरतात. हे एक सर्वांत जुने आणि सर्वांत लोकप्रिय असलेले कापड आहे. कधीकधी यावर जरीकामही करीत असत. हे किनखाब कापडाप्रमाणे असले, तरी अधिक सपाट असते. 

दुपदरी कापड : (बॅक्ड फॅब्रिक). कापडाच्या पाठीमागील भागावर एक जादा (लोकरी, सुती वा वर्स्टेड) ताणा व बाणा किंवा दोन्ही विणून अधिक जाड व जड बनविलेले कापड. हे उबदार, विविध रंगी, विविध आकृतीबंध व निरनिराळी गुणवैशिष्ट्ये असलेले असते. कोट, विजारी, बंड्या, स्कर्ट, पांघरुणे व शोभिवंत कामे यांकरिता हे वापरतात. 

दुलई (रजई) कापड : कापडांच्या दोन थरांमध्ये कापूस, लोकर इ. एकसारख्या प्रमाणात पसरून व दोन्ही थर पक्क्या गाठीचे टाके (क्विल्ट) घालून शिवले असता बनणारे कापड. क्वचित या दोन थरांत एखादे अस्तरही घालतात. उबदार कपडे (जाकीट, कोट), अस्तर, पांघरूण, झोपावयाची बंदिस्त गादी, चादर इत्यादींकरिता हे वापरतात. गोधडी, वाकळ वा लेपाटे हे याचे ग्रामीण रूप म्हणत येईल. 

दुहेरी कापड : (डबल क्लॉथ). ताण्याच्या धाग्यांचे दोन संच आणि बाण्याच्या धाग्यांचे दोन वा एक संच एकाच मागावर एकाच वेळी लावून कापडाचे एकमेकांत गुंतलेले दोन थर विणून बनविलेले कापड. हे थर पुढील वा मागील बाजूवरील विशिष्ट दोऱ्यांनी एकत्रित बांधलेले असतात. दोन्ही बाजूंचे रंग वा नक्षीकाम भिन्न-भिन्न असल्यास कापड उलटसुलट वापरता येते. दोन थर निरनिराळ्या धाग्यांचे विणीचे वा पोतांचे असू शकतात. हे कापड ओव्हरकोट, पांघरूणे, गाळण कापड, फिती वगैरेंकरिता वापरतात. 

दोन्ही बाजूंनी वापरण्यायोग्य कापड : कोणत्याही बाजूने वापरता येईल असे कापड. अशा कापडाच्या दोन्ही बाजू तंतोतंत सारख्या असतात. त्यामुळे शिवताना खास काळजी घ्यावी लागत नाही. पुष्कळदा दोन्ही बाजूंचा पोत वा त्यावरील नक्षी एकाच तऱ्हेची नसते पण दोन्ही बाजूंनी कापड वापरण्यायोग्य असते. काही कपडेही (उदा., स्वेटर) दुहेरी विणकाम करून उलट वा सुलट घालता येण्यासारखे बनवितात. 

दोसुती कापड : ताण्यात वा बाण्यातही दुहेरी धागे घेऊन विणलेले सुती कापड. साध्या विणीचे हे कापड मजबूत असते. 

धाबळी : सोवळ्यात नेसावयाचे लोकरीचे जाडेभरडे वस्त्र. कधीकधी पांघरण्यासाठी याचा उपयोग होतो.

धूपछॉंव कापड : फिरत्या रंगांचे रेशमी कापड. सामान्यपणे हिरवा व लाल रंग यात एकत्रितपणे वापरतात. हे सर्व प्रकारच्या कपड्यांसाठी वापरतात. 

धोतर : सरळ विणीचे तलम वा मध्यम वजनाचे व खास धोतरासाठी बनविण्यात येणाऱ्या काठाच्या कापडाला धोती म्हणतात. या कापडाचा कोठे कोठे कपडे, मुंडासे (फेटा, पागोटे), उपरणे वगैरेंकरिताही वापर होतो. हे सामान्यतः विरंजित असते. याची लांबी २.७ ते ४.५ मी. व रुंदी (उंची) १११ ते १३७ सेंमी. असते. रेशीम काठी धोतरेही प्रसिद्ध आहेत. 


न आकसणारे कापड : सर्वसाधारण धुलाईमध्ये रंग न जाणारे व न आटणारे कापड. सामान्यपणे या कापडाची तशी परीक्षा घेऊन खात्री केलेली असते. सन्फोरायझिंग ही या कापडावर करण्यात येणारी एक प्रक्रिया आहे. याचे कपडेही धुलाईत आटत किंवा विटत नाहीत. याने कपडे उभ्या व आडव्या दिशांत एक टक्क्यापेक्षा जास्त आक्रसत नाहीत. [ ⟶ कापडावरील अंतिम संस्करण]. 

न विणलेले कापड : रासायनिक बंधकांनी तंतू गुंतवून अथवा विशिष्ट तंतू यांत्रिक बळ, रेझीन, रासायनिक विक्रिया, आर्द्रता, दाब व उष्णता यांच्या मदतीने चिकटवून तयार करण्यात येणारे कापड. नॅपकिन, पुसण्याची फडकी, चहाचे तबक, कृत्रिम चामडे इत्यादींकरिता हे वापरतात. 

नळीसारखे कापड : यंत्रमाग वा यांत्रिक सुयांच्या मदतीने बनविण्यात येणारे कडा (बाजू) नसणारे नळीसारखे कापड. अंतर्वस्त्रे, बिनकडांचे (जोडरहित) होजियरी कपडे, उशीचे अभ्रे वगैरेंसाठी हे कापड वापरतात. मुख्यत्वे हे सुती व लिननचे असते. 

नाविक (ॲडमिरॅल्टी) कापड : नाविक दलातील अधिकाऱ्यांच्या गणवेशाकरीता वापरण्यात येणारे मजबूत कापड. मेल्टन कापडासाठी बोली भाषेत हा शब्द वापरतात. 

निनॉन कापड : तलम, मुलायम, वजनाला हलके, साध्या विणीचे व जवळजवळ पारदर्शक असे वायलसारखे कापड. हे सुती, रेशमी वा कृत्रिम धाग्याचे असते. पातळ पडदे, स्त्रियांची उंची अंतर्वस्त्रे वगैरेंसाठी हे वापरतात. 

नैनसूक : तलम, वजनाला हलके, मऊ व साध्या विणीचे सुती कापड. पुष्कळ वेळा मर्सरायझेशन करून याला चमक आणलेली असते. मुलांचे कपडे, उंची अंतर्वस्त्रे वगैरेंकरिता हे वापरतात. 

पट्टा कापड : रंगीत ताणा असलेले पॉपलीनसारखे कापड. हे मुख्यतः पायजम्यासाठी वापरतात. 

पट्टी कापड : यांत्रिक सुयांनी विणकाम करताना कापडाच्या खालच्या बाजूस ढिले टाके सोडून त्यांमधून दुसरा अस्तरासारखा पातळ थर विणून बनविलेले नळीसारखे कापड. मुख्य बाजू भरीव दिसावी म्हणून यावर नंतर प्रक्रिया करतात. ऊब राहण्यासाठी हे कापड अवयवाभोवती गुंडाळून वापरतात. 

पट्ट्यांसाठीचे कापड : उद्योगधंद्यांत वापरण्यात येणाऱ्या पट्‌ट्यांसाठी बनविण्यात येणारे कापड. बहुधा हे जाड, खळ न दिलेले डक असते. हे निरनिराळ्या रुंदींचे तसेच सुती, रेयॉनचे असते. व्ही (V) छेदाचेही पट्टे असतात. चाके फिरविण्यासाठी वा माल वाहून नेण्यासाठी यांचा उपयोग होतो. 

पताका (बंटिंग) कापड : सैलसर विणीचे सुती वा लोकरीचे कापड. बहुधा गडद (बऱ्याचदा भडक) रंगाचे व कधीकधी हे छापील असते. मुख्यत्वे पताका, निशाणे, ध्वज, शोभिवंत काम यांकरिता व उद्योगधंद्यात हे कापड वापरतात.  

परमाटा कापड : दोन धागे वर व एक खाली या पद्धतीने सुती ताणा व लोकरी धाग्यांचा बाणा असलेले कापड. हे वजनाला हलके असून कपड्यांसाठी वापरतात. 


पर्केल कापड : तलम, घट्ट, वजनाला हलके, साध्या विणीचे व मसलीनपेक्षा मऊ सुती कापड. बहुधा हे छापील असते. मुलींचे कपडे, सदरे, पायजमे यांकरिता हे वापरतात. 

पॅरामट्टा कापड : मेरिनो मेंढीची लोकर व रेशीम वा सूत यांच्यापासून बहुधा टि्वल विणीने विणलेले वजनाला हलके कापड. हे कपड्यांकरिता वापरतात. ऑस्ट्रेलियातील याच नावाच्या गावावरून हे नाव पडले असावे.

पाइल (लवदार) कापड : पुष्कळ प्रमाणात फरशी साम्य असणारे मखमलीसारखे (व्हेल्‌व्हेटसारखे) कापड. हे मऊ वा खरखरीत पण दिसायला आकर्षक असते. जादा घेतलेल्या ताण्यांच्या धाग्यांच्या ठराविक लांबीच्या फासांनी (टाक्यांनी) कापडाचा पृष्ठभाग झाकला जाईल अशा रीतीने बनविलेले कापड. हे फास सारख्या लांबीचे, कमी अधिक लांबीचे (आकृतीसाठी), तसेच ठराविक अंतरावर कापतात वा तसेच ठेवतात. बाण्याच्या धाग्यांपासूनही फास बनविले जातात. टर्किश टॉवेल, व्हेल्‌व्हेट, व्हेल्‌व्हेटीन, फर्निचरवरची आच्छादने, कॉर्डुरॉय, प्लश, कृत्रिम फर, पावडर-पफचे कापड, गालिचे इ. या कापडाचे प्रकार आहेत. 

पायना कापड : अननसाच्या पानांपासून मिळणाऱ्या तंतूंपासून बनविण्यात येणारे कापड. हे सुंदर, पारदर्शक व काहीसे ताठर असते.  

पायलट कापड : मजबूत, जड, भरड व बहुधा टि्वल विणीचे लोकरी कापड. बहुधा गडद निळा रंग देतात. नावाड्यांचे कोट व अन्य भक्कम कपड्यांसाठी हे वापरतात. 

पॉपलीन कापड : भारतातील मुख्यत्वे सदऱ्यासाठी वापरले जाणारे साध्या विणीचे, टिकाऊ कापड. ताण्याच्या धाग्यांची संख्या बाण्याच्या धाग्यांच्या संख्येपेक्षा जास्त असून ताण्याचा धागा बाण्याच्या धाग्याहून बारीक असतो. यामुळे कापडावर आडव्या धाग्यांच्या उठावदार रेषा दिसतात. आयर्लंडमध्ये रेशमी ताणा व वर्स्टेड बाणा, तर अमेरिकेत याकरिता सुती, रेशमी, लोकरी वा रेयॉनचे धागे वापरतात. पायजमा, खेळाडूंचे कपडे, शोभिवंत कपडे वगैरेंसाठी हे वापरतात. चर्चमधील वापरावरून पोपच्या आदरापोटी हे नाव देण्यात आले. 

पिकू कापड : विणकाम करताना मधून घट्ट, उचललेल्या धाग्यांनी ओळी तयार करून बनविलेले कापड. ओळी बनविणारे धागे बाण्याचे असतात. हे काहीसे जड, अतिशय टिकाऊ कापड सामान्यपणे सुती असते. कधीकधी रेयॉन वा रेशमाचेही बनवितात. हे दिसायला ओबडधोबड असते. हे स्त्रिया-मुलांचे कपडे, सदरे, बंड्या, कॉलर, कफ, टोप्या वगैरेंसाठी वापरतात. 

पीतांबर : जरतारी रुंद काठाचे तलम घट्ट विणीचे रेशमी वस्त्र. याचा रंग पिवळा असून हे हातमागावर विणतात. कधीकधी यात एक धागा लाल रंगाचा असतो. अरुंद काठाच्या वा काठ नसलेल्या अशा सोवळ्याच्या नेसावयाच्या वस्त्राला कद म्हणतात. 

पुत्तू कापड : (काशगर). कमी प्रतीच्या लोकरीपासून काश्मीर व लगतच्या भागात बनविण्यात येणारे कापड. 

पृष्ठभागी खळ दिलेले कापड : कापडाच्या पाठीमागच्या भागाला भरपूर खळ लावलेले सुती कापड. यामुळे कापड वजनदार होते. हे विविधरंगी असून पुस्तक बांधणीसाठी वापरतात. धुतल्याने आणि घातल्यानेही यावरची खळ सहजपणे निघून जाते.


पैठणी : दोन्ही बाजूंनी एकसारखी वेलबुट्टी असणारे रुंद व ठसठशीत काठ आणि संपूर्ण पदर जरीचा असलेले स्त्रियांचे गर्भरेशमी वस्त्र. हे महाराष्ट्रीय परंपरेचे एक वैशिष्ट्य आहे. [⟶ पैठणी]. 

पोंगी कापड : मुळात चीनमध्ये हातमागावर बनविण्यात येणाऱ्या, वजनाला हलक्या, खरबरीत व बदामी रंगाच्या टसर रेशमी कापडाचे नाव. पन-की (स्वतः स्वतःच्या हातमागावर विणलेले) या चिनी शब्दावरून हे नाव आले आहे. उन्हाळी कपडे, पडदे वगैरेंकरिता हे वापरीत. आता मऊ साध्या विणीच्या मर्सराइज्ड सुती कापडाला हे नाव देतात. याचे रेशमी पोंगीशी साम्य नसते. हे कापड पोषाख, पायजमे, अस्तर व काही शोभिवंत कामे यांसाठी वापरतात. 

प्रसिडंट कापड : सुती धाग्यांचा ताणा व लोकरीचा बाणा वापरून पाच धाग्यांच्या सॅटीन विणीने बनविलेले कापड. हे दुहेरी म्हणजे नळीसारखे असते. 

प्लश कापड : पाइल कापडाचा प्रकार. यातील फासांची लांबी ०.३ सेंमी.पेक्षा अधिक असे. हे रेशमी, रेयॉनचे, मोहेरचे वा सुतीही असते. पडदे, कपडे, गालिचे, हातमोजे, कोट, केप (गळ्याभोवती उपवस्त्र) वगैरेंकरिता हे वापरतात. रेयॉन प्लश सुती प्लशसारखे दिसते व त्यांचे उपयोगही सारखेच आहेत. 

प्लेड कापड : ताण्याबाण्याकरिता वेगवेगळ्या रंगांचे धागे वापरून बनविलेले रंगीबेरंगी (बहुरंगी) चौकटी असणारे कापड. सर्वसाधारणपणे याकरिता रंगीत सूतच वापरतात. मात्र बहुरंगी, चौकटी छापलेल्या कापडालाही हे नाव देतात. 

फरसारखे कापड : फरप्रमाणे दिसणारे कापड. रंग व बनावट यानुसार याला निरनिराळी नावे पडली आहेत. उदा., कृत्रिम पर्शियन लॅंब, कृत्रिम सील. 

फीत : निरनिराळ्या विणींचे, विविध प्रकारच्या धाग्यांचे खास मागांवर विणलेले अरुंद पट्ट्यांच्या रूपातील कापड. याची रुंदी वेगवेगळी असते. झालर, सजावटी काम इत्यादींसाठी हे वापरतात. टंकलेखन फितीसाठी तलम घट्ट विणीचे सुती (रेशमी व रेयॉनचेही) कापड वापरतात. 

फुलकरी कापड : विशेषकरून पंजाबात नक्षीकाम केलेल्या कापडासाठी रूढ असलेले नाव. सामान्यतः यात सुती अथवा रेशीममिश्रित कापडाच्या चादरीवर सुती, रेशमी वा लोकरी धाग्यांनी भरतकाम केलेले असते. शोभिवंत काम, आच्छादने वगैरेंसाठी वापरतात. [⟶ फुलकरी]. 

फूलार्ड कापड : वजनाला हलके, चमकदार, मऊ आणि साध्या वा टि्वल विणीचे कापड. मुळात हे रेशमापासून बनवीत. आता नायलॉन, रेयॉन, वर्स्टेड धाग्यांपासूनही बनवितात. हे छापील असून पुरुषांचे कपडे, नेकटाय, गळपट्टे किमोनो, झगे वगैरेंकरिता वापरतात.  

फेल्ट (नमदा) : लोकर, केस, फर, इतर तंतू किंवा लोकरमिश्रित तंतू वापरून बनविलेले वीणरहित, जाड भरीव कापड. उष्णता, आर्द्रता, पाणी व घर्षण यांचा उपयोग करून यातील तंतू दाबले व एकमेकांत गुंतविले जातात. कधीकधी विणलेले कापडही याकरिता वापरतात. रासायनिक संस्करणाने किंवा लाख, खळ लावून हे कडक करतात. टोप्या, कपड्यांत व फर्निचरमध्ये भरण्यासाठी, आच्छादनासाठी, अस्तरासाठी, पियानोच्या हातोड्यांना लावण्यासाठी, बाजाच्या पेटीत वगैरेंत याचा वापर करतात. [⟶ फेल्ट]. 

फ्लॅनेल : कापडाच्या वरच्या बाजूवर तंतूंची टोके आणून त्यांनी पृष्ठभाग झाकला जाऊन बनलेले मऊ व उबदार कापड. या तंतूंमुळे कापड लवदार (फूल असलेले) दिसते. साधी व टि्वल वीण असलेल्या कापडात विणकाम करतानाच थोड्या पिळाच्या आखूड तंतूंची भर व या तंतूंची अग्रे हळुवारपणे ओढून घेऊन पृष्ठभागावर आणतात. हे सुती, लोकरी, रेयॉन वा संमिश्र धाग्यांचे असते. विविध प्रकारचे कपडे, आच्छादने, स्वच्छतेसाठीची फडकी वगैरेंसाठी हे वापरतात. [⟶ फ्लॅनेल]. 


फ्लॅनेलेट कापड : (किमोनो फ्लॅनेल). वजनाला हलके, साध्या विणीचे व एका बाजूस आखूड तंतू असलेले मऊ सुती कापड. बहुधा छापील वा रंगीत असते. पायजमे, रात्रीचे झगे, मुलांचे कपडे, किमोनो, अस्तर, रजई वगैरेंसाठी याचा उपयोग करतात. 

फ्लीस कापड : जड, जाड, घट्ट व लोकरीसारखा पृष्ठभाग असलेले लोकरीचे कापड. लवदार लांब तंतूंमुळे हे असे दिसते. ओव्हरकोट, जाकीट वगैरेंकरिता याचा उपयोग होतो.

बंगाल पट्टा : पांढरा व रंगीत असे आलटून पालटून पट्टे असलेले टि्‌वल विणीचे जाड सुती वा लोकरी कापड. स्कर्ट, झगे इ. कपड्यांसाठी वापरतात. 

कराम कापड : साध्या विणीचे भरड, विरविरीत व खूप खळ दिलेले कापड. हे सुती, फ्लॅक्सचे, हेंपचे वा केसांचे असते. विरविरीत विणीचे, खळ दिलेले सुती कापडाचे दोन थर एकमेकांना चिकटवूनही हे तयार करतात. हे ताठर असते. अस्तर व मूळ कापड यांच्यात घालून कपड्याला आकार देण्यासाठी व ताठरपणा आणण्यासाठी हे मुख्यत्वे वापरतात. टोप्यांचे मूळ आकार, पुस्तक-बांधणी, स्त्रियांची वस्त्रे, कातडी कपडे वगैरेंतही याचा वापर करतात. 

बरलॅप कापड : (किंतान). ताग, हेंप तत्सम तंतूंपासून बनविलेले जाड, भक्कम व भरड कापड. पोती, पिशव्या, अस्तर वगैरेंसाठी हे वापरतात. क्वचित हे छपाई करून पडदे व सुशोभनासाठीही वापरतात. 

बलून कापड : घट्ट विणीचे भक्कम कापड. यावर सामान्यतः रबराचा पातळ थर देतात. वजनाला हलकी विमाने, ग्लायडर, बलून वगैरे आच्छादण्यासाठी व काही विशिष्ट कपड्यांसाठी हे वापरतात. भरड प्रकार टंकलेखन यंत्राच्या फितींसाठी वापरतात. 

बहुपदरी कापड : कापडाचे दोन वा अधिक थर रबर, रेझीन, आसंजक इ. तसेच उष्णता व दाब यांनी एकत्र चिकटवून बनविलेले कापड. शर्टची कॉलर, अस्तर, पादत्राणे यांमध्ये तसेच उद्योगधंद्यात व यंत्रोपकरणांत हे कापड वापरतात. हे धुता येते. 

बॅंटल लिनन : हाताने विणलेले, अर्धा मीटर पन्ह्याचे व आयर्लंडमध्ये बनणारे लिननचे जाडेभरडे कापड.  

 

बॅंडोलिअर कापड : खाकी/ऑलिव्ह रंगाचे, साध्या विणीचे, मजबूत कापड. पुष्कळदा दवविरोधी प्रक्रिया यावर करतात. काडतुसांचे पट्‌टे, हातगोळे वाहून न्यावयाचे पट्टे वगैरे सर्व प्रकारच्या पट्‌ट्यांसाठी हे वापरतात. 

बाटिक कापड : बाटिककाम करून बनविलेले कापड. विशेषतः कलाकुसरीच्या वस्तूंकरिता असे कापड बनवितात. 


बातीस्त कापड : झां बातीस्त या फ्रेंच तंत्रज्ञांनी विणलेल्या व चमकदार रेषाकृती असणाऱ्या सुती कापडाला मुळात हे नाव देण्यात आले होते. याचे अनेक प्रकार नंतर पुढे आले असून काही पुढीलप्रमाणे आहेत. साधी वीण व वजनदार असे जाकिटे, अस्तर वगैरेंसाठी वापरले जाणारे कापड उत्तम प्रतीच्या लोकरीपासून बनविलेले, वजनाला हलके व मुलायम आणि खास करून ख्रिस्ती भिक्षुणींच्या झग्याकरिता वापरण्यात येणारे कापड रेशमाचे तलम, आकृती असलेले व उन्हाळ्यात वापरण्यास योग्य असे कापड बहुतेक लिननपेक्षा मऊ व तलम असे लिनन बातीस्त कापड वगैरे. निरनिराळे पोषाख, स्त्रियांची उंची अंतर्वस्त्रे, अस्तरे इत्यादींकरिता बातीस्त कापड वापरतात.

बिआझ कापड : लिननच्या कापडाचा एक प्रकार. साध्या विणीच्या, वजनाला हलक्या, पांढऱ्या व चमकदार सुती कापडालाही हे नाव आहे. लिननसारखे दिसावे म्हणून त्यावर विशिष्ट प्रकारचे अंतिम संस्करण (खळ देणे, इस्त्री करणे व बहुधा मर्सरायझेशन) करतात. कपड्यांसाठी याचा उपयोग होतो. 

बीव्हर कापड : बीव्हरच्या फरसारखे दिसणारे जाड, टि्वल लोकरी कापड. पृष्ठभाग सूक्ष्म तंतुमय व मऊ असतो. ओव्हरकोटासाठी हे वापरतात. अशाच तऱ्हेचे सुती कापड कामगार व खेळाडू यांचे कपडे, पादत्राणांचे अस्तर वगैरेंसाठी वापरतात. 

बुक लिनन : खळ लावून कडक केलेले लिननचे कापड. कॉलर, पट्टे यांना कडकपणा आणण्यासाठी, तसेच पुस्तक-बांधणीत हे वापरतात. 

बुचर लिनन : भक्कम, जाड, साध्या विणीचे धुवट लिनन कापड. खाटीक जे जाकीट व अंगरख्यासाठी वापरीत म्हणून हे नाव पडले. सूत व रेयॉनपासूनही असे कापड तयार करतात. 

बैझ (बाएटाज) कापड : सामान्यपणे भडक रंगांत (हिरवा, तांबडा) रंगविलेले लांब तंतुमय, जाडेभरडे, साध्या विणीचे लोकरीचे कापड. हे सुतीही बनवितात. हे फेल्टची नक्कल म्हणता येईल. ध्वनिशोषण व शोकेसमधील अस्तर, पडदे, बिलिअर्ड टेबलावरील आवरण, कपडे इत्यादींसाठी याचा उपयोग करतात. 

बोलिव्हिया कापड : मऊ, वजनाला हलके, मखमलीसारखे तंतुमय कापड. हे लोकरी वा वर्स्टेड धाग्याचे असून पुष्कळदा यात मोहेर वा अल्पाका धागा असतो. कोट, सूट, अंगरखे यांसाठी हे वापरतात. 

 ब्रॉड (रुंद पन्ह्याचे) कापड : मुळात रुंद (सु. ६७.५ सेंमी.पेक्षा जास्त) मागावरील कापडाला हे नाव पडले. आता याचे अनेक प्रकार असून त्यापैकी काही पुढीलप्रमाणे आहेत. रुंद रेशमी कापड विणकामामध्येच बाण्याचा अधिक धागा वापरून बनविलेले रुंद व चांगल्या सुताचे कापड. मुलायम पण जड दिसणारे, मागील भागास टि्वल व पुढील भागावर बुंदके असलेले लोकरीचे चमकदार कापड (शर्ट व पोषाखासाठी वापरतात). रेयॉन धाग्यापासून बनविलेले जड, भरीव रुंद पन्ह्याचे कापड (फुजी) अमेरिकेत तलम पॉपलिनला ब्रॉडक्लॉथ म्हणतात (शर्ट, पायजमा, उन्हाळी कपडे इत्यादींसाठी वापरतात). 

ब्रिलियंटाइन कापड : मऊ, तलम, चमकदार, वजनाला हलके व साध्या वा टि्वल विणीचे कापड. तलम सुती ताणा व मोहेर वा चमकदार लोकरीचा बाणा याकरिता वापरतात. उन्हाळी कपडे, अस्तर वगैरेंकरिता हे वापरतात. 


ब्रोकेड : (किनखाब). विणकाम करतानाच जॅकार्डच्या साहाय्याने सर्वत्र आकर्षक उठावदार रेखाकृती किंवा रंगीत वेलबुट्टी तयार करण्यात येणारे जड व उंची कापड. सोन्याचांदीच्या धाग्यांनी (जर) रेशमी कापडावर उठादार पद्धतीने शोभादायक व सुंदर  नक्षीकाम तयार होईल अशा रीतीने करण्यात येणाऱ्या विणकामाला व कापडालाही ⇨ किनखाम्हणतात. ब्रोकेड कापडाची दर्शनी व मागील बाजू सहजपणे वेगवेगळ्या ओळखता येतात. पडदे, गालिचे, फर्निचरचे आच्छादन, शोभिवंत काम, कपडे वगैरेंकरिता वापरतात.  

ब्लँकेट : लोकर, सूत किंवा कृत्रिम धागे किंवा या धाग्यांचे मिश्रण वापरून बनविलेले साध्या वा टि्वल विणीचे तंतुमय जाड कापड. फ्लेमिश विणकर टॉमस ब्लँकेट यांच्यावरून नाव पडले असावे. अंथरण्या-पांघरण्यासाठी मुख्यत्वे हे वापरतात. याचे झगेही करतात. 

भरतकामाचे कापड : यांत्रिक सुयांच्या मदतीने ज्यावर भरतकाम केले जाते असे कापड. उदा., चिकन. 

मखमल : (व्हेल्व्हेट). एक प्रकारचे अतिशय मृदू कापड. राजेरजवाड्यांचे अंगरखे, तक्क्या लोडांचे अभ्रे, दागिन्याच्या पेट्यांचे अस्तर इत्यादींकरिता हे वापरतात. 

मच्छरदाणीचे कापड : तलम सुताचे, लेनो विणीचे मच्छरदाणीसाठी बनविण्यात येणारे कापड. खास रुंद यांत्रिक सुयांनीही असे सुती वा नायलॉनचे कापड विणतात. खिडक्या, बाबागाड्या, पडदे इत्यादींकरिताही याचा उपयोग होतो. 

मझ्‌री कापड : (मिश्र कापड). रंगविलेल्या व न रंगविलेल्या कापसाच्या मिश्रणाचे सूत कातून त्यापासून हे कापड बनवितात. 

मटका कापड : कापलेल्या रेशमाच्या कोशांतील धाग्यांपासून बनविण्यात येणारे कापड. हे धागे तेवढे बारीक वा तलम नसतात. हे कापड सर्वत्र एकसारखे दिसत नाही.

मद्रास कापड : चौकटीचौकटीचे शर्ट व पोषाखासाठी वापरण्यात येणारे कापड. हे वजनाला हलके व तलम असून यावर अन्य नक्षीही असते. रंग सामान्यपणे गडद वा भडकही असतात. सुती व रेयॉनचे पातळ आणि पडद्यासाठी बनविण्यात येणारे कापडही याच नावाने ओळखतात. प्रत्येक धुण्यास हळूहळू रंग जाणारा व तो कापडावर इतरत्र पसरणाऱ्या कापडाला रंगस्त्रावी मद्रास कापड म्हणतात. 

मलमल : अतिशय तलम सुतापासून बनविलेले तलम व पातळ कापड. भारत व पूर्व आफ्रिकेत याच नावाने ओळखले जाते.  

मसलीन कापड : सरळ विणीचे घट्ट सुती कापड. याचे अगदी पातळ (तलम) पासून जाडपर्यंतचे विविध प्रतीचे प्रकार असतात. मेसोपोटेमियातील मोसूल येथे प्रथम बनविण्यात आल्याने याला हे नाव पडले आहे. अंतर्वस्त्रे, एप्रन, अस्तर, पोषाख, चादरी व अभ्रे, आच्छादने वगैरेंसाठी हे वापरतात. भारतात सामान्यपणे तलम कापडाला हे नाव देतात. उदा., डाक्क्याची मलमल. ते उंची व किंमती असते.

  

मांजरपाट : मद्रीपोल्लम येथील जाडेभरडे सुती कापड. सर्वसाधारणपणे हे विरंजित केलेले नसते. सदरे, अभ्रे, चादरी वगैरेंसाठी हे वापरतात.  

माडापोल्लम कापड : सरळ विणीचे, धुवट (विरंजित) प्रकारापासून ते रंगीत प्रकारचे खास सुती कापड. माडापोल्लम (आताचे नरसापूर, तमिळनाडू) येथे प्रथम बनविण्यात आल्यामुळे हे नाव पडले. हे विविध तऱ्हांच्या पोषाखांसाठी वापरतात. 


मार्क्विसेट कापड : वजनाला हलके, लेनो विणीचे सुती, रेशमी वा कृत्रिम धाग्यांचे जाळीदार कापड. पडदे, उंची अंतर्वस्त्रे, मच्छरदाणी, काही कपडे वगैरेंकरिता वापरतात. हे तंतुरूप काचेपासूनही बनवितात. 

मिश्र कापड : अगदी वेगवेगळ्या प्रकारचे दोन वा अधिक तंतू एकत्रितपणे वापरून बनविलेले कापड. त्या त्या तंतूची गुणवैशिष्ट्ये कापडात येण्याकरिता असे कापड बनवितात. उदा., कॉट्‌सवुल (सुती व लोकरी तंतू), टेरीवुल (टेरिलीन व लोकरी तंतू), टेरीकॉट (टेरिलीन व सुती तंतू). लोकरीने ऊबदारपणाचा तर टेरिलीनमुळे लवकर सुकण्याचा व सहज सुरकुती न पडण्याचा गुणधर्म येतो.  

मेणकापड : जाड्याभरड्या कापडावर (उदा., तरट, कॅनव्हास इ.) शुष्कन तेलाचे (हवेने सुकणाऱ्या तेलाचे उदा., जवसाचे तेल) किंवा ‘रेक्झिन’ बनविताना वापरतात त्या रासायनिक द्रव्यांचे थरावर थर देऊन तयार केलेले कापड. निरनिराळे ठसे वापरून त्यावर नक्षी छापतात. मोटारगाडीच्या आसनांची अस्तरे, आच्छादने, फर्निचर (सोफासेट) इत्यादींकरिता वापरतात.  

मेल्टन कापड : घट्ट विणीचे, जड व लवदार कापड. हे मऊ कापड मेल्टन (इंग्लंड) येथे प्रथम बनविण्यात आल्याने हे नाव पडले. जाकीट, कोट, ओव्हरकोट, गणवेश वगैरेंसाठी हे वापरतात. पूर्वी हे सूत व लोकर यांचे तर आता संमिश्र धाग्यांचे बनवितात. 

मोएरे कापड : उष्णता, दाब, वाफ यांची क्रिया करून ज्याचा पृष्ठभाग लाटांप्रमाणे बनविण्यात येतो असे कापड. उदा., टफेटा. 

मोकेट कापड : सुती धाग्याचा आधार असलेले उच्च दर्जाचे लोकरी कापड. पडदे, अभ्रे, आच्छादन वगैरेंसाठी याचा उपयोग करतात. 

मोलस्किन कापड : मोल या चिचुंदरीसाख्या प्राण्याच्या फरप्रमाणे दिसणारे, जाड, भक्कम सुती कापड. सुती बाणा व सॅटीन वीण वापरून तंतूंच्या अग्रांनी कापडाचा पृष्ठभाग झाकला जाईल अशा प्रकारे विणकाम करतात. अस्तर, कामगारांचे कपडे, रणगाड्याचे आच्छादन यांसारख्या उपयोगांकरिता हे टिकाऊ कापड वापरतात. 

मोहेर कापड : अंगोरा शेळीच्या केसांपासून (लोकरीपासून) बनविण्यात येणारे साध्या वा टि्वल विणीचे चमकदार कापड. मुख्यत्वे अस्तरासाठी वापरतात.  

रंगस्त्रावी (ब्लीडिंग) कापड : कापड अयोग्य रीतीने वा कमी प्रतीची रंजकद्रव्ये वापरून रंगविल्यास अशा कापडाचा रंग प्रत्येक धुलाईत कमी होतो व इतरत्र पसरतोही. कापडावरील हा परिणाम काही काळ लोकप्रिय झाला होता. कच्च्या रंगाने रंगविलेल्या धाग्यांपासून बनविलेले असे कापड दक्षिण भारतातून अमेरिकेत जात असे. याला ब्लीडिंग (रंगस्त्रावी) मद्रास असे म्हणत. 

रग कापड : जाड, जड व जमिनीवर वा अन्यत्र आच्छादन म्हणून घालावयाचे लोकरी, सुती, तागाचे, रेशमी, कृत्रिम व संमिश्र धाग्यांचे कापड. कधीकधी हे तंतुमय असते.  

रबरलेपित कापड : रबराचा लेप दिलेले वा रबर आत घुसविलेले जलाभेद्य कापड. रुग्णालयातील चादरी, लहान मुलांचे अंथरूण व चड्‌ड्या, पावसात घालावयाचे कपडे (रेनकोट) वगैरेंकरिता हे वापरतात.  


रूमालाचे कापड : (टॉवेलिंग). अंग पुसण्यासाठी बनविलेले, पाणी टिपणारे व काहीसा खरखरीत पोत असलेले कापड. हे सुती वा लिननचे असते. हे रंगीत व सुंदर किनारीचे असते. रुमाल, नॅपकीन इत्यादींकरिता हे वापरतात. भारतातील पंचेही यात येऊ शकतात. 

रेप कापड : सरळ विणीचे, रेषायुक्त, बळकट पॉपलीनसारखे कापड. बाण्यामध्ये आलटून पालटून तलम व जाड धागा वापरल्याने कापड उठावदार रेषायुक्त दिसते. या रेषायुक्त परिणामाला रेप हे नाव आहे. (कदाचित रिब-फासळी-या शब्दाचे अपभ्रष्ट रूप असावे). हे सुती, लोकरी, रेशमी, कृत्रिम धाग्यांचे वा संमिश्र धाग्यांचे असते. उश्यांचे अभ्रे, पडदे, पोषाख, नेकटाय, खेळाडूंचे व कामगारांचे कपडे, गालिचे वगैरेंकरिता हे कापड वापरतात. 

लास्टिंग कापड : भक्कम, टिकाऊ, तलम पोताचे लोकरी वा सुती कापड. पादत्राणे व पिशव्या यांची अस्तरे, फर्निचरचे आच्छादन वगैरेंसाठी हे वापरतात. 

लाँग क्लॉथ : सरळ व घट्ट विणीचे, कमी पीळदार सुताचे पांढरे सुती कापड. सुरुवातीला हे मोठ्या प्रमाणावर व हजारो मीटर लांबच लांब विणले जात असे म्हणून पडलेले नाव पुढेही वापरात राहिले पण आता अनेक प्रकारच्या कापडांसाठी  हे नाव वापरतात. शर्ट, अंतर्वस्त्रे, आच्छादने वगैरेंसाठी हे वापरतात.  

लॉन कापड : तलम धाग्याचे, वजनाला हलके, साध्या विणीचे, टिकाऊ, सुती वा लिनन कापड. फ्रान्समधील लेआँ येथे प्रथम बनविल्यामुळे हे नाव पडले. हे वायलपेक्षा कडक (ताठ) पण आर्गंडीहून कमी कडक असते. पांढरे, रंगीत  वा छापील असते. स्त्रिया-मुलांचे कपडे, अंतर्वस्त्रे, हातरुमाल, झालर वगैरेंकरिता हे वापरतात.  

लिनन : फ्लॅक्स तंतूपासून बनविलेले मऊ कापड. ते साध्या वा दमास्क विणीचे असते. कपडे, घरगुती वापराच्या व उद्योगधंद्यांत वापरण्यात येणाऱ्या वस्तू, शोभिवंत काम इत्यादींकरिता हे वापरतात. [⟶ लिनन]. 

लिनन कॅनव्हास : याचे अनेक प्रकार असून त्यांपैकी दोन महत्त्वाचे आहेत. (१) चांगला पीळ दिलेल्या धाग्यांपासून बनविण्यात येणारे टिकाऊ विरळ कापड. याचा मुख्यत्वे भरतकामासाठी उपयोग होतो. जावा कॅनव्हास हा याचा सर्वांत लोकप्रिय प्रकार आहे.  

(२) चांगला पीळ दिलेल्या धाग्यांपासून साधी वीण वापरून हे बनविलेले असते. या घट्ट कापडाचे वजनाला हलके ते भारी आणि खरबरीत ते मुलायम असे पुष्कळ प्रकार आहेत. 

लिननसारखे रेयॉनचे कापड : रेयॉनच्या कापडांचा हा महत्त्वाचा गट आहे. लिननसारखा पोत व रूप असलेले हे कापड सामान्यतः साध्या विणीचे असते. पातळ (हातरुमाल लिनन) पासून ते अगदी जाड (बुचर लिनन) असे याचे प्रकार आहेत. हे कापड मोठ्या प्रमाणावर विविध वस्तूंसाठी वापरले जाते. उदा., हातरुमाल, स्त्रियामुलांचे कपडे, रुमाल, चादर, आच्छादने, अभ्रे, उन्हाळी कोट, क्रिडावस्त्रे, सूट वगैरे.  

लिनोलियम : जमिनीवर अंथरावयाचे जलाभेद्य कापड. ऑक्सिडीभूत अळशी तेल व इतर पदार्थ मिसळून त्याचा लेप किंतानावर देऊन हे बनवितात. [⟶ लिनोलियम]. 

लेनो कापड : सामान्यपणे वजनाला हलके, विरळ विणीचे, सुबक व उत्तम प्रतीचे कापड. हे सुती, रेयॉन वा इतर मानवनिर्मित धाग्यांचे असते. हे लेनोविणीचे असते म्हणजे ताण्यांची रचना जाळीदार दिसेल अशी असते व यातील धागा आपोआप एक सोडून एक एका बाजूला सरकतो. परिणामी ताणा व बाणा यांची रचना विशिष्ट जाळीसारखी दिसते. यामुळे गॉझपेक्षा याचा पोत अधिक घट्ट बनतो. पडदे, बुरखे वगैरेंकरिता हे वापरतात. 


लेपित कापड : लॅकर, तेल, रेझीन, व्हार्निश, रबर वा पायरोक्झिलीनचा लेप दिलेले कापड. कापड बुडवून, सुरीने लावून, दाबाखाली कॅलेंडरिंग करून, आत घुसवून वा थर निर्माण करून असा लेप देतात. यामुळे मूळ कापडाचे वजन ३५% तरी वाढते. तेली कापड, मेण कापड इ. याची उदाहरणे असून रेनकोट, खिडक्यांवरील पडद्या वगैरेंकरिता यांचा उपयोग होतो. 

लेम कापड : कापड शोभिवंत करण्यासाठी ताण्यात वा बाण्यात खरी वा खोटी जर वापरून विणलेले कापड. सायंकालीन कपडे, झालर वगैरेंकरिता हे वापरतात.  

लेस : यांत्रिक सुयांच्या मदतीने विरळ पण विविध आकृत्या व वेलबुट्टीचे अनेक नमुने शोभिवंत रीतीने विणलेले कमी जास्त रुंदीचे कापड. हे विणकाम काहीसे भरतकामासारखे असले, तरी याला आधारासाठी कापड लागत नाही. हातांनी विणलेली लेसही असते. अँटिक, बॅटेनबुर्ग, ड्रेझ्डेन, आयरिश, लिली, मिलान, नॉटिंगॅम, रिनेसान्स, व्हेनिस इ. प्रकार विशेष प्रसिद्ध आहेत. मुख्यत्वे कपड्यांच्या सुशोभनासाठी लेस वापरतात. शिवाय पडदे, टेबलक्लॉथ, ठराविक कपडे, काचोळी वगैरेंकरिता लेस वापरतात.  

वर्स्टेड कापड : मुलायम, विंचरण्यायोग्य, उत्तम प्रतीच्या लांब लोकरी तंतूंपासून बनविलेल्या धाग्यापासून विणलेले कापड. गॅबर्डीन, सर्ज वगैरे याचे प्रकार होत. हे घट्ट विणीचे व कुडकुडीत असते. हे लोकप्रिय कापड विविध प्रकारच्या कपड्यांकरिता वापरतात. 

वल्कल : पेपर मलबेरी (ब्रॉस्सोनेशिया पॅपिरिफेरा) सारख्या वृक्षाच्या अंतर्सालीपासून बनविलेल्या वस्तू. याला कापड म्हणता येत नसले, तरी यापासून कपडे व कापडासारख्या दिसणाऱ्या शोभिवंत वस्तू बनवितात.  

वायल : साध्या विणीचे, वजनाला हलके, पातळ, तलम व पारदर्शक अथवा जवळजवळ पारदर्शक असलेले कापड. मुख्यत्वे हे सुती असते पण रेशमी, रेयॉनचे इ. प्रकारही आहेत. हे पांढरे, रंगीत व छापील नक्षी असलेले असते. साड्या, स्त्रियामुलांचे कपडे, पडदे, गळपट्टे, दुपट्टे, दिव्यांची आच्छादने वगैरेंकरिता याचा उपयोग करतात. 

विगन कापड : जास्त खळ दिलेले, चमकदार सुती कापड. मुख्यत्वे कपड्यांमधील अस्तरासाठी हे वापरतात. 

विमान (एअरप्लेन) कापड : विमानाच्या पंख्यामध्ये वापरण्यात येणारे मूळचे लिनन. आता साध्या विणीच्या मर्सराइज्ड व पाणी न शोषणाऱ्या मजबूत सुती कापडाला हे नाव देतात. यावर सेल्युलोज ॲसिटेट लॅकरची प्रक्रिया करून विमानाचे पंख, सुकाणू यंत्रणा इत्यादींत हे वापरतात. शर्ट, अंतर्वस्त्रे, प्रवासी सामान यांच्यासाठीही हे वापरतात. 

वेबिंग कापड : घट्ट विणीचे मजबूत व अरुंद पट्ट्यांच्या रूपातील कापड. हे मुख्यत्वे सुती असते मात्र फ्लॅक्स, ताग, हेंप, नायलॉन, संमिश्र इ. धाग्यांपासूनही हे बनवितात. पट्टे, वादी, झालर वगैरेंकरिता याचा उपयोग करतात. ताण्यात, बाण्यात किंवा दोन्हींत स्थितिस्थापक तंतू वापरून लवचिक पट्ट्याही बनवितात.  

व्हेनेशियन कापड : मऊ, भक्कम व सुंदर असे लोकरीचे वा सुती कापड. ताणा-संमुख सॅटीन विणीचे हे कापड रंगीत धाग्यांचे असते वा नंतर रंगवितात. कधीकधी याच्या किनारीचा रंग वेगळा असतो. नेहमीच्या सॅटीनपेक्षा जड आणि मजबूत असते. सामान्यतः घट्ट व चमकदार असते. पुरुषांचे कपडे, अस्तर वगैरेंकरिता हे वापरतात. 


व्हेलूर कापड : कापडाच्या दोन्ही बाजूंना घट्ट व जवळजवळ लोंबते आखूड तंतू असलेले मजबूत कापड. घट्टपणा व वजनदारपणा हे याचे वैशिष्ट्यपूर्ण गुण आहेत. सुती वा लोकरी धाग्यांचे हे कापड व्हेल्व्हेट व व्हेल्व्हेटीन यांच्यापेक्षा जाड व दणकट असते. ताण्यातील फासे (लाँग व्हेलूर) वा बाण्यातील फासे (ग्रॉस व्हेलूर) यांत्रिक सुऱ्यांनी सफाईदारपणे कापलेले असतात. मुलायम व वजनाला हलके प्रकारही असतात. केसाळ अर्थाच्या लॅटिन शब्दावरून हे नाव पडले आहे. याकरिता विविध प्रकारचे धागे वापरतात. कोट, पडदे, आच्छादने, अभ्रे वगैरेंसाठी हे वापरतात. 

व्हेल्व्हेट कापड : दाट फरसारखा पृष्ठभाग असलेले मऊ, घट्ट कापड. यावरील तंतू ताण्यात असतात व ते यांत्रिक सुऱ्यांनी कापून सर्व धाग्यांची टोके एकाच पातळीवर येतील असे पाहतात. यामुळे या कापडाला वैशिष्ट्यपूर्ण रंग, पोत व रूप प्राप्त होते. हे रेशीम, सूत वा कृत्रिम तंतूंच्या धाग्यांचे बनवितात. याचे अनेक प्रकार असून याचा विविध प्रकारे उपयोग होतो. (उदा. अभ्रे, गालिचे, शोभिवंत वस्तू). 

 

व्हेल्व्हेटीन कापड : बाण्यातील तंतू असणारे मुख्यतः सुती (कधीकधी रेयॉनचे) व व्हेल्व्हेटसारखे दिसणारे कापड. यावरील तंतू आखूड असतात. हे विविध रंगांचे असते व यावर निरनिराळ्या रंगाकृती असतात. स्त्रियामुलांचे कपडे, पडदे, अभ्रे, आच्छादने, पादत्राणाचे भाग वगैरेंकरिता हे वापरतात. 

शर्टिंग : सदऱ्याकरिता वापरण्यात येणारे कापड. याचे असंख्य प्रकार आहेत. (उदा., पॉपलीन, ऑक्सफर्ड, मद्रास, केंब्रिक, ब्रॉडक्लॉथ). मुख्यतः हे सुती असते पण रेशीम, कृत्रिम धागे, लोकर वगैरेंचेही असते. याची वीण साधी वा आकर्षक प्रकारची असते. यावर मर्सरायझेशन, चकाकी आणणे, आकसण्याला विरोधी इ. अंतिम संस्करणे करतात. ते रंगीत, विरंजित वा छापील असते. 

शस्त्रक्रिया कापड : मलमपट्टीसाठी वापरण्यात येणारे विरंजित व जंतुनाशक  प्रक्रिया केलेले जाळीदार कापड. हे निरनिराळ्या रुंदींच्या पट्‌ट्यांच्या गुंडाळ्यांच्या स्वरूपात मिळते. 

शँटुंग कापड : कमी चमकदार, जड, भरड व साध्या विणीचे रेशमी कापड. यासाठी वापरण्यात येणाऱ्या धाग्यातील गाठी, कमीजास्त जाडी, गुठळ्या जशाच्या तशा ठेवतात. शिवाय धाग्याची टोके एकमेकांत गुंतून सर्वत्र बुंदके असल्याचा भास निर्माण होईल असे पाहतात. यामुळे कापडाला वैशिष्ट्यपूर्ण पोत येतो. प्रथम हे शॅंटुंग (चीन) मध्ये कच्च्या रेशमापासून बनविण्यात आले म्हणून हे नाव पडले आहे. आता हे कापड सूत, टसर रेशीम, रेयॉन वा संमिश्र धाग्यांपासूनही बनवितात. पडदे, खेळाडूंचे कपडे, उन्हाळी कपडे, पायजमे, लांब झगे इत्यादींकरिता हे लोकप्रिय कापड वापरतात.

शॅमॉय कापड : शॅमॉय कातड्याप्रमाणे दिसणारे सुती, तंतुमय कापड. हे मागावर वा सुयांनी विणतात. यावरील तंतू योग्य रीतीने कापून व रंगवून कापडाला शॅमॉय कातड्याचे रूप देतात. [⟶ शॅमॉय]. 

शॅलून कापड : वजनाला हलके व विरळ असे टि्वल विणीचे लोकरी वा सुती कापड. हे कोट व अस्तर यांकरिता वापरतात. 

शार्कस्किन कापड : शार्क माशाच्या कातडीसारखे दिसणारे व्हिस्कोज धाग्याचे तलम कापड. ॲसिटेट रेयॉन, स्पन रेयॉन, विविध मिश्र धाग्यांपासूनही हे बनवितात. पुरुषांचे तसेच उन्हाळी कपडे बनविण्यासाठी हे वापरतात.  

शाल : सर्वसामान्यपणे लोकरीच्या उंची व मुख्यत्वे पांधरावयाच्या वस्त्राला शाल म्हणतात. मात्र हे सुती, रेशमी वा अन्य धाग्यांचेही असते. यावर पुष्कळदा कशीद्याने वा छपाईने नक्षी, वेलबुट्टी वगैरे काढलेली असते. [⟶ शाल]. 

शालू : उत्तम प्रतीचे, उंची, रेशमी, भरजरी लुगडे. मुख्यतः नवीन वधूकरिता असे एक महावस्त्र घेतात. 


शिडाचे कापड : जाडसर, मजबूत व टिकाऊ कॅनव्हाससारखे कापड. हे ताग, फ्लॅक्स वा नायलॉन धाग्यांपासून बनवितात. सुती कापड, खेळाडूंचे कपडे, पडदे, गालिचे वगैरेंकरिताही वापरतात. नायलॉनचे कापड सुळसुळीत, वजनाला हलके, टिकाऊ व मजबूतही असते. हे लवकर सुकते तसेच खारे पाणी व दमटपणा यांना विरोधी असते. 

शिफॉन कापड : वजनाला अत्यंत हलके, पातळ, मऊ व साध्या विणीचे, रेशमाचे वा कृत्रिम धाग्याचे कापड. हे काहीसे पारदर्शक व मंद चमक असणारे असते. दिसायला तलम असले, तरी सापेक्षतः भक्कम असते. हे रंगवितात वा यावर छापील नक्षी काढतात. पोषाख, गळपट्‌टे, बुरखा इत्यादींकरिता हे वापरतात. 

शृंखला कापड : जाड, जड व औद्योगिक गाळण्यांसाठी वापरण्यात येणारे सुती कापड.  

संयुक्त कापड : दोन वा अधिक भिन्न तंतूंच्या धाग्यांपासून बनविलेले कापड. विशेषतः सुती ताणा व लोकरीचा अगर लिननचा बाणा असणारे कापड यात येते पण ताण्याबाण्याकरिता रेशमासारखे अन्य धागेही वापरतात. 

सतरंजी : बिछायतीचे, जाड, रंगीत व बहुधा पट्टेदार कापड. हे विविध आकारमानांचे असून मद्रासी सतरंज्या विशेष प्रसिद्ध आहेत. 

सर्ज कापड : मुख्यत्वे विशिष्ट प्रकारची टि्वल वीण वापरून बनविलेले भक्कम कापड. हे मुळात रेशमांचे बनवीत असावेत कारण हे नाव रेशीम अर्थाच्या लॅटिन शब्दावरून पडले आहे. आता हे लोकर, सूत, रेयॉन वा मिश्र धाग्यांचे बनवितात. पुष्कळदा विणकाम करताना शंकरपाळ्यासारख्या आकृती विणतात. नेव्ही निळ्या रंगाचे कापड विशेष लोकप्रिय असून कपडे, अस्तर, खेळाडूंचे कपडे वगैरेंकरिता याचा उपयोग करतात.

सॅक्सनी कापड : उच्च प्रतीच्या (मेरिनो) लोकरीपासून बनविलेले मऊ, सूक्ष्म तंतुमय, सामान्यतः टि्वल विणीचे उंची कापड. हे मुळात सॅक्सनी (जर्मनी) मध्ये बनविण्यात आले व म्हणून हे नाव पडले. 

सॅटीन कापड : मजबूत, चमकदार व सामान्यपणे पाच धाग्यांची वीण वापरून बनविलेले सुळसुळीत सुती कापड. मर्सरायझेशन क्रियेमुळे हे चमकदार दिसते. रेशमी, रेयॉन, नायलॉन इ. धाग्यांपासूनही हे बनवितात. उंची कपड्यांचे अस्तर, सायंकालीन कपडे वगैरेंसाठी हे वापरतात.

साडी : विशेषकरून भारतीय स्त्रियांचा दीर्घकाळापासून वापरात असलेला वस्त्रविशेष. साडी सुती, रेशमी वा कृत्रिम धाग्यांची असते. ती रंगीत, छापील वा पांढरी असते. किनार व पदर यांवर विशेष नक्षी व कलाकुसर केलेली असते. साडीची लांबी पाच, साडे पाच वा आठ मीटर असते व रुंदी (वा उंची) जवळजवळ ११२ ते ११७ सेंमी. असते. [⟶ साडी].

साफा : साध्या विणकामाने बनविलेला ठराविक लांबीरुंदीचा, सामान्यतः चौरस व वजनाला हलका असा पंजाबी पद्धतीने डोक्याला बांधावयाचा सुती वा रेशमी कापडाचा तुकडा. कधीकधी यात जरीचे धागे वा किनार असते.

सायलीशिया कापड : चांगले कॅलेंडरिंग केलेले, झगझगीत टि्वल कापड. मुळात हे सायलीशियात (जर्मनी) बनवीत म्हणून नाव पडले. अस्तरासाठी व खिशांसाठी हे वापरतात.


सारंग कापड : सरळ विणीचे, चमकदार, रंगीत पट्‌ट्यांचे कापड. हे मुख्यतः पौर्वात्य देशांत गळ्याभोवती वा कमरेभोवती गुंडाळण्यासाठी वापरतात. याच्या दोन्ही कडांवर साडीच्या पदरासारखी नक्षी असते.

सीअर-सकर कापड : टिकाऊ, पातळ, वजनाला हलके, साध्या विणीचे व चुणीदार कापड. ताण्याचे काही धागे ताठ व काही धागे ढिले ठेवून विणकाम केल्याने कापड मधून ताठ व मधून ढिले असा परिणाम (चुणीदार) होतो. याला धुलाईनंतर इस्त्रीची गरज नसते. हे क्रेपसारखे नसते. हे लिननचे, सुती, रेयॉनचे वा नायलॉनचे असते. उन्हाळी कपडे, परिचारिकांचे गणवेश, पायजमा, रात्रीचे कपडे वगैरेंकरिता हे वापरतात.

सीलस्किन कापड : हुबेहूब सील या प्राण्याच्या फर (कातडी) प्रमाणे दिसणारे चमकदार, काळे कापड. हे प्लश कापडासारखे असते. सूत, रेशीम, मोहेर यांपासून हे बनवितात.

सुटिंग : सूट बनविण्यासाठी वापरण्यात येणारे कापड. हे निरनिराळ्या विणींचे, पोतांचे, आकृतिबंधांचे आणि सर्व प्रकारच्या व संमिश्र धाग्यांचे असते. कापडाचा हा महत्त्वाचा गट आहे. लोकरी, कृत्रिम (विशेषतः स्पन), सुती, फ्लॅक्स व संमिश्र धाग्यांचे असे कापड अधिक वापरात आहे.

सुताडा : (झोऱ्या). जाड, भक्कम, सुती वस्त्र हे अंथरण्यासाठी वा पांघरण्यासाठी वापरतात.

सुरा कापड : मऊ, वजनाला हलके, घट्ट, चमकदार, रेशमी वा कृत्रिम धाग्यांचे कापड. टि्वल विणीमुळे दिसणाऱ्या तिरप्या रेघा हे याचे वैशिष्ट्य आहे. कापड अथवा धागा रंगवितात. यावर छपाईही करतात. याचे नाव सुरत (गुजरात) या गावाच्या नावावरून पडले आहे. गळपट्टे, मफलर, पोषाख, टाय वगैरेंकरिता याचा वापर करतात. याला टाय-कापड असेही म्हणतात. छापील व पुरुषांच्या कपड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या अशा कापडाला फूलार्ड म्हणतात.

सूसी कापड : तलम सुताचे, सरळ विणीचे रंगीत पट्टे (वा रेघा) असलेले कापड. ताण्यात रंगीत धागे वापरून हे पट्टे बनवितात. असे पट्टे रेशमीही असतात. सलवार, दुपट्टे इत्यादींकरिता हे वापरतात. विशेषकरून भारत व पाकिस्तानात हे तयार होते.

सेलोफेन-आच्छादित कापड : व्हिस्कोज प्रक्रियेने बनविलेल्या कागदासारख्या पारदर्शक पटलाने आच्छादिलेले कापड. यामुळे कापड वास, ग्रीज, आर्द्रता यांना अभेद्य बनते. पडदे, दिव्याची आच्छादने, कपड्यांच्या पिशव्या वगैरेंसाठी हे वापरतात.

सेल्व्हेज कापड : दोन्ही काठांना ताण्याचे जास्त धागे वापरून बनविलेले मजबूत काठांचे कापड. अशा अरुंद काठांमुळे धागे सुटण्याला प्रतिबंध होतो.

स्क्रिम कापड : वजनाला हलके, साध्या विणीचे विरविरीत सुती कापड. पडदे, उन्हाळी कपडे वगैरेंमध्ये वापरतात.

स्टॉकिनेट कापड : यांत्रिक सुयांच्या साहाय्याने बनविलेले सरळ अथवा नळीसारखे कापड. हे सुती, लोकरी, कृत्रिम धाग्यांचे वा संमिश्र धाग्यांचे असते. अंतर्वस्त्रे, होज पाइप, वायुमुखवटे वगैरेंमध्ये याचा उपयोग करतात.

स्पन लिनन : अत्यंत तलम विणीचे हे कापड हातरुमाल, टाय इत्यादींसाठी वापरतात.


स्प्लिट कापड : रुंद मागावर कमी रुंदीचे दोन पट्टे विणून मग त्याचे मध्यभागी फाडून दोन भाग करता येतात असे कापड. टॉवेल, पंचे, तंतुमय कापड इत्यादींसाठी हे वापरतात.

स्वेड कापड : स्वेड वा शॅमॉय कातड्यासारखे तंतुमय दिसेल अशी प्रक्रिया करून मागावर वा यांत्रिक सुयांनी बनविलेले सुती, लोकरी वा रेयॉनचे कापड. क्रीडावस्त्रे, हातमोजे, अस्तर, अपघर्षक कापड, जॅकेट यांकरिता हे वापरतात. हे एकाच बाजूने तंतुमय असते.

हनीकोंब कापड : (वॅफल क्लॉथ). मधमाश्यांच्या पोळ्याप्रमाणे दिसणारे व त्यामुळे हाताला खरबरीत (उंचसखल) लागणारे सुती कापड. ज्या विणीमुळे असा पृष्ठभाग कापडाला प्राप्त होतो तिला हनीकोंब वीण म्हणतात. अशा अधिक तलम सुती कापडाला वॅफल कापड म्हणतात. पाणी चांगले शोषून घेत असल्याने याचा स्नानाचे रुमाल, झगे यांसाठी विशेष वापर होतो. शिवाय हे कापड स्त्रियांचे व मुलांचे कपडे, पडदे, आच्छादन, कोट, दुलई वगैरेंसाठी वापरतात.

हवाई छत्रीचे कापड : सरळ व घट्ट विणीचे, वजनाला हलके व मजबूत कापड. वैमानिक व सैनिक उतरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हवाई छत्रीचे कापड रेशमी किंवा नायलॉनचे असते. खाद्यपदार्थ, अन्य वस्तू वगैरे माल उतरविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हवाई छत्रीचे कापड रेयॉन या अधिक मजबूत धाग्याचे बनवितात. हे मऊ, तलम व चमकदार, तसेच पांढरे वा परिसराशी मिळत्याजुळत्या रंगाचे असते.

हातरूमाल लिनन : तलम, पातळ व वजनाला हलके साध्या विणीचे कापड. हे हातरुमाल, मुलांचे कपडे, पडदे, अंतर्वस्त्रे वगैरेंसाठी वापरतात. यालाच लिनन केंब्रिक असेही म्हणतात.

हाबुताई कापड : थोडाच पीळ दिलेल्या कच्च्या रेशमी धाग्यांपासून विणलेले मऊ, वजनाला हलके व घट्ट असे जपानी कापड. कोट, जाकीट इ. कपड्यांकरिता हे वापरतात.

 

हिकरी कापड : मजबूत, टिकाऊ, पट्‌ट्यापट्‌ट्यांचे टि्वल सुती कापड. ताणा रंगीत व पांढऱ्या धाग्यांचा व बाणा पांढऱ्या धाग्यांचा वापरतात. यामुळे सामान्यतः निळे वा तपकिरी रंगाचे पट्‌टे बनतात. कामगारांचे कपडे, सदरे, विजारी यांसाठी याचा उपयोग होतो.

हेरिंगबोन टि्वलकापड : विणकामात सलग नागमोडी आकृतिबंध निर्माण होईल अशा प्रकारे कापडावरील कर्णाच्या दिशेतील रेषांची रचना केल्यावर तयार होणारे कापड. हा आकृतिबंध बाणांच्या टोकासारखा वा हेरिंग माशाच्या कण्याच्या रचनेप्रमाणे दिसतो म्हणजे विणीची रचना जणूकाही एकदम बदलल्यासारखी वाटते. हे एक सर्वांत लोकप्रिय टि्वल कापड असून ते विविध प्रकारचे कपडे, ओव्हरकोट, खेळाडूंचे कपडे वगैरेंकरिता वापरतात. याला शेव्हरॉन विणीचे कापड असेही म्हणतात.

होजियरी : सुयांच्या मदतीने विणून बनविलेले कापड किंवा कपडे. [⟶ होजियरी].

पहा : कापड उद्योग कापड छपाई कापडावरील अंतिम संस्करण खादी उद्योग गालिचे फेल्ट, फ्लॅनेल लिनन विणकाम शाल साडी हातमाग उद्योग होजियरी

संदर्भ : 1. Barve, V. R. Complete Textile Encyclopaedia, Bombay, 1967.

           2. Marks, S. S. Ed., Fairchild’s Dictionary of Textiles, New York, 1959.

           3. Press, J. J., Ed., Man-Made Textile Encyclopaedia, London, 1959.

           4. Segal, W. C. and others. AF Encyclopedia of Textiles, Englewood Cliffs, N. J., 1960.

भागवत, रा. शं. ठाकूर, अ. ना.