सिंगर, आयझाक मेरिट : (२७ ऑक्टोबर १८११– २३ जुलै १८७५). अमेरिकन संशोधक व उद्योगपती. घरगुती तसेच व्यावसायिक वापराच्या शिवणयंत्राचे निर्माते. त्यांच्या आय्. एम्. सिंगर अँड कंपनीने अनेक देशांत कारखाने काढल्यामुळे ती अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून प्रसिद्घ झाली.

सिंगर यांचा जन्म पिट्सटाउन (न्यूयॉर्क) येथे झाला. त्यांचे वडील आदाम सिंगर हे सॅक्सनी (जर्मनी) येथून अमेरिकेत येऊन स्थायिक झाले होते. सुरुवातीला आयझाक यांनी भावाच्या यंत्रशाळेत ऑस्विगो (न्यूयॉर्क) येथे काम केले. त्यांनी इलिनॉय ते मॅसॅचूसेट्सपर्यंत फिरस्ते यंत्रज्ञ म्हणून काम केले. त्यांनी खडक-वेधन यंत्र (१८३९) आणि धातू व लाकूड तक्षण यंत्रे (१८४९) यांची एकस्वे (पेटंटे) घेतली.

बॉस्टन येथील फेल्प्स यंत्रशाळेत काम करीत असताना, सिंगर यांनी दुरुस्तीला आलेल्या लेरो अँड ब्लॉगेट शिवणयंत्रात सुधारणा केल्या आणि ते यंत्र कार्यक्षम व बहुगुणी असे तयार केले. त्यांनी आपल्या शिवणयंत्राचे १२ ऑगस्ट १८५१ रोजी एकस्व घेतले. त्यांनी एडवर्ड क्लार्क यांच्या साहाय्याने शिवणयंत्रांच्या निर्मितीकरिता आय्. एम्. सिंगर अँड कंपनी काढली (१८५१). सिंगर यांनी आपल्या शिवणयंत्रात वेळोवेळी केलेल्या सुधारणांची वीस एकस्वे घेतली (१८५१–६३).

सिंगर १८६२ मध्ये यूरोपला गेले व तेथेच त्यांनी उर्वरित आयुष्य घालविले. त्यांनी १८६७ मध्ये स्कॉटलंड येथे शिवणयंत्राचा कारखाना काढला. त्यानंतर त्यांनी फ्रान्समध्ये पॅरिसजवळ व ब्राझीलमध्ये रीओ दे जानेरो येथे कारखाने काढले.

इलिअस हौ यांनी सिंगर यांच्याविरुद्घ न्यायालयात एकस्व कायदा मोडल्याबद्दल खटला दाखल केला होता (१८५१– ५४) आणि या खटल्यामध्ये सिंगर हरले होते परंतु यंत्राच्या मोठ्या यशामुळे त्यांचे फार नुकसान झाले नाही.

सिंगर यांचे पेगन्‌टन (इंग्लंड) येथे निधन झाले.

पहा : शिवणयंत्र.

कुलकर्णी, स. वि.