पेंड : तेलबियांतील व तेल असलेल्या फळांतील बहुतांश तेल काढून घेतल्यावर उरणारा भाग. बैलघाण्याने किंवा यांत्रिक पद्धतीने तेल काढल्यावर राहणाऱ्या पेंडीत वजनी ५—१० % तेल शिल्लक असते. या पेंडीतील तेल विद्रावक निष्कर्षणाने [→ तेले व वसा] काढता येते व खाद्येतर उपयोगासाठी वापरता येते. भुईमूग, सरकी, जवस, खोबरे, सोयाबीन, सूर्यफूल व पाम-मगज [तेल माडाच्या फळाचा गर; → तेल माड] यांच्या पेंडी महत्त्वाच्या आहेत.

पेंडीचे घटक : विविध पेंडींतील सरासरी घटक कोष्टकात दिले आहेत. याशिवाय नायट्रोजन व पोटॅशियम यांची लवणे व जीवनसत्त्वे पेंडीत अत्यल्प प्रमाणांत आढळतात.

उपयोग : पशुखाद्याचा एक घटक म्हणून व खत म्हणून पेंडींचा उपयोग केला जातो. पेंडींमधील प्रथिने दुग्धोत्पादन आणि जनावरांची वाढ या दृष्टीने फार महत्त्वाची असल्यामुळे गाई, म्हशी, वासरे, डुकरे इ. जनावरांच्या खाद्यात भुईमूग, सरकी, खोबरे, जवस यांच्या पेंडींचा समावेश करतात. पेंडीतील तेलाला पोषणाच्या दृष्टीने महत्त्व नाही; परंतु त्यामुळे पेंड जनावरांना रुचकर लागते. एरंड, करंज, निंब, मोहरी यांच्या पेंडी पशुखाद्य म्हणून निरुपयोगी आहेत. त्या खत म्हणून वापरतात.

विशेष काळजी घेऊन मिळविलेल्या तेलरहित पेंडीपासून प्रथिने वेगळी काढता येतात. त्यांचा उपयोग पूरक आहार, कृत्रिम तंतू व आसंजके (चिकटविण्याकरिता वापरण्यात येणारे पदार्थ) बनविण्यासाठी होतो.

आयात व निर्यात : भारत जरी पेंडीच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असला, तरी अल्प प्रमाणात पेंडीची आयात करण्यात येते. ही आयात प्रामुख्याने नेपाळहून करण्यात येते. १९६९-७० मध्ये तैलयुक्त पेंडीची सु. ६,९८४ टनाची, तर १९७३-७४ मध्ये तैलयुक्त पेंडीची सु. ४,४४५ टनाची व तेलविरहित पेंडीची सु. १,५५२ टनांची आयात करण्यात आली. भारतातून विविध प्रकारच्या पेंडींची निर्यात जपान, ग्रेट ब्रिटन, नेदर्लंड्स, पोलंड, इटली, रशिया, जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया इ. देशांना करण्यात येते. १९६९-७० मध्ये सु. ६.३३ लक्ष टन व १९७३-७४ मध्ये सु. १२.४७ लक्ष टन इतक्या पेंडीची निर्यात करण्यात आली.

मिठारी, भू. चिं.