तात : जनावरांच्या आतड्यांपासून बनविलेल्या चिवट व बळकट धाग्यांना तात असे म्हणतात. इंग्रजीत त्यांचा उल्लेख कॅटगट म्हणून केला जातो, परंतु त्याचा मांजराशी काही संबंध नाही. पूर्वी ‘किट्’ या नावाचे एक तंतुवाद्य प्रचारात होते त्यासाठी तात वापरीत असत. त्यावरून ‘किट्–गट’ चा अपभ्रंश होऊन ‘कॅटगट’ झाले असावे. मेंढ्या, बकरी आणि क्वचित घोडे, खेचरे व गाढवे यांच्या आतड्यांपासून तात बनवितात. आतड्याशिवाय प्राण्यांच्या इतर भागांपासूनही असे धागे बनविले जातात. त्यांचा अंतर्भाव या लेखात तातीसारखे धागे म्हणून केला आहे.

उपयोग : टेनिस, बॅडमिंटन इ. तत्सम खेळांत वापरण्यात येणाऱ्या रॅकेटी विणण्यासाठी फिड्ल, हार्प इ. तंतुवाद्यांच्या तंतूंसाठी आणि शस्त्रक्रियेमध्ये रक्तवाहिन्या बांधण्यासाठी व जखमा शिवण्यासाठी तात मुख्यतः वापरली जाते. यांशिवाय लहान यंत्रातील चाकांचे पट्टे म्हणून (उदा., कातकामाचे यंत्र), हाताने कापूस पिंजण्याच्या धनुकलीची व धनुर्विद्येतील धनुष्याची दोरी यांसाठी तात उपयोगी पडते.

बनविण्याची सर्वसाधारण प्रक्रिया : या प्रक्रियेत सामान्यतः पुढील क्रियांचा समावेश होतो. कच्चा माल म्हणून वापरावयाची  आतडी धुवून स्वच्छ करणे, ती चरबीरहित करणे, पृष्ठभाग खरवडून काढणे, पट्ट्या कापणे, त्यांना ताण देणे, तंतू एकत्र करून धागे वळणे आणि ते गुळगुळीत करणे. शस्त्रक्रियेत वापरावयाचे धागे जंतुरहितही करावे लागतात.

क्रीडा साहित्योपयोगी तात : क्रीडा साहित्यात वापरली जाणारी ‘रौदा’ या नावावे ओळखली जाणारी तात मेंढ्या व बकरी यांच्या आतड्यांपासून बनवितात. तात करण्याच्या कारखान्यात येणारी आतडी खारवलेली व वाळवलेली असतात म्हणून प्रथम ती पाण्यातबुडवून ठेवतात.त्यामुळे त्यांना लावलेले मीठ विरघळून जाते व ती ओली होतात. नंतर रुई किंवा मांदार या झाडांच्या चिकात ती रात्रभर ठेवून देतात. त्यातून काढल्यावर त्यामधील चरबी निघून जावी म्हणून ती पॉटेशियम सायनाइडाच्या विद्रावात ३-४ दिवस राहू देतात. त्यानंतर लोखंडी तासणीने ती घासतात व वारंवार धुतात  त्यामुळे त्यांना लागलेली घाण निघून जाते आणि त्यांची जाडीही कमी होते. आतडी विरंजित करण्यासाठी (रंग काढून टाकण्यासाठी) त्यांना हायड्रोजन पेरॉक्साइड, सोडियम परबोरेट इ. रसायन-मिश्रणांच्या जलीय विद्रावात ३-४ दिवस ठेवून देतात. त्यानंतर अखंड धागा मिळावा म्हणून आतडी एकापुढे एक जोडून घेतात आणि ती लवचिक व मऊ बनावित म्हणून काही रासायनिक द्रव्यांच्या मिश्रणांची विक्रिया करून अखेरीस ती स्वच्छ करून वाळवितात.

धागे रंगीत करण्यासाठी जलविद्राव्य (पाण्यात विरघळणारे) रंग वापरतात. काळा अपारदर्शक धागा रंगविल्यावर कातून व ताण देऊन तयार केलेला असतो. वाळल्यावर त्याला पीळ देतात आणि अपघर्षकांनी (घासून व खरवडून पृष्ठ गुळगुळीत करणाऱ्या पदार्थांनी) घासून त्याला गुळगुळीत बनवितात व तेलाचा हात देतात. अलीकडे तातीऐवजी नायलॉन व पोलादी तार काही ठिकाणी वापरण्यात येऊ लागली आहे.

शस्त्रक्रियेत वापरण्याची तात : शस्त्रक्रियेत तात वापरणे फार सोयीचे असते कारण जखम शिवण्यासाठी तातीचा उपयोग केला असता टाके काढावे लागत नाहीत. ते शरीरात शोषले जातात. यासाठी लागणारी तात निरोगी मेंढ्यांच्या लहान आतड्यांच्या आतील श्लेष्मल (बुळबुळीत) आवरणाच्या खाली असणाऱ्या ऊतकांपासून (पेशींच्या समूहांपासून) बनविलेली असते. खारवलेली मेंढ्यांची आतडी प्रथम क्षारीय (अल्कलाइन) विद्रावात भिजवून लवचिक करून घेतात. त्यानंतर पृष्ठभाग खरवडून काढण्याची, चरबी काढून टाकण्याची व विरंजनाची क्रिया केल्यावर जाडीनुसार त्यांची विभागणी करून ती दुहेरी किंवा तिहेरी करून घेतात आणि आर्द्रतायुक्त खोलीत त्यांना पीळ देतात. त्यानंतर १० दिवस त्यांना वाळू देतात व अपघर्षक कागदाने घासून पृष्ठभाग गुळगुळीत बनवितात. धाग्यांची जाडी सर्वत्र सारखी आहे व त्यांची ताणशक्ती यथायोग्य आहे, याची खात्री करून घेतल्यावर गुंडाळून त्यांच्या लड्या बनवितात आणि त्या सेलोफेनाच्या पिशव्यांत भरून त्यांवर जंतुनाशक प्रक्रिया करतात. ही प्रक्रिया प्रदीर्घ असून झायलॉलामध्ये २५०° से. तापमानात २ तास ठेवणे, त्यानंतर झायलॉल काढून टाकून मर्क्युरिक आयोडाइडाच्या विद्रावात निर्जंतुक स्थितीत बंद करून ठेवणे या क्रियांचा तीमध्ये समावेश होतो. धागे खरोखर निर्जंतुक झाले आहेत याची खात्री करण्यासाठी तयार मालातील काही नमुने घेऊन त्यांची कसून तपासणीही केली जाते.

जखमांसाठी वापरलेली तात ठराविक मुदतीत (उदा., २० दिवस, ३० दिवस इ.) शरीरात मिळून जावी अशी अपेक्षा असते. यासाठी धागे प्रथम हायपोसल्फाइट आणि नंतर क्रोमिक अम्ल, सोडियम सल्फाइड व हायड्रोक्लोरिक अम्ल यांच्या मिश्रणात कमीअधिक काळ ठेवतात. या क्रियेला क्रोमिसायझिंग असे म्हणतात.

कांगारूची कंडरा (स्नायुतंतूंची टोके व अस्थी अथवा इतर संरचना यांना जोडणारे तंतुमय दोरीसारखे ऊतक), गायीबैलांच्या मांडीच्या स्नायूंना असणारे तंतुमय आवरण आणि आंत्रपुच्छ (ॲपेंडिक्स) यांपासूनही शरीरात शोषले जातील असे शस्त्रक्रियेत उपयोगी पडणारे धागे बनविता येतात.


शरीरात शोषला न जाणारा एक प्रकारचा धागा रेशमाच्या किड्यांच्या रेशीम ग्रंथीपासून मिळतो. त्याकरिता किड्यांच्या या ग्रंथी काढून घेऊन ताणून सरळ करतात आणि टोके कापून मधलासु. ३० सेंमी. लांबीचा भाग गार पाण्यात भिजवून, नंतर विरंजित करूनव धुवून छायेत वाळवितात. नंतर उष्ण पृष्ठांच्या साहाय्याने त्याला सरळ बनवितात आणि लांबी व जाडी यांनुसार वर्गवारी करूनव लड्या बनवून त्या सेलोफेन आवरणात भरतात.

अलीकडे नायलॉन व इतरही काही धागे जखमा शिवण्यासाठी वापरले जाऊ लागले आहेत [ → शस्त्रक्रिया तंत्र].

तंतुवाद्यासाठी तात : वीणा, सतार, सारंगी इ. तंतुवाद्यांत धातूंच्या तारा वापरतात परंतु फिड्‌ल, हार्प यांसारख्या काही तंतुवाद्यांत तातीचा उपयोग करतात. यांसाठी योग्य अशी तात रोम व नेपल्स येथे बनते. ती ‘रोमन–स्ट्रिंग’ म्हणून प्रसिद्ध आहे.

तातीसारखे इतर प्राणिज धागे : ‘पाठा’ या नावाने ओळखले जाणारे क्रीडाक्षेत्रात उपयोगी पडणारे धागे प्राण्यांच्या कंडरांपासून बनवितात.

यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल अर्धवट वाळलेल्या स्थितीत कारखान्यात येतो. प्रथम त्यावर आघात करून त्यातील तंतू मांस वगैरे इतर पदार्थांपासून मोकळे करतात व सोडियम सल्फाइटाच्या विद्रावाने भिजवितात. नंतर त्यांचे विरंजन करतात आणि जलविद्राव्य रंग वापरून त्यांना इष्ट रंग देतात. यानंतर तंतू एकापूढे एक जोडून ताणणे, पीळ देणे, वाळविणे, पृष्ठभाग गुळगुळीत करणे इ. संस्कार करतात.

पुष्ट जनावरांपेक्षा हडकुळ्या जनावरांपासून मिळणारे धागे जास्त टिकाऊ असतात. म्हातारे बैल व रेडे यांपासून बळकट धागे मिळतात.

भारतीय उद्योग : क्रीडाक्षेत्रात उपयोगी पडणारी तात बनविणारा एक कारखाना १८८८ मध्ये सियालकोट येथे स्थापन झाला. आता हे ठिकाण पाकिस्तानात गेले आहे. परंतु जलंदर, बटाला, मीरत, आग्रा, बुलंद शहर व दिल्ली येथे अशी तात तयार करणारे लहान कारखाने आहेत.

शरीरात एकजीव होणारी तात कसौली येथे १९५१ पर्यंत बनत असे. पुढे हे उत्पादन बंद पडले. एकजीव न होणारा धागा १९३८ पासून कोळ्ळेगाळ (तमिळनाडू) येथे होऊ लागला. १९५० मध्ये कुन्नुर येथेही याचे उत्पादन सुरू झाले आहे. मुंबईत शस्त्रक्रियेसाठी लागणारी तात तयार करणारा एक मोठा कारखाना अलीकडे निघाला आहे. भारतात या धाग्यांची गरज भागविण्यासाठी काही प्रमाणात आयात करावी लागते.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Vol. IV, New Delhi, 1957.

मिठारी, भू. चिं.