ल्ग्युरा : (लशातल्येराइट). सैलसर सुट्या वाळूवर वीज पडून बनलेले नलिकाकार वा दंडाकार पिंड. विजेमुळे वाळू वितळून काचेसारखे द्रव्य तयार होते त्यापासून हे पिंड बनतात. अशाच प्रकारे खडकाच्या पृष्ठावर वीज पडून तेथे अतिशय पातळ काचमय पापुद्रे बनतात, त्यांनाही फल्ग्युराइट म्हणतात. वीज अर्थाच्या लॅटिन शब्दावरून फल्ग्युराइट हे नाव पडले आहे. सिलिकामय वालुका-फल्ग्युराइटाच्या काचेला आल्फ्रेद लाक्र‌वा यांनी आंरी शातल्ये यांच्या बहुमानार्थ लशातल्येराइट हेही नाव दिले आहे. वाळू आणि खडक यांपासून बनलेले फल्ग्युराइट वेगळे ओळखता येतात. यांपैकी वालुका-फल्ग्युराइट अधिक सामान्यपणे आढळतो.

वालुका-फल्ग्युराइट नलिकाकार व कधीकधी शाखित असतो. त्याचा व्यास १ ते काही सेंमी. व लांबी सामान्यपणे ३५ सेंमी.पेक्षा कमी असते. मात्र काही नमुन्यांची लांबी २० मी. पर्यंतही असल्याचे आढळले आहे परंतु ठिसूळपणामुळे याचे तुकडेच अधिक प्रमाणात आढळतात. नलिकांच्या भिंतीची जाडी ०·१३ ते ०·२५ सेंमी असते. नलिकेच्या आतील पृष्ठावर बहुधा काचेचे गुळगुळीत अस्तर असते व बाहेरील पृष्ठावर वाळूचे कण चिकटलेले असतात. वालुका-फल्ग्युराइटाचे चांगले नमुने मिशिगन सरोवराच्या (उ.अमेरिका) काठावर व अटलांटिक महासागराच्या किनारी भागांत आढळतात. यांशिवाय मौंट ॲरारात (तुर्कस्तान), पिरेनीज, मेक्सिको व ला प्लाता (अर्जेटिना) भागांतही वालुका-फल्ग्युराइट आढळतात.

वीज पडून खडकांच्या पृष्ठभागावर बनलेले काचमय पापुद्रे किंवा शैल-फल्ग्युराइट हे बहुधा पर्वतशिखराच्या भोवतीच्या भागात आढळतात. हे टोलूका (मेक्सिको), कॉकेशस आणि मौंट थील्सन येथे आढळले असून अमेरिकेतील ॲरिझोनामधील प्रसिद्ध अशनिविवरातही (जमिनीवर पडलेल्या अशनीच्या आघाताने बनलेल्या खळग्यातही) फल्ग्युराइट आढळले आहेत. मात्र या ठिकाणी फल्ग्युराइट विजेऐवजी अशनी आदळून निर्माण झालेल्या उष्णतेमुळे तयार झाले असावेत.

ठाकूर, अ. ना.