ग्लॉकोनाइट : (ग्रीन अर्थ). खनिज. स्फटिक एकनताक्ष [→ स्फटिकविज्ञान] क्वचित आढळतात. सामान्यपणे अस्फटिकी हिरव्या मातीच्या किंवा पातळ लेपाच्या स्वरूपात आढळते. काही नमुने स्फटिकी किंवा कलिली (अतिसूक्ष्म कण लोंबकळत असलेल्या विशिष्ट प्रकारच्या द्रवमिश्रणाच्या रूपात) असावेत. मृण्मय प्रकार क्लोराइटासारखा दिसतो. कठिनता २. वि. गु. २·५ ते २·८. रंग मंद हिरवा ते काळा. कस हिरवा. चमक मंद. रा. सं. लोह व पोटॅशियम यांचे सजल सिलिकेट अंदाजे K(Fe, Mg, Al)2 (Si4O10)(OH)2. बहुतेक सर्व युगांतील सागरी गाळांच्या खडकांत यांचे थर वा लहान कण आढळतात. परंतु हे चटकन बदलत असल्याने जुन्या निक्षेपांत (साठ्यात) क्वचित आढळते. विपुल ग्लॉकोनाइट असलेले हिरवे वालुकाश्म उत्तर क्रिटेशस कालीन (सु. ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) सागरी खडकांत आढळतात. ग्लॉकोनाइट हे ग्रीन सँड या खडकाचा मुख्य घटक असून ते उथळ समुद्रकिनाऱ्यांवर हळूहळू तयार होत असल्याने तेथील चिखल हिरवा दिसतो. यावरून ग्लॉकोनाइट आढळलेल्या ठिकाणी पूर्वी समुद्र असावा असा अंदाज करतात. तसेच ग्लॉकोनाइटाचा स्तरीय विसंगतीशी (समांतर थरांमधील विभाजन दर्शविणाऱ्या पृष्ठांशी) संबंध जोडतात. ते कृष्णाभ्रकापासूनही तयार होते. दक्षिण ट्रॅप म्हणजे महाराष्ट्रातील बेसाल्टी खडकांमध्ये व त्यांच्यातील पोकळ्यांत ग्लॉकोनाइट सापडते. पाणी मृदू करणे (साबणाचा फेस होण्यास योग्य असे करणे), ओतकामाचे साचे इत्यादींसाठी ग्लॉकोनाइट वापरतात. हिरव्या अर्थाच्या जर्मन शब्दावरून केफर स्टाइन यांनी १८२८ साली याला ग्लॉकोनाइट हे नाव दिले.

पहा : मुलतानी माती.

ठाकूर, अ. ना.