अलवर-माला : दिल्ली-संघातील सर्वांत जुन्या व सर्वांत महत्त्वाच्या अशा खडकांच्या मालेचे (गटाचे) नाव. क्वॉर्ट्‌झाइट, अर्कोज, संकोण-वालुकाश्म व पिंडाश्म हे या मालेचे प्रमुख खडक होत (या सर्व खडकांसंबंधी स्वतंत्र नोंदी आहेत). शिवाय शेल किंवा त्यांच्या रूपांतरणाने तयार झालेल्या अभ्रकी ⇨ सुभाजा व अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अल्प असलेल्या) अंतस्तरित लाव्ह्यांच्या व शिलापट्टांच्या खडकांच्या रूपांतरणाने तयार झालेले एपिडायोराइटही या मालेत आहेत. ग्रॅनाइटी शिलारसाचे अंतर्वेशन होऊन (समावेश होऊन) तयार झालेल्या एरिनपुरा ग्रॅनाइटाच्या लहानमोठ्या राशीही या मालेच्या खडकांत घुसलेल्या आढळतात. मालेची एकूण जाडी तीन ते चार हजार मीटरांइतकी असून तिचा तळ ⇨रायालो मालेच्या खडकांवर विसंगत रीतीने वसलेला आहे.

अलवर शहर व पूर्वीच्या अलवर संस्थानात ही माला प्रथम पाहण्यात आल्यावरून तिला ‘अलवर’ नाव दिले गेले (१८७७ संशोधक : सी. ए. हॅकेट). नंतर तसेच खडक भरतपूर , जयपूर व राजस्थानचा बराचसा ईशान्य भाग यांत असल्याने आढळून आले. दिल्ली येथील इतिहास प्रसिद्ध रिज टेकडी अलवर क्वॉर्ट्‍‍झाइटांची आहे. या मालेच्या खडकांपासून अलवरात पूर्वी तांब्याचा धातुपाषाण मोठ्या प्रमाणात काढला जात असे. तांब्याच्या धातुपाषाणांचे ते साठे संपले असले तरी अलवरातील अलवरमालेच्या तळाजवळील खडकांत काही नवे साठे मिळण्याचा संभव आहे .

 

पहा : दिल्ली-संघ.

केळकर, क. वा.