सायेनाइट : हा अग्निज खडक दृश्य स्फटिकयुक्त व खोल जागी तयार झालेला (पातालिक) आहे. याचा पोत कणमय असून यात मुख्यतः ऑर्थोक्लेज, मायक्रोक्लीन (सामान्यतः पर्थाइटमय) ही अल्कली फेल्स्पारे (खनिजे) असतात. यात अल्प प्रमाणात प्लॅजिओक्लेज (ऑलिगोक्लेज), तसेच कृष्णाभ्रक, अँफिबोल व पायरोक्सीन ही कृष्णवर्णीय (मॅफिक) खनिजेही असतात. ऑलिगोक्लेज किंवा अँडेसाइन या सोडा प्लॅजिओक्लेजाचे प्रमाण अल्कली फेल्स्पाराहून जास्त असल्यास खडकाला माँझोनाइट म्हणतात. सायेनाइट व डायोटाइट दरम्यानचे स्थान असलेल्या माँझोनाइटाला सायनोडायोराइटही म्हणतात. माँझोनाइट सर्वसाधारणपणे फिकट ते मध्यम करड्या रंगाचे असतात मात्र सायेनाइट खडक विविध रंगांच्या छटांचे असतात, यामुळे असे रंगीबेरंगी सायेनाइट सजावटीसाठी वापरतात. हा पूर्ण स्फटिकी भरडकणी खडक ⇨ ट्रॅकाइटा शी समतुल्य अंतर्वेशी अग्निज खडक आहे.

संघटन : कॅल्क-अल्कली व अल्कली सायेनाइट हे सामान्य सायेनाइटाचे मुख्य वर्ग आहेत. अल्कली सायेनाइटातील अल्कली फेल्स्पार व मॅफिक खनिजे यांत सोडा (सोडियम ऑक्साइड) विपुल असतो. यात पोटॅश (पोटॅशियम ऑक्साइड) व सोडा यांच्या विविध प्रकारच्या आंतरवृद्घी असून त्यांचा विकास आश्चर्यकारक रीतीने झालेला आढळतो. यातील फेल्स्पारांच्या कणांच्या रूपातील स्फटिकांच्या बाह्यरेषा बऱ्याचशा रेखीव (अंशाकृती) किंवा खडबडीत (अनाकृती) असू शकतात. काही सूक्ष्मकणी सायेनाइटांत व सायेनाइट पॉर्फिरी खडकांत सॅनिडीन खनिज आढळते. सामान्य सायेनाइटांत ऑलिगोक्लेज या सोडा प्लॅजिओक्लेज खनिजाचे स्फटिक असतात. हे स्फटिक अंशाकृती व मंडलित (कॅल्सिक गाभा व सोडिक कडा असे पट्टे असलेले) असू शकतात. काही अल्कली सायेनाइटांत अल्बाइट खनिजाचे पृथक् कणअसतात. [⟶ फेल्स्पार गट].

सामान्य सायेनाइटांत कृष्णाभ्रकाच्या काळ्या (सूक्ष्मदर्शकाखाली उदी)पत्र्या आणि हॉर्नब्लेंड खनिजाचे ओबडधोबड व बुटके प्रचिन असतात. डायॉप्सिडिक ऑजाइट हे सर्वांत सामान्य पायरोक्सीन खनिज असून त्याचा गाभा हॉर्नब्लेंड स्फटिकात बऱ्याच प्रमाणात आढळतो. अल्कली सायेनाइटांत विविध प्रकारची मॅफिक खनिजे असून कृष्णाभ्रक गडद व विपुल लोहयुक्त असते. आर्फव्हेडसोनाइट, हे स्टिंगसाइट किंवा रीबेकाइट ही सोडा विपुल असलेली अँफिबोल खनिजे यात असून ती सामान्यपणे मंडलित असतात. डायॉप्सिडिक व टिटॅनियम विपुल असणारे ऑजाइट स्फटिक सामान्यतः एगिरीन-ऑजाइट व एगिराइट या खनिजांच्या कवचात अवगुंठित झालेले असतात.

सायेनाइटातील गौण खनिजांत क्वार्ट्‌झ असून ती बहुधा आंतरछिद्री असते. क्वॉर्ट्‌झाचे प्रमाण ५ ते १० टक्के असल्यास खडकाला क्वॉर्ट्‌झ सायेनाइट, तर याहून जास्त प्रमाण असल्यास त्या खडकाला ग्रॅनाइट म्हणतात. सायेनाइटात नेफेलीन, सोडालाइट, ल्यूसाइट किंवा कँक्रिनाइट ही फेल्स्पॅथॉइड खनिजे अल्प प्रमाणात असू शकतात [⟶ फेल्स्पॅथॉइड गट] परंतु त्यांचे प्रमाण १० टक्क्यांहून जास्त झाल्यास खडकाला फेल्स्पॅथॉइडमय सायेनाइट म्हणतात. उदा., नेफेलीन सायेनाइट (यातील नेफेलिनाचे कण क्वॉर्ट्‌झासारखे वाटतात मात्र त्यांची चमक ग्रिझासारखी असते). झिर्कॉन, स्फीन, ॲपेटाइट, मॅग्नेटाइट, इल्मेनाइट ही सायेनाइटाच्या खास प्रकारांतील गौण खनिजे असून यांशिवाय विपुल लोहयुक्त ऑलिव्हीन, कुरुविंद, फ्ल्युओराइट, स्पिनेल, गार्नेट, पायराइट इ. गौण खनिजेही सायेनाइटांत आढळतात.

पोत : सायेनाइट पूर्णस्फटिकी असून यातील स्फटिक नुसत्या डोळ्यांनी दिसतात. सायेनाइटाचा सर्वांत सामान्य पोत समकणी असून पिंडाश्मी किंवा भरडकणी पोताचे सायेनाइट स्थानिक स्वरूपात आढळतात. काही सायेनाइटांतील अल्कली फेल्स्पाराच्या सापेक्षतः मोठ्या स्फटिकांमुळे (बृहत्स्फटिकांमुळे) त्यांचा पोत पृषयुक्त (गुरुस्फटिकी) होतो. असे बृहत्स्फटिक सुरुवातीला किंवा नंतर बनलेले असून ते पूर्णाकृती ते अनाकृती स्वरूपाचे असू शकतात. ते सूक्ष्मकणी प्रकारांत व सायेनाइट पॉर्फिरींत विपुल असतात.

संरचना : सायेनाइटांत विविध प्रकारच्या दैशिक (निर्देशक) संरचना असू शकतात. काही सायेनाइटांत भिन्न खनिजांचे पट्टन किंवा समांतर नागमोडी रेखा (श्लिरेन) दिसतात. लांबट खनिजांचे पुंजके व समांतर दिशेत मांडणी होऊन प्रवाही संरचना सायेनाइटात तयार होऊ शकते. वडीसारख्या समाकृती फेल्स्पार स्फटिकांमुळे सायेनाइटाला व्यवच्छेदक असे दृश्य रूप प्राप्त होऊ शकते. काही बाबतींत ही दैशिक वैशिष्ट्ये शिलारसाच्या प्रवाहाचा परिणाम सूचित करतात. इतर बाबतींत ही वैशिष्ट्ये कायांतरित किंवा ⇨ रूपांतरित खडकांतील अवशिष्ट स्तरण किंवा पर्णन यांचे निदर्शक असतात.

आढळ व उत्पत्ती : सायेनाइट हा असामान्य पातालिक खडक असून तो भित्ती, शिलापट्ट, खोड, ज्वालामुखी, गुडदी व लहान ओबडधोबड पातालिक राशी या रूपांत कमी प्रमाणात आढळतो. सामान्य सायेनाइट माँझोनाइट, क्वॉर्ट्‌झ सायेनाइट व ग्रॅनाइट या आणि अल्कली सायेनाइट, अल्कली ग्रॅनाइट किंवा फेल्स्पॅथॉइडल खडकांशी निगडित असतो.

सायेनाइटी शिलारसाचे थेट स्फटिकीभवन होऊन तयार झालेले पुष्कळ सायेनाइट असतात. सायेनाइटासारखे संघटन नसलेला शिलारस व संदूषण करणारे खडकांचे असंख्य तुकडे यांच्यातील विक्रियेतून इतर सायेनाइट निर्माण झाले असावेत. काही सायेनाइट अल्कली विपुल असलेल्या निःसृत द्रव्यांच्या रूपात कायांतरणाने बनलेले असू शकतील. कदाचित खोलवर असलेल्या शिलारसातून मुक्त झालेली अशी निःसृत द्रव्ये खास संघटनाच्या खडकांत भिनली जाऊन आणि त्यांच्या जागी विपुल अल्कली फेल्स्पारे येऊन असे सायेनाइट बनू शकतात.

सायेनाइट हा अल्प प्रमाणात आढळणारा खडक असून त्याचे खाणकाम कमी प्रमाणात होते. उदा., आँटॅरिओ (कॅनडा), ऑस्लो (नॉर्वे) वगैरे. यूरोप व अमेरिकेतही सायेनाइट अल्प प्रमाणात काढतात. प्रत्यक्ष व्यापारात याला ग्रॅनाइट म्हणतात. भारतात सालेमजवळील आर्कीयन शैलसमूहात ऑजाइट सायेनाइट तर कोईमतूर, विशाखापटनम्, किशनगढ (राजस्थान), जुनागढ (गुजरात) येथे नेफेलीन व एलीओलाइट सायेनाइट आणि त्यांचे पिंडाश्म आढळतात. कोईमतूर जिल्ह्यात ऑजाइट व कुरुविंद सायेनाइटही आढळतात. येथील नेफेलीन सायेनाइटात ट्रिप्लाइट व युरेनियमाची खनिजे अल्प प्रमाणात आढळतात. जुनागढजवळील सायेनाइट ⇨ दक्षिण ट्रॅप खडकांच्या भिन्नीभवनाने बनले असावेत. कधीकधी काच व मृत्तिका उद्योगांत नेफेलीन सायेनाइट वापरतात.

सायेन (आताचे आस्वान, ईजिप्त) येथील खाणकामाद्वारे हा खडक प्रथम मिळविण्यात आला म्हणून याचे सायेनाइट हे नाव पडले. थोरले प्लिनी यांनी हे नाव सर्वप्रथम वापरले.

पहा: अग्निजखडक ग्रॅनाइट रूपांतरित खडक शिलारस– १.

ठाकूर, अ. ना.