सर्पेंटाइन : हा सजल फेरोमॅग्नेशियम सिलिकेटी खनिजांचा गट असून मुख्यत्वे त्यांपासून बनलेल्या खडकालाही सर्पेंटाइन म्हणतात.

सर्पेंटाइन खनिजाचे स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार असल्याचे त्यांच्या केवळ छद्मरूपातील आढळावरून म्हणता येते. प्रत्यक्षात त्याचे स्फटिक माहीत नाहीत [⟶ स्फटिकविज्ञान]. सर्पेंटाइनाचे तंतुरूप क्रिसोटाइल व पत्री अँटिगोराइट हे दोन मुख्य प्रकार आहेत. सिलिकेटी संरचनांच्या दंडगोलाकार नलिका बनताना त्या वाकविल्या जाऊन तंतू बनतात. ते तंतू वेगळे करता येतात. मात्र अँटिगोराइटाचे पत्रे अलग करता येत नाहीत. क्रिसोटाइल तंतू ठिसूळ व उत्तम नम्यता असलेले असून ते ०.१५ ते २.५ ( क्वचित १५) सेंमी. लांब असतात. त्यांच्यापासून सहजपणे सूत कातता येते. ४५० गॅम तंतूंपासून ९.६५ किमी. लांब इतका सूक्ष्म धागा काढता येतो. सर्पेंटाइनाचे रंग हिरवा, हिरवट पिवळा, हिरवट करडा, पांढरा असे असतात. रंगांचे अनियमित आकारांचे पट्टे आढळतात. तसेच फिकट व गडद हिरव्या रंगावर मुख्यत: पांढरे ठिपकेही आढळतात. उघडे पडल्याने पुष्कळदा हे पिवळट करडे होते. याचा कस पांढरा व किंचित चमकदार असतो. हे संपुंजित, कणमय, चूर्णमय, गूढस्फटिकी व पापुद्रयांच्या रूपांतही आढळते. याचे वि. गु. २.२ ( तंतुमय ) ते २.६५ ( संपुंजित) असून याची कठिनता २ ( सुरीने कापता येते ) ते ५ पर्यंत असते. याची चमक रेशमासारखी, मोत्यासारखी, रेझिनासारखी, गिजासारखी, मेणासारखी किंवा मातकट असून याचा स्पर्श काहीसा साबणासारखा असतो. याचे भंजन शंखाभ वा ढलपीसारखे असते. हे दुधीकाचेप्रमाणे पारभासी ते अपारदर्शक असून पारभासी प्रकार जेड रत्नाला पर्याय म्हणून वापरतात [⟶ खनिजविज्ञान].

रा. सं. ( Mg, Fe)3 Si2O5 ( OH )4 . यात अल्प प्रमाणात फेरस लोह वा निकेल असू शकते. क्रिसोटाइलाचा वितळबिंदू १,५२०° से. असून हे अगलनीय, अज्वलनशील, उष्णतेचे कुसंवाहक आहे. उच्च तापमानाला ते ठिसूळ होते. उष्णता व विद्युत् यांचे निरोधक असलेल्या क्रिसोटाइलावर अम्लाचा सहजपणे परिणाम होत नाही. बंद नळीत तापविल्यास याच्यापासून ( तंतुरूप अँफिबोलापेक्षा अधिक ) पाणी मिळते. मात्र याची जेली बनत नाही. रंग, मऊपणा, चमक व तंतुरूप स्वरूप या गुणधर्मांमुळे ते वेगळे ओळखता येते.

सर्पेंटाइन हे व्यापकपणे आढळणारे सामान्य खनिज असून ते सामान्यपणे अग्निज खडकांत विखुरलेल्या कणांच्या रूपात आढळते. सर्पेंटाइन खडकात क्रिसोटाइल शिरांच्या रूपात आढळते. बऱ्याचदा सर्पेंटाइनाबरोबर मॅग्नेसाइट, क्रोमाइट, मॅग्नेटाइट, ग्रॅनिएराइट इ. खनिजे आढळतात. ऑलिव्हीन, पायरोक्सीन, अँफिबोल यांसारख्या मॅग्नेशियम सिलिकेटी खनिजांचे जलसंयोगाने किंवा त्यांच्यावर पाणी व कार्बन डाय-ऑक्साइड यांची एकत्रित विक्रिया होऊन सामान्यपणे सर्पेंटाइन बनते.

खाणीतून काढलेल्या खडकांतून ५ ते १० टक्केच क्रिसोटाइल मिळते. कॅनडाच्या क्वेबेक प्रांतातील थेटफार्ड जिल्ह्यात ६० टक्के, रशियातील उरल पर्वतात बाझनोव्हा क्षेत्रात १५ टक्के आणि उरलेले क्रिसोटाइल द. आफ्रिका व इतर देशांत मिळते. भारतात तमिळनाडूमधील कडप्पा जिल्ह्यातील पुलिवेंडलालगतच्या सर्पेंटाइन खडकांत चांगले क्रिसोटाइल बरेच आढळते.

क्रिसोटाइल हा ॲस्बेस्टसाचा एक मुख्य प्रकार आहे. त्यातील तंतूच्या लवचिकतेवर त्याचे उपयोग अवलंबून असतात. अग्निरोधक, विद्युत् निरोधक व अम्लतारोधक म्हणून याचा धागा, कापड, कपडे, फेल्ट, पत्रे, नळ, कौले इ. रूपांत उपयोग होतो. अँटिगोराइटाचा पारभासी तेलकट हिरवा प्रकार रत्नाप्रमाणे वापरतात. त्याला प्रेशस वा नोबल सर्पेंटाइन म्हणतात. याचा बोवेनाइट हा प्रकार जेड ( हरितमणी ) रत्नाप्रमाणे दिसतो व तो शोभिवंत कामांसाठी वापरतात. सर्पेंटाइनाच्या संग-ए-यंश्म या प्रकाराला पंजाबात जेड म्हणतात.

मुख्यत: सर्पेंटाइन खनिजाच्या बनलेल्या रूपांतरित खडकालाही सर्पेंटाइन म्हणतात. पेरिडोटाइट, पायरोक्सिनाइट व क्वचित अँफिबोलाइट, हॉर्नब्लेंड सुभाजा या खडकांतील ऑलिव्हीन, पायरोक्सीन व हॉर्नब्लेंड या खनिजांपासून सर्पेंटाइन बनते व त्याचाच हा खडक बनलेला असतो. या सर्पेंटाइन खडकाच्या ओबडधोबड व भिंगाकार राशी आढळतात. याचा स्पर्श मऊ, रंग हिरवा ते जवळजवळ काळसर हिरवा असतो. यातील कॅल्साइट किंवा डोलोमाइटाच्या शाखांसारख्या शिरांमुळे याच्यावर ठिपके दिसतात व क्वचित रंग पांढरा होतो. यातील संगजिरे, मॅग्नेसाइट, आयर्न ऑक्साइड इत्यादींच्या शिरांमुळे याला पिवळा वा तपकिरी रंग येतो. सर्पेंटाइन खडकाला चांगले पॉलिश होऊ शकते व पॉलिश केल्यावर तो संगमरवरासारखा दिसतो. यामुळे तो शोभिवंत वस्तू ( पुतळे, फुलपात्रे इ.) व सजावटीसाठी वापरतात. मात्र हा खडक मऊ असल्याने टिकाऊ नसतो. म्हणून बांधकामात हा मुख्यत: अंतर्गत सजावटीसाठी वापरतात. सामान्यपणे पांढऱ्या संगमरवराबरोबर याचा वापर केला जातो, तेव्हा त्याला व्हर्ड अँटिक किंवा सर्पेंटाइन संगमरवर म्हणतात.

सर्पेंटाइनाच्या संपुंजित प्रकारावर सापाच्या कातडीवरील खुणांसारखे चट्टेपट्टे आढळत असल्याने सापासाठी असलेल्या लॅटिन शब्दावरून सर्पेंटाइन हे नाव पडले आहे.

पहा : ॲस्बेस्टस.

ठाकूर, अ. ना.