ग्रीनोकाइट : खनिज. स्फटिक षट्‌कोणी लहान व क्वचित आढळतात. बहुधा चूर्णरूप लेपाच्या रूपात आढळते. कठिनता ३–३·५. वि. गु. ४·९. रंग पिवळा किंवा नारिंगी ते विटकरी. रा. सं. CdS. सामान्यतः जस्ताच्या खनिजांबरोबर आढळते. विशेषतः स्फॅलेराइट या खनिजावरील लेपात व अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अल्प असणाऱ्या) लाव्ह्यातील पोकळ्यांत आढळते. याची संरचना त्याच्याबरोबर आढळणाऱ्या वुर्टझाइट नावाच्या खनिजासारखी असते व दोन्ही खनिजांचे पूर्ण घन विद्रावण (घन स्वरूपातील पदार्थांची एका प्रकारच्या अणू, आयन किंवा रेणूच्या जागी त्याच आकार आणि आकारमानाचा परंतु रासायनिक दृष्ट्या वेगळा अणू, आयन वा रेणू येणे) होते. हे ऑस्ट्रिया, झेकोस्लोव्हाकिया इ. देशांत आढळते. जस्ताच्या जोडीनेच कॅडमियम धातू मिळविण्यासाठी हे वापरतात. १८१o साली याचा पहिला स्फटिक आढळला असला, तरी तो स्फॅलेराइटाचा वाटला होता. १८४o साली जेम्सन यांनी लॉर्ड ग्रिनक यांच्या बहुमानार्थ या खनिजाला ग्रीनोकाइट हे नाव दिले.

ठाकूर, अ. ना.