स्पितीतील शैलसमूह : स्पिती ही सतलज नदीची उपनदी असून ती पर्वतीय भागातून वायव्य-आग्नेय अशी वाहते. हा मध्य हिमालयातील पर्वतीय प्रदेश ईशान्य पंजाब व तिबेट यांतील सीमाप्रदेश आहे. स्पिती खोरे कांग्रा जिल्ह्याच्या ईशान्य पर्वतरांगांत येते. या भागात पुराजीव ( सु. ६० ते २७.५ कोटी वर्षांपूर्वीच्या ) व मध्यजीव ( सु. २३ ते १४ कोटी वर्षांपूर्वीच्या ) काळातील शैलसमूहांचा जवळजवळ संपूर्ण क्रम उघडा पडला आहे. म्हणजे यात कँब्रियन ते क्रिटेशसपर्यंतचे सर्व भूवैज्ञानिक संघ आलेले आहेत. या शैलसमूहांचा तपशीलवार अभ्यास १८३० पासून सी. एल्. ग्रीसबाक, एच्. एच्. हेडन, सी. डीनर, ए. फोनक्राफ्ट इ. अनेक भूवैज्ञानिकांनी केला. स्पितीचे खोरे वरील शैलसमूह व विपुल जीवाश्म ( शिलाभूत झालेले जीवावशेष ) यांमुळे भारतीय भूविज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अभिजात क्षेत्र बनले आहे. हे क्षेत्र म्हणजे विस्तृत संमुखनतियुक्त भूद्रोणी आहे. तिच्यात जुन्या हिमालयपूर्व टेथिस सागरातील स्तरयुक्त निक्षेप साचले आहेत. या सागराने एकेकाळी उत्तर हिमालय व तिबेट व्यापला होता. ही भूद्रोणी या सागराच्या एका प्राति-निधिक भागात तयार झाली. या भूद्रोणीचा अक्ष वायव्य-आग्नेय दिशेत म्हणजे हिमालयाच्या स्वरूपाशी सुसंगत आहे. सर्वांत नवे क्रिटेशस ( सु. १८.५ ते १४ कोटी वर्षांपूर्वीच्या ) काळातील शैलसमूह भूद्रोणीच्या मध्यभागी उघडे पडलेले आहेत. याच्यापेक्षा अधिकाधिक जुने खडक क्रमवार द्रोणीच्या बाजूंवर उघडे पडले आहेत. सर्वांत जुने कँब्रियन ( सु. ६० ते ५० कोटी वर्षांपूर्वीच्या ) काळातील शैलसमूह सर्वांत बाहेर म्हणजे पंजाबकडे उघडे पडलेले आहेत. नंतरच्या शैलसमूहांची नती ( कल ) मुख्य भागात उत्तरेकडे म्हणजे अंतर्गत भागाकडे आहे. या सर्व शैलसमूहांमध्ये जीवाश्म आढळतात. हे जीवाश्म म्हणजे या शैलसमूहांचे यूरोपातील शैल-समूहांशी अतिशय अचूक परस्परसंबंध प्रस्थापित करण्याची उत्तम साधने आहेत. या प्रदेशाचे पुराजीव भूविज्ञान विशद करण्याच्या दृष्टीने हेडन यांचे संशोधन कार्य अतिशय उपयुक्त ठरले आहे.

मध्य हिमालयाच्या या भागात अतिशय वलीभवन झालेले अभ्रकी सुभाजा, स्लेट व फायलाइट हे खडक असून त्यांना वैक्रिता संघ हे नाव ग्रीसबाक यांनी दिले. हे खडक पट्टिताश्मांवर वसलेले आहेत. मात्र या दोन्हींत स्पष्ट सीमारेषा आढळत नाही. वैक्रिता संघातील शैलसमूह तीव्र रूपांतरण व ग्रॅनिटीभवन झालेले हैमंता शैलसमूह आहेत.

कँब्रियन : ( सु. ६० ते ५० कोटी वर्षांपूर्वीचा काळ ). स्पितीमधील कँब्रियन कालीन शैलसमूह वैक्रिता संघावर वसलेले असून खुद्द कँब्रियन शैलसमूह आर्कीयन पट्टिताश्म म्हणून मानल्या गेलेल्या शैलसमूहाखाली येतात. संपूर्ण कँब्रियन संघातील तीव्र वलीभवन झालेल्या व विक्षुब्ध गाळाच्या थरांची येथील जाडी प्रचंड असून त्याचे पूर्व, मध्य व उत्तर कँब्रियन असे वर्गीकरण करतात. खूप प्रमाणात हिमाच्छादित शिखरां-वरून ग्रीसबाक यांनी या संघाला हैमंता हे नाव दिले आणि मुख्यत: शेल (  मृण्मय ) व क्वॉर्ट्झाइट (सिलिकामय) हे या संघातील मुख्य खडक आहेत. त्यांपैकी क्वॉर्ट्झाइट तळाशी असून त्यावर चमकदार, तांबडे व काळे स्लेट खडक आहेत. शेलमध्ये पुष्कळ हेमॅटाइट व क्वॉर्ट्झाइटांत कार्बनयुक्त द्रव्य बंदिस्त झालेले आहे. माथ्याशी डोलोमाइटाशी अंत:स्तरित झालेले सिलिकामय स्लेट व शेल खडक आहेत. हैमंता शैलसमूह मध्य हिमालय पर्वतरांगेच्या उत्तरेच्या उतारावर स्पिती व कुलू यांच्या दरम्यान आढळतात.

स्पिती कँब्रियन गटाचा वरचा सु. ३५० मी. जाड भाग जीवाश्मयुक्त आहे. त्यात या काळातील प्राण्यांचे विपुल जीवाश्म आढळतात. जीवाश्मां- मध्ये ट्रायलोबाइटांचे जीवाश्म मुख्य असून त्यांच्या ओलेनस, ॲग्नोस्टस, मायक्रोडिस्कस इ. प्रमुख जाती होत. शिवाय ब्रॅकिओपॉड, एकायनोडर्म आणि क्रिनॉइड व शंखधारी ( गॅस्ट्रोपॉड ) यांचेही थोडे जीवाश्म येथे आढळले आहेत. ट्रायलोबाइटांच्या जातींचा यूरोपमधील कँब्रियन जीव-जातींशी निकटचा आप्तभाव असल्याचे स्पष्टपणे दिसते. या थरांचा सर्वाधिक विकास झालेला भाग पाराहिओ या स्पितीच्या उपनदीच्या खोर्‍यात उघड्या पडलेल्या ठिकाणी असून या उत्तर हैमंता शैलसमूहांना पाराहिओ माला हे नाव आहे.

कँब्रियन शैलसमूहातील स्लेट खडकांमधील पिंडाश्मांंचे थर त्यांच्या उत्पत्तीमुळे भूविज्ञानाच्या दृष्टीने लक्षणीय आहेत. ते गाळाचे साधे दलिक पिंडाश्म नाहीत, तर ते स्वयंदलिक प्रकारे उत्पन्न झालेले आहेत. क्वॉर्ट्झा-इटाच्या शिरा चुरडल्या जाऊन म्हणजे त्यांचे दलन होऊन त्यांपासून कमी–जास्त प्रमाणात गोलसर वा मसुराच्या आकाराचे तुकडे बनले. नंतर हे तुकडे स्लेटपासून बनलेल्या सूक्ष्मकणी अभ्रकी आधारद्रव्यात विखुरले. कँब्रियनमधील खालचे दोन थर जीवाश्महीन असून त्यांचे वय कँब्रियनपूर्वचा वरचा भाग हे आहे.

ऑर्डोव्हिसियन व सिल्युरियन : [ ऑर्डोव्हिसियन ( सु. ४९ ते ४२ कोटी वर्षांपूर्वीचा काळ ) सिल्युरियन ( सु. ४२ ते ४० कोटी वर्षांपूर्वीचा काळ ) ]. सर्व स्पिती खोर्‍यात हैमंता संघाच्या ( काळे स्लेट व शेल ) खडकांवर तांबडे क्वॉर्ट्झाइट व उथळ पाण्यातील संकोण वालुकाश्म ( खरीचा दगड ) यांची जाड माला व तिच्या खाली क्वॉर्ट्झाइट आहेत. वरच्या बाजूस या मालेत चुनखडक व डोलोमाइट यांचे पट्ट असलेले शेल खडक आहेत. या शैलसमूहांची जाडी सु. ६०० मी. आहे. त्यांपैकी सर्वांत खालील ऑर्डोव्हिसियन भागात गुलाबी-तांबडे क्वॉर्ट्झाइट व खरीचा दगड आणि जीवाश्महीन भरड पिंडाश्म यांचा थर आहे. त्यावर शेल, सैल वालुकाश्म व क्वॉर्ट्झाइट असून त्यावरच्या गडद रंगी करड्या चुनखडकांत सिस्टिड, ब्रॅकिओपॉड व ट्रायलोबाइटांचे जीवाश्म आहेत. याच्या वरील बाजूस कठीण व करडा डोलोमाइटी चुनखडक येतो.

येथील सिल्युरियन शैलसमूहात ब्रॅकिओपॉड, प्रवाळ व शंखधारी प्राण्यांचे जीवाश्म असलेले शेली चुनखडक, त्यांच्यावर प्रवाळयुक्त चुनखडक आणि सर्वांत वर करड्या रंगाचा सिलिकामय चुनखडक आहे. ब्रॅकिओपॉड, सिस्टिड, क्रिनॉइड, प्रवाळ, हायड्रोझोआ व ट्रायलोबाइट हे येथील महत्त्वाचे जीवाश्म आहेत. येथील जीवाश्मांचा इंग्लंडमधील व उत्तर यूरोपमधील जीवाश्मांशी आप्तभाव आहे.

डेव्होनियन : ( सु. ४० ते ३५ कोटी वर्षांपूर्वीचा काळ ). सिल्युरियन शैलसमूहांवर पांढर्‍या व कठीण क्वॉर्ट्झाइटाची सु. १५० मी. जाड माला आहे. तिच्यात जवळजवळ जीवाश्म आढळत नाहीत. तिचे वय काही भागात तरी डेव्होनियन आहे. काही भाग उत्तर सिल्युरियन असावा. ही माला प्रथम मुथ खिंडीत आढळते म्हणून हिला मुथ क्वॉर्ट्झाइट म्हणतात. सुरुवातीला मुथ क्वॉर्ट्झाइटावर चुनखडक, शेल व क्वॉर्ट्झाइट यांचा एक संघ येतो. त्याला कनावार संघ म्हणतात. त्यात लिपाक व पो माला येतात.

कार्‌बॉनिफेरस : ( सु. ३५ ते २७.५ कोटी वर्षांपूर्वीचा काळ ).

लिपाक माला : मुथ क्वॉर्ट्झाइटावर ६०० मी. पेक्षा अधिक जाडीची चुनखडक व क्वॉर्ट्झाइट यांची माला आहे. हा चुनखडक कठीण, गडद रंगाचा व कपच्या असलेला असून त्यात विपुल जीवाश्म आहेत. जीवाश्म-युक्त पट्ट आणि पांढरे व करडे जीवाश्महीन क्वॉर्ट्झाइट यांचे एकाआड एक थर आहेत. स्पितीतील पूर्वेच्या लिपाक नदीखोर्‍यातील याच्या नमुनेदार उघड्या क्षेत्रावरून या मालेला नाव दिले आहे. ब्रॅकिओपॉड ( प्रॉडक्टस, स्पिरीफर ), ट्रायलोबाइट ( फिलिप्सिया ), सेफॅलोपॉड, शंखधारी ( कोनुलॅरिया ), कवचधारी (क्रस्टेशिया), माशांचे दात वगैरे पूर्व कार्बॉनिफेरस काळातील नमुनेदार जीवाश्म या मालेत आढळतात. शिवाय ट्रायलोबाइट, शिंपाधारी व टेरोपॉडही आढळतात.

पोमाला : गडद रंगी शेल व क्वॉर्ट्झाइट यांची ही माला लिपाक मालेवर वसलेली आहे. बदल न झालेल्या शेल खडकांत नेचे व संबंधित वनस्पतींच्या पानांचे ठसे ( पूर्व व मध्य कार्बॉनिफेरस कालीन ) आढळ-तात. या मालेचा वरचा भाग शेल व क्वॉर्ट्झाइटांचा असून त्यात फेनेस्टेला शेल ( उत्तर कार्बॉनिफेरस ), प्रॉडक्टस, स्पिरीफर, रेटिक्युलॅरिआ, नॉटिलस, पॉलिझोआ व ब्रॅकिओपॉड हे जीवाश्म आढळतात. त्यांवरून या मालेचे वय मध्य कार्बॉनिफेरस येते.


उत्तर कार्बॉनिफेरस विसंगती : उत्तर कार्बॉनिफेरस पिंडाश्म खूप नंतरच्या शैलसमूहांवर विसंगतपणे पसरलेला आढळतो. म्हणजे हैमंता, सिल्युरियन ( मुथ क्वॉर्ट्झाइट ) व मधले सर्व टप्पे येथे आढळत नाहीत. उत्तर कार्बॉनिफेरस व पर्मियन संघातील हा पिंडाश्म भारतीय भूविज्ञाना-तील सर्वांत मोठा गणना वा निर्दिष्ट तळ म्हणजे विसंगती आहे. सर्व भारतात जेथे पर्मियन शैलसमूह आढळतो तेथे ही विसंगती आढळते. मात्र स्पितीत ती आढळत नाही, कारण हे क्षेत्र भारतीय खंडातील भूकवचाच्या फेरजुळणीत अक्षुब्ध राहिले. त्यामुळे येथे अखंड अवसान होऊन विसंगतीची दर्शविणारी फट भरली गेली. या विसंगतीच्या आधारे सर टी. एच्. हॉलंड यांनी भारतीय भूविज्ञानातील आर्य व द्रविड महाकल्प वेगळे केले आहेत. द्रविड महाकल्पाच्या आधीच्या शैलसमूहांना पुराण महाकल्प म्हणतात.

स्पितीमधील समग्र पुराजीव शैलसमूहांचे क्रम पुढीलप्रमाणे दाखविता येतील : पुराण महाकल्पातील वैक्रिता माला ( सर्वांत खाली सुभाजा व फायलाइट ) तिच्यावर द्रविड महाकल्पातील अनुक्रमे कँब्रियन ( हैमंता, स्लेट व क्वॉर्ट्झाइट, डोलोमाइटासह ), सिल्युरियन व ऑर्डो-व्हिसियन ( क्वॉर्ट्झाइट, शेल, प्रवाळयुक्त चुनखडक इ. ), डेव्होनियन (  मुथ क्वॉर्ट्झाइट व चुनखडक ), पूर्वकार्बॉनिफेरस लिपाक माला ( शेल, चुनखडक, स्पिरीफर इ.), मध्य कार्बॉनिफेरस पो माला ( फेनेस्टेला शेल, क्वॉर्ट्झाइट, वनस्पती जीवाश्म ) याच्या वरच्या बाजूस छोटी विसंगती असून तिच्यावर आर्य महाकल्पातील उत्तर कार्बॉनिफेरस ( बेसमेंट — खालचा — पिंडाश्म ) आणि त्यावर पर्मियन काळातील शैलसमूह येतात.

पर्मियन : (२७.५ ते २३ कोटी वर्षांपूर्वीचा काळ ). उत्तर कार्- बॉनिफेरस कालीन पो मालेच्या फेनेस्टेला शेलवर छोटी पिंडाश्मयुक्त विसंगती असून तिच्यावर स्पितीतील पर्मियन कालीन कुलिंग संघ येतो. त्यात सर्वांत खाली पिंडाश्म, संकोण वालुकाश्म व क्वॉर्ट्झाइट येतात. त्याच्या वरील बाजूस प्रॉडक्टस व स्पिरीफर जीवाश्म असलेले कॅल्शियमी ( चूर्णीय ) वालुकाश्म येतात. वरच्या प्रॉडक्टस शेल विभागात उदी वा काळे कार्बनयुक्त व सिलिकामय शेल येतात. त्यांत ब्रॅकिओपॉड, सेफॅलोपॉड व सेफॅलोपॉडयुक्त संघिते येतात.

ट्रायासिक : (२३ ते १८.५ कोटी वर्षांपूर्वीचा काळ ). प्रॉडक्टस शेलवर पूर्व ट्रायासिक कालीन ऑटोसेरॉस क्षेत्र विभाग येतो. स्पितीमध्ये पूर्व ट्रायस सु. १० मी., मध्य ट्रायस सु. ३० मी. व उत्तर ट्रायस सु. ९०० मी. जाड आहे. पैकी किओटो चुनखडक हा चुनखडक व डोलोमाइट असलेला विस्तृत शैलसमूह असून लिलांग येथे उघडा पडला आहे. त्यात सेरॅटाइटासारखे जीवाश्म आहेत. स्पितीमधील झांस्कर पर्वतरांगेतील चुन-खडक व डोलोमाइट यांचीही प्रचंड जाड माला ती साचत असताना समुद्राच्या स्वच्छ पाण्याची खोली स्थिर होती, असे सूचित करते. याच्या सर्वांत वरच्या थरात विपुल जीवाश्म आहेत ( बेलेम्नाइट व शिंपाधारी  ). याचा अधिक मोठा मधला भाग जीवाश्महीन असून तळाच्या भागात जीवाश्म आढळतात ( मेगॅलोडॉन, डायसेरोकार्डियम, स्पिरिगेरा, लायमा, ॲमोनाइट व शिंपाधारी  ).

स्पितीमध्ये ट्रायासिक काळातील शैलसमूह पूर्व ट्रायस, मध्य ट्रायस आणि उत्तर ट्रायस असे विभागलेले आहेत. पूर्व ट्रायसमध्ये सेफॅलोपोडा वर्गातील ऑटोसेराय-ऑफिसेरास, मिकोसेरास व हेडेन स्ट्रोएमिया–फ्लेमिंगाइटे असे तीन जीवाश्म विभाग असून ते चुनखडक व शेल अशा खडकांमध्ये सापडतात. मध्य ट्रायसमध्ये मुशेलकाल्क व लॅडिनिक अशा पायर्‍या येतात. या दोन्हीही जीवाश्मधारक आहेत. यांपैकी लॅडिनिक पायरीमध्ये डाओनेला शेल व डाओनेला चुनखडक हे खडक प्रकार येतात. उत्तर ट्रायसमध्ये कार्निक व नॉरिक या दोन पायर्‍या येतात. कार्निक पायरीमध्ये होलोबिया चुनखडक, ग्रे शेल आणि ट्रोपाइट थर, तर नॉरिक पायरीमध्ये जुवेव्हाइट थर, प्रवाळयुक्त चुनखडक, मोनोटिस शेल, क्वॉर्ट्झाइट माला आणि सर्वांत वर मेगॅलोडॉन किंवा किओटो (क्योटो ) चुनखडक असे सर्व जीवाश्मधारक खडक येतात.

जुरासिक : (१८.५ ते १४ कोटी वर्षांपूर्वीचा काळ ). किओटो चुन-खडकांवर छोटी विसंगती असून तिच्यावर सुल्काकुटस थर येतात. ते काळे लोहमय अंदुकाश्म असून त्यांवरील विसंगतीवर सेफॅलोपॉड, शिंपाधारी इ. जीवाश्मयुक्त स्पिती शेल आहेत. क्रिटेशसनंतरचा स्पिती शेल हा वैशिष्ट्यपूर्ण जुरासिक शैलसमूह आहे. यात ढलप्यांसारख्या संरचनेचे काजळीसारखे काळे १०० ते २५० मी. जाडीचे अभ्रकी शेल आहेत. यात अनेक कॅल्शियमी संघिते असून पुष्कळ संघितांमध्ये चांगली टिकून राहिलेली गॅमोनाइट कवचे किंवा इतर जीवाश्म केंद्रक म्हणून असतात. शाळीग्राम हे याचे उदाहरण आहे. याचे चांगले दलन व संपीडन झाले आहे. हे उत्तर जुरासिक शेल हिमालयाच्या भूविज्ञानातील मोलाची स्तरवैज्ञानिक संदर्भपातळी आहे. या जीवाश्मसंपन्न संदर्भपातळीची जगातील जुरासिक भूवैज्ञानिक अध्ययनासाठी मोठी मदत झाली आहे. ॲमोनाइट, सेफॅलोपॉड, बेलेम्नाइट, शिंपाधारी ( लीमा, पेक्टेन व ऑस्ट्रिआ ) यांमुळे सर्वांत वरचे ( अलीकडील ) जुरासिक वय सूचित होते. स्पिती शेल वरील क्रिटेशस मालेत सुसंगतपणे विलीन झाले आहेत.

क्रिटेशस : (१४ ते ६.५ कोटी वर्षांपूर्वीचा काळ ). यात गिउमल वालुकाश्म, चिक्कीम माला व फ्लिश हे शैलसमूह येतात.

गिउमल वालुकाश्म : स्पिती शेलवर पिवळसर व उदी सिलिकामय वालुकाश्म, स्लेट व क्वॉर्ट्झाइट आढळतात. त्यांना गिउमल वालुकाश्म म्हणतात. याची स्पिती क्षेत्रातील जाडी सु. ९० मी. आहे. यात खोल पाण्यातील प्राण्यांचे जीवाश्म नाहीत. मात्र शिंपाधारी (कार्डियम, ऑस्ट्रिआ व पेक्टेन ), ॲमोनाइट व सेफॅलोपॉड यांचे जीवाश्म आढळतात.

चिक्कीम माला : हा गिउमल वालुकाश्मावरील सु. ७५ मी. जाडीचा करडा व पांढरा थर आणि त्यावर करडा हिरवट ५० ते ६० मी. जाड शेल यांचा थर आहे. चुनखडक शेल खाली असून फक्त चुनखडकांत जीवाश्म आढळतात. चिक्कीम टेकडीवरून याला नाव दिले आहे. शिंपा-धारी ( बेलेम्नाइट व हिप्युराइट ) व फोरॅमिनीफेरा हे जीवाश्म चुन-खडकांत आढळतात.

फ्लिश : चिक्कीम खडकांवर ही अधिक नवी क्रिटेशस खडकांची माला आहे. तिच्यात खूप जाड व जीवाश्महीन वालुकाश्म आणि वालुकामय शेल आहेत. म्हणून या काळात हिमालय वर येण्यास सुरुवात झाली किंवा किंवा अशी सुरुवात लवकरच सुरू होणार होती. परिणामी टेथिस सागर मागे सरकत जात संपुष्टात आला. हिच्यात जीवाश्म आढळले नाहीत.

ठाकूर, अ. ना.