ॲनॉर्थोक्लेज : फेल्सपारांच्या गटातील त्रिनताक्ष खनिज. [→ फेल्सपार गट]. याच्या (010) व (001) या पाटनपृष्ठांतील [→ पाटन] कोन जवळजवळ ९०° असतो. यमलन (स्फटिकांचा जुळेपणा) ऑर्थोक्लेजासारखे. शिवाय अल्बाइट व पेरिक्लीन नियमांनुसार बहुसंश्लेषी यमलनही आढळते. यमलनपटले अगदी पातळ असल्यामुळे पुष्कळदा यमलन दिसत नाही. ॲनॉर्थोक्लेजाचे वैशिष्ट्य म्हणजे अनुप्रस्थ (आडवा) छेद समचतुष्फलकाकार (शंकरपाळ्यासारखे) दिसतील असे त्याचे स्फटिक असतात [→ स्फटिकविज्ञान]. वि. गु. २.५७-२.६०. रा. सं. (KAlSi3O8)4 (NaAlSi3O8)6 ते (KAlSi3O8)1(NaAlSi3O8)9 शिवाय अल्पसे CaAl2Si2O8. काही क्षारीय ज्वालामुखी व उच्च तापमानात तयार झालेल्या अंतर्वेशी (घुसलेल्या) खडकांत आढळते.

ठाकूर, अ. ना.