कृष्णाभ्रक: (बायोटाइट). खनिज. स्फटिक एकनताक्ष वडीसारखे किंवा आखूड प्रचिनासारखे. स्फटिक सामान्यतः छद्मसमांतर षट्फलकीय असून ते बहुदा विखुरलेल्या पापुद्र्यांच्या व पाटनक्षम पुंजक्याच्या रूपात आढळतात[→स्फटिकविज्ञान]. पाटन : (001) उत्कृष्ट[→ पाटन]. याचे पत्रे नम्य, प्रत्यास्थ (लवचिक) व धुरकट असतात. कठिनता २·५-३ आणि वि. गु. २·८–३·२. पारदर्शक. चमक तेजस्वी, कधीकधी धातूसारखी किंवा काचेसारखी पाटनपृष्ठाची मोत्यासारखी. रंग गडद हिरवा, काळा ते उदी. कस रंगहीन. रा. सं.

K(Mg, Fe)3 (AlSi3O10) (OH)2.  सौम्य हायड्रोक्लोरिक अम्लाचा यावर परिणाम होत नाही, परंतु उकळत्या संहत (जास्त प्रमाण असलेल्या) सल्फ्यूरिक अम्लाने याचे अपघटन होऊन (रासायनिक दृष्ट्या तुकडे होऊन) दुधी विद्राव मिळतो. हे बंद नळीत तापविल्यास पाणी बाहेर पडते. हे सर्वत्र आढळणारे महत्त्वाचे शैलकर (खडक बनविणारे) खनिज असून ग्रॅनाइट, ग्रॅनोडायोराइट, सायेनाइट यांसारख्या अग्निज खडकांत आणि पेग्मटाइटांच्या भित्तींमध्ये आढळते. कधीकधी सुभाजा (सहज भंग पावणारे खडक) व पट्टिताश्म या रूपांतरित खडकांमध्ये बहुधा शुभ्र अभ्रकाच्या जोडीने आढळते. शुभ्र अभ्रकाच्या मानाने याचे अपघटन जलद होते. ते कृत्रिम रीतीनेही बनवितात. लोह नसलेले नैसर्गिक किंवा कृत्रिम कृष्णाभ्रक विद्युतीय व इलेक्ट्रॉनीय उद्योगधंद्यांमध्ये वापरतात. बायो या फ्रेंच खनिज वैज्ञानिकांच्या नावावरून बायोटाइट हे इंग्रजी नाव पडले आहे.

पहा : अभ्रक-गट.

ठाकूर, अ. ना.