मॅग्नेटाइटाचे स्फटिक मॅग्नेटाइट : (मॅग्नेटिक आयर्न ओअर). खनिज. स्फटिक घनीय. याचे स्फटिक बहुधा अष्टफलकाकार, कधीकधी जुळे व क्वचित द्वादशफलकाकार असून काहींत अष्टफलकीय विभाजनतले असतात [→ स्पटिकविज्ञान]. हे बहुधा कणमय व संपुंजित रूपांत आणि क्वचित पत्रित रूपात आढळते. भंजन उपशंखाभ [→ खनिजविज्ञान]. कठिनता ५·५.–६·५. वि. गु. ५·१८. चमक धातूसारखी ते मंद. रंग व कस लोखंडाप्रमाणे काळा. हे चुंबकाकडे आकर्षित होते. कधी-कधी निसर्गतः यात चुंबकीय गुणधर्म (ध्रुवणता) आलेला असतो व अशा प्रकाराला अयस्कांत (लोडस्टोन) म्हणतात [→ चुंबकत्व]. अपारदर्शक. हे विजेचे चांगले संवाहक आहे. रा. सं. Fe3O4 (शुद्ध खनिजात ७२·४ टक्के लोह असते). कधीकधी लोहाच्या जागी थोडे मॅग्नेशियम व टिटॅनियम आणि क्वचित मॅगॅनीज, कॅल्शियम, ॲल्युमिनीयम, व्हॅनॅडियम, क्रोमियम किंवा निकेल आलेले असते. हे वितळण्यास कठीण असून १,५३८° से.ला याचे विघटन (लहान रेणूत तुकडे) होते. याचे चूर्ण हायड्रोक्लोरिक अम्लात सावकाश विरघळते.

मॅग्नेटाइट लोखंडाचे एक सर्वांत सामान्य खनिज असून बहुतेक अग्निज खडकांत हे गौण खनिज म्हणून आढळते. रूपांतरित खडकांतही हे बऱ्याचदा आढळते. स्फटिकी चुनखडक, लेप्टाइट इ. रूपांतरित खडकांबरोबर आणि लोह-मॅग्नेशियमी खनिजे विपुल असणाऱ्या. डायोराइट, गॅब्रो, पेरिडोटाइट, नोराइट, ॲनार्थोसाइट यांसारख्या खडकांमध्ये याच्या राशी आढळतात. तसेच जुन्या रूपांतरित खडकांत (उदा., आर्कीयन) याचे थर वा भिंगाकार राशी आढळतात. शिवाय उच्च तपमानात तयार झालेल्या सल्फाइडी शिरांत, डबरी वाळूत तसेच ‘ब्लॅवक सँड’ सारख्या फ्लेसर निक्षेपांत व दगडी अशनींतही हे आढळते. मॅग्नेटाइट व कुरुविंद यांचे मिश्रणही आढळते व त्याला ⇨ एमरी म्हणतात. कीरूनामध्ये (स्वीडन) मॅग्नेटाइटाचे जगातील सर्वांत मोठे साठे असून त्याशिवाय नॉर्वे, रूमानिया, उरल पर्वत, भारत, मेक्सिको, अमेरिका, क्यूबा, जर्मनी, इटली, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हंगेरी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, जपान इ. भागांत हे आढळते. भारतामध्ये हे आंध्र प्रदेश, हरयाणा, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, बिहार, ओरिसा, पंजाब, राजस्थान व प. बंगाल या राज्यांत आढळते. महाराष्ट्रात ते चंद्रपूर, गडचिरोली व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आढळते. दक्षिण ट्रॅप खडकांपासून बनलेल्या कोकणच्या किनाऱ्यावरील वाळूतही मॅग्नेटाइट आढळते. भारतामध्ये मॅग्नेटाइटाचे एकूण साठे २०·२५४४ कोटी टन (१९६९) आहेत. याचा अयस्कांत हा प्रकार सायबीरिया, हार्ट्झ पर्वत, आल्बा बेट व ट्रान्सव्हाल येथे आढळतो.

मॅग्नेटाइट हे लोखंडाचे हेमॅटाइटानंतरचे दोन क्रमांकाचे महत्त्वाचे धातुक (कच्ची धातू) आहे. मॅग्नेटाइट मानवाला इ. स. पू. ५०० वर्षांपासून माहीत असून मध्ययुगीन काळात साधी चुंबकसूची म्हणून अयस्कांत वापरीत असत.

मॅसिडोनियाच्या सीमेवरील मॅग्नेशिया या प्रदेशाच्या नावावरून तर काहींच्या मते चुंबकीय अर्थाच्या जर्मन शब्दावरून मॅग्नेटाइट हे नाव पडले असावे. प्लिनी यांच्या एका बोधकथेनुसार मॅग्नेस नावाच्या धनगरावरून मॅग्नेटाइट हे नाव पडले आहे. हा धनगर ‘आयडा’ पर्वतावर गेला असता त्याच्या पायताणाचे खिळे व काठीची वसवी (लोखंडी कडे) तेथील जमिनीला चिकटत असल्याचे त्याच्या लक्षात आले व अशा प्रकारे त्याला या खनिजाचा प्रथम शोध लागला.

पहा : लोखंड हेमॅटाइट.

ठाकूर, अ. ना.