पॅलिओसीन : भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. काळाच्या विभागाला पॅलिओसीन युग व त्या युगात तयार झालेल्या खडकांच्या गटाला पॅलिओसीन माला म्हणतात. हे युग म्हणजे सु. ६·५ ते ५·५ कोटी वर्षांपूर्वीचा काळ होय. चार्ल्स लायल (१७९७–१८७५) यांनी तृतीय कल्पाचे (सु. ६·५ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळाचे) चार विभाग केले. त्यांपैकी इओसीन या विभागातील तळाच्या खडकांचा डब्ल्यू. पी. शिंपर (१८०८–८०) यांनी १८७४ साली स्वतंत्र विभाग केला आणि त्याला ‘पुरानूतन’ अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून पॅलिओसीन हे नाव दिले. या मालेतील खडक जगभर विखुरलेले आढळतात. मात्र सागरी निक्षेप (खडकांच्या राशी) थोडेच असल्याने पॅलिओसीनसंबंधीची बहुतेक माहिती जमिनीवरील निक्षेपांद्वारे मिळाली आहे.

मार्ल, चुनखडक (मुख्यतः न्युम्युलिटिक), वालुकाश्म, पंकाश्म व पिंडाश्म हे या मालेतील प्रमुख खडक असून त्यांचे थर क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील अशा खडकांच्या थरांसारखेच आहेत परंतु पॅलिओसीनमध्ये ⇨चॉक आढळत नाही.

पॅलिओसीन युगात खंडांची जवळजवळ आत्तासारखी मांडणी झालेली होती.या काळात जमिनीचे उत्थान (वर उचलले जाण्याची क्रिया ) आणि सागर मागे हटणे या गोष्टी घडल्या होत्या. या युगात गिरिजनन (पर्वत निर्माण होण्याची क्रिया) थोड्याच ठिकाणी परंतु तीव्रपणे झालेले आढळते उदा., लॅरमाइड गिरिजनन.  

पॅलिओसीन काळात आताच्या मानाने अधिक उत्तरेकडील भागापर्यंत उबदार हवामान होते. त्यामुळे तेथेही पाम व इतर उष्णताप्रिय वनस्पती होत्या. क्रिटेशसमधील काही झाडे व झुडपेही या युगात टिकून राहिली होती. क्रिटेशस कल्पातील प्रमुख प्राणी (बेलेग्नाइट, ॲमोनाइट, डायनोसॉर इ.) अचानक निर्वंश झाले होते मात्र स्किड, ऑक्टोपस, मौक्तिक नॉटिलस, कासवे, सरडे, साप, ॲलिगेटर, मगरी इ. प्राणी टिकून राहिले होते. स्तनी प्राण्यांचा उदय हे या युगाचे मुख्य वैशिष्ट्य असून अपरास्तनींचा(वार असलेल्या प्राण्यांचा) या काळात जलदपणे विकास झाला व त्यांची संख्या वाढून ते या काळातील जमिनीवरील सर्वांत महत्त्वाचे प्राणी झाले परंतु या काळातील स्तनी प्राणी आदिम (आद्य) प्रकारचे होते व त्यांचे दात, पाय व कवट्या हे अवयव सरीसृपांप्रमाणे (सरपटणाऱ्या प्राण्यांप्रमाणे) होते. क्रिटेशसमधील डायनोसॉरांची जागा पॅलिओसीनमध्ये कीटकभक्षी, मांसभक्षी, खुरी, क्रिओर्डोंट, तृणभक्षी, कृंतकांचे(कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांचे) व माकडांचे पूर्वज, नरवानर(प्रायमेट) गण इत्यादींमधील लहान, आदिम, अपरास्तनी प्राण्यांनी घेतली. याच काळात ऑस्ट्रेलियात आधीच्या काळातील शिशुधानी (पिलांच्या वाढीसाठी पोटावर पिशवी असणाऱ्या ) प्राण्यांचा स्वतंत्रपणे विकास झाला. आदिम व दात असणारे पक्षी निर्वंश होऊन आधुनिक पक्षी पॅलिओसीन काळातच अवतरले. तसेच फोरॅमिनीफेरा (न्युम्युलाइट व डिस्कोसायक्लीन) हे जीव याच काळात अवतरले व त्यांचा जलद विकास झाला. पॅलिओसीनमध्ये पेलिसिपॉड, गॅस्ट्रोपॉड व एकिनॉइड या प्राण्यांचा प्रसार झाला.  

भारतीय उपखंडातील राणीकोट माला पॅलिओसीन काळातील मानतात. काश्मीर व कच्छातील सब-न्युम्युलिटिक निक्षेप व आसामातील जैंतिया येथील काही निक्षेप पॅलिओसीन काळातील आहेत.  

पहा: तृतीय संघ नवजीव.  

ठाकूर, अ. ना.