वुलस्टनाइट : कॅल्शियमाचे खनिज. स्फटिक त्रिनताक्ष [→ स्फटिकविज्ञान ], वडीसारखे (म्हणून याला टॅब्युलरस्पार असेही म्हणतात). हे सामान्यपणे पाटनक्षम [→ पाटन ] ते तंतुमय व घट्ट संपुंजित रूपात आढळते. पाटन : (१००) व (००१) उत्कृष्ट. रंगहीन, पांढरे ते करडे. चमक काचेसारखी, पाटनपृष्ठाची मोत्यासारखी व तंतुमय प्रकाराची रेशमासारखी. कठिनता ५–५.५. वि. गु. २.८–२.९ दुधी काचेप्रमाणे पारभासी [→ खनिजविज्ञान]. रा. सं. CaSiO3. हायड्रोल्कोरिक अम्लाने याचे अपघटन (मोठ्या रेणूचे लहान रेणूंत तुकडे होण्याची क्रिया) होते. हे रूपांतरित सिलिकामय चुनखडकांमध्ये कॅल्साइट, डायोप्साइड, ग्रॉसुलराइट, लाइमगार्नेट, ट्रेमोलाइट, आयडोक्रेज, एपिडोट इ. खनिजांबरोबर आढळते. रूमानिया, जर्मनी, फ्रान्स, इटली, नॉर्वे, मेक्सिको, हंगेरी, फिनलंड, अमेरिका इ. देशांत हे आढळते. हे विद्युत्‌ निरोधक फरश्यांमध्ये, तसेच रंगलेपात भरणद्रव्य म्हणून व वितळजोडकामाच्या (वेल्डिंगच्या) गजांच्या लेपात वापरतात. विल्यम हाइड वुलस्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ या खनिजाला वुलस्टनाइट हे नाव दिले आहे.

ठाकूर, अ. ना.