ज्वालाकाच : (ऑब्सिडियन). ज्वालामुखी खडकाचा काचमय (अस्फटिकी) प्रकार. ही नैसर्गिक काच साध्या बाटलीच्या काचेप्रमाणे दिसते. या खडकाचे संघटन रायोलाइट वा ग्रॅनाइट खडकासारखे असते. त्यातील विपुल भ्रूण (प्राथमिक अवस्थेतील) स्फटिकांमुळे त्याचा रंग काळा होतो. कधीकधी तो उदसर, करडा, हिरवा, तांबडा (लोखंडाच्या ऑक्साइडामुळे) वा पट्टेदारही असतो. फुटलेल्या तुकड्यांच्या कडा तीक्ष्ण व पृष्ठे गोलसर असतात म्हणजे भंजन शंखाभ असते. याची पातळ चकती पारदर्शक असली, तरी विपुल भ्रूण स्फटिकांमुळे तो अपारदर्शक होतो. याची कठिनता जास्त (५·५) असली, तरी हा ठिसूळ असतो त्यामुळे तो खणून काढता येणे सोपे नसते. लाव्ह्यातून वायूंचे बुडबुडे निघून जाताना याच्या पृष्ठावर गोलसर खड्डे पडलेले असतात. याचे वयन (पोत) काचमय असते. काही नमुन्यांत फेल्स्पारांचे स्फटिक विखुरलेले आढळतात. यामध्ये पाण्याचे वजनी प्रमाण एक टक्क्याहून कमी असते. अतिसिकत (सिलिकेचे प्रमाण खूप असणारा) श्यान (दाट) लाव्हा जलद थंड झाल्याने हा खडक तयार होतो. हा रायोलाइटी लाव्ह्याबरोबर आढळतो.मात्रया काचेचे स्फटिकीभवन होत असल्याने फक्त अलीकडचे नमुनेच आढळतात. आइसलँड (हेल्का), इटली (लिपारी बेटे), अमेरिकेची संयुक्त संख्याने (यलोस्टोन नॅशनल पार्कमधील ऑब्सिडियन क्लिफ), मेक्सिको, हंगेरी, न्यूझीलंड, कॉकेशस इ. भागांत हा खडक आढळतो. पूर्वी बाणाची व भाल्याची टोके, दागिने, आरसे, सुऱ्या इत्यादींसाठी हा वापरीत. पैलू पाडून व झिलई देऊन त्याचा रत्न म्हणून आइसलँड अगेट नावाने उपयोग करतात. ऑब्सिडियस यांना इथिओपियात याच्यासारखा खडक प्रथम आढळल्यावरून ऑब्सिडियन नाव पडले, असे प्लिनी (इ. स. २३–७९) यांचे मत आहे.

ठाकूर, अ. ना.