डेना, जेम्स ड्वाइट : (१२ फेब्रुवारी १८१३–१४ एप्रिल १८९५). अमेरिकन भूवैज्ञानिक, खनिजवैज्ञानिक, प्राणिवैज्ञानिक व निसर्गवैज्ञानिक. त्यांनी खनिज विज्ञानाचा पाया घातला व या विषयातील अनेक प्रमाणभूत ग्रंथ लिहिले. त्यांचा जन्म यूटिक(अमेरिका) येथे झाला. ते १८३३ साली येल विद्यापीठातून पदवीधर झाले. १८३३ साली ते नाविकदलात गणिताचे शिक्षक झाले. १८३६ साली ते येल विद्यापीठात बी. सिलिमन (त्यांचे सासरे) यांचे साहाय्यक बनले. त्यांनी चार्ल्स विल्क्स यांच्या नेतृत्वाखाली पॅसिफिक महासागरातील समन्वेषक मोहिमेत भाग घेतला (१८३८–४२). ते येल विद्यापीठात सिलिमन प्राध्यापक (१८४९–६४) तसेच भूविज्ञानाचे आणि खनिजविज्ञानाचे प्राध्यापक (१८६४–९०) होते.
पोवळी व कवचधारी प्राणी (क्रस्टेशियन) यांचा त्यांनी अभ्यास व संग्रह केला. पॅसिफिक महासागराचे भूविज्ञान, हवाई बेटांवरील ज्वालामुखी व पोवळ्यांच्या शैलभित्ती यांचेही त्यांनी संशोधन केले. तसेच खंड, पर्वत आणि ज्वालामुखी यांच्या उत्पत्तीविषयीही त्यांनी सविस्तर अध्ययन केले. झूफाइट (१८४६), जिऑलॉजी (१८४९), क्रस्टेशिया (१८५२–५४) इ. त्यांचे अहवाल प्रसिद्ध असून त्यांनी २१४ संशोधनपर लेख व पुस्तके लिहिली आहेत. सिस्टिम्स ऑफ ए मिनरालॉजी (१८३७), मॅन्युअल ऑफ मिनरालॉजी (१८४८), मॅन्युअल ऑफ जिऑलॉजी (१८६२), टेक्स्टबुक ऑफ जिऑलॉजी (१८६४), कोरल्स ॲड कोरल आयलंड्स (१८७२), स्टोरी ऑफ द जिऑलॉजी ब्रिफली टोल्ड (१८७५), कॅरॅक्टरिस्टिक्स ऑफ व्होल्कॅनोज (१८९०) इ. त्यांची प्रमुख पुस्तके आहेत.
ते अमेरिकन जर्नल ऑफ सायन्सचे संपादक, अमेरिकन जिऑलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष, लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य आणि अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्ससचे सभासद होते. यांशिवाय अनेक परदेशी संस्थांनी त्यांचा गौरव केला होता. त्यांना लंडनच्या जिऑलॉजिकल सोसायटीचे वुलस्टन (१८७४) व रॉयल सोसायटीचे कॉप्ली (१८७७) या पदकांचा बहुमान मिळाला. ते न्यू हॅवन (अमेरिका) येथे मृत्यू पावले.
त्यांचे पुत्र एडवर्ड सॅलिस्बरी डेना (१६ नोव्हेंबर १८४९–१६ जून १९३५) हेही विख्यात खनिजवैज्ञानिक होते. त्यांनी आपल्या वडिलांचे सिस्टिम्स ऑफ मिनरालॉजी व मॅन्युअल ऑफ मिनरालॉजी हे ग्रंथ सुधारून संपादित केले, तसेच ए टेक्स्टबुक ऑफ मिनरालॉजी (१८७७) आणि मिनरल्स अँड हाऊ टू स्टडी देम (१८९५) हे ग्रंथही लिहिले.
ठाकूर, अ.ना.