लायेल, सर चार्ल्स : (१४ नोव्हेंबर १७९७ –२२ फेब्रुवारी १८७५). ब्रिटिश भूवैज्ञानिक. भूपृष्ठावरील विविध भूमिरूपे ही दीर्घकालीन भौतिक, रासायनिक व जैव प्रक्रियांद्वारे निर्माण झाली आहेत, ही मतप्रणाली मान्य होण्यास मुख्यत्वे यांचे प्रयत्न कारणीभूत झाले. यामुळे ‘वर्तमान ही भूतकाळाची गुरुकिल्ली आहे’ ही संकल्पना मान्यता पावली. म्हणजे आतापर्यंतच्या दीर्घ भूवैज्ञानिक काळातील प्रक्रिया आजच्या प्रमाणेच नियमितपणे वा पद्धतशीर रीतीने आणि आजच्या इतक्याच तीव्रतेने किंवा गतीने घडत आल्या असून आज घडत असणाऱ्या अशा आविष्कारांच्या (उदा., लाटा, वारा, पाऊस इत्यादींच्या क्रिया) मदतीने भूतकाळातील भूवैज्ञानिक घटनांचे स्पष्टीकरण देता येऊ शकते. या संकल्पनेला ‘एकसमानतावाद’ असे नाव असून तेव्हा रुढ असलेल्या विप्लववाद या संकल्पनेला विरोध करण्याच्या दृष्टीने एकसमानतावाद पुढे आला होता. पृथ्वीवरील बहुतेक भूमिरूपे ही अल्पकालीन व अचानकपणे घडलेल्या विश्वव्यापी आविष्कारांद्वारे निर्माण झाल्याचे विप्लववादात मानण्यात येई. विप्लववादाला विरोध करून लायेल यांनी एकसमानतावादाचा पाठपुरावा केल्यामुळे ⇨क्रमविकासात्मक (उत्क्रांतीविषयक) जीवविज्ञानाला पुष्टी मिळाली आणि आधुनिक भूविज्ञानाचा पाया घातला गेला, असे मानतात. यातून एक विज्ञान म्हणून भूविज्ञानाला मान्यता मिळाली. एवढेच नव्हे, तर एकोणिसाव्या शतकातील एकूण वैज्ञानिक विचारसरणीवरच लायेल यांच्या विचारांचा प्रभाव पडला.

लायेल यांचा जन्म किनॉर्डी (फॉर्‌फरशर, स्कॉटलंड) येथे झाला. त्यांचे वडील चार्ल्स लायेल (१७६७-१८४९) वनस्पतिवैज्ञानिक होते व त्यांच्या नावावरून लायेलिया हे वनस्पतिवैज्ञानिक नाव पडले आहे. सर लायेल यांचे शिक्षण रिंगवुड (हँपशर), सॉल्झबरी आणि मिड्‌हर्स्ट (ससेक्स) येथील शाळांत झाले. १८१६ साली ते शालांत परीक्षा उतीर्ण झाले. ऑक्सफर्ड विद्यापीठातील एक्झीटर महाविद्यालयातून त्यांनी १८१९ साली बी.ए. व १८२१ साली एम्.ए. या पदव्या संपादन केल्या. नंतर ते लंडन येथील लिकंन इनमध्ये दाखल झाले व १८२५ साली ते वकील झाले. या काळात विल्यम बकलँड यांच्या व्याख्यानांचा त्यांच्यावर प्रभाव पडल्याने ते भूविज्ञानाकडे वळले. दोन वर्षे वकिली केल्यावर त्यांनी तो व्यवसाय सोडून दिला व १८२७ सालापासून त्यांनी पूर्णतया भूविज्ञानविषयक अध्ययनाला वाहून घेतले. १८३२ साली त्यांचे लग्न मेरी एलिझाबेथ हॉर्नर यांच्याशी झाले व त्यांना त्यांच्या कार्यात पत्नीचे मोलाचे साहाय्य झाले.

लायेल किंग्ज महाविद्यालयात भूविज्ञानाचे प्राध्यापक होते (१८३१-३३). मात्र त्यांनी मुख्यत्वे निरनिराळ्या प्रदेशांच्या भूवैज्ञानिक मोहिमा करून व प्रत्यक्ष क्षेत्रात अध्ययन करून भूविज्ञानाविषयीचे विपुल लेखन केले. १८२४ साली त्यांनी स्कॉटलंडची अशी मोहीम पार पाडली होती. १८२५ साली ते फ्रान्सला गेले होते तेव्हा त्यांची झॉर्झ क्यूव्ह्ये यांच्याशी भेट झाली होती. १८३४ साली डेन्मार्क व स्वीडन, १८३७ साली नॉर्वे व डेन्मार्क, १८४१ साली अमेरिका, कॅनडा व नोव्हास्कोशा आणि १८४५ साली परत अमेरिका अशा मोहिमा त्यांनी पार पाडल्या होत्या. याशिवाय त्यांनी मादीरा व तेनेरीफ येथे जाऊनही भूवैज्ञानिक अध्ययन केले होते.

इटलीतील तृतीय कल्पातील (सु. ६.५ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकांच्या थरांमधील सागरी जीवांच्या अवशेषांचा त्यांनी अभ्यास केला. यावरून जीवंत असलेल्या व निर्वंश झालेल्या प्राणिजातींच्या कवचांचा एकमेकांशी असलेल्या गुणोत्तरांनुसार त्यांनी या कल्पाचे इओसीन (आदिनूतन), मायोसीन (मध्यनूतन), प्लायोसीन (अतिनूतन) व प्लाइस्टोसीन (प्रातिनूतन) असे विभाग पाडले. १८५८ साली ते परत सिसिलीला गेले होते. तेव्हा त्यांनी ज्वालामुखीविषयी अभ्यास केला. तेथील माउंट एटनाचे शिखर एकदम मोठे झाले नाही, तर छोट्या छोट्या उद्‌गिरणांद्वारे त्याची उंची वाढत गेली, असे त्यांनी दाखविले.

पृथ्वी सावकाशपणे एकसारखी थंड होत आहे हे लॉर्ड केल्व्हिन यांचे मत लायेल यांनी खोडून काढले. यासाठी त्यांनी सर्व भूवैज्ञानिक काळांमध्ये ज्वालामुखी क्रियेद्वारे उष्णता मिळत आलेली आहे, हे कारण दिले. याच्या आधारे केल्व्हिन यांनी काढलेले पृथ्वीचे वय चुकीचे असल्याचे लायेल यांनी दाखवून दिले. हिमकाल व क्रमविकास यांच्या विषयीचे आधुनिक सिद्धांत त्यांनी स्वीकारले होते. पॅलिआँटॉलॉजी (पुराजीवविज्ञान) ही संज्ञा त्यांनी प्रथम सुचविली होती. द प्रिन्सिपल्स ऑफ जिऑलॉजी (खंड ३ १८३०-३३) हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे पुस्तक असून त्यांच्या मृत्यूपर्यंत याच्या बारा सुधारित आवृत्त्या निघाल्या होत्या. मॅन्युअल ऑफ एलेमेंट्स ऑफ जिऑलाजी (१८३८) हे त्यांचे पुस्तक स्तरविज्ञान व पुराजीवविज्ञान यांवरचे प्रमाणभूत पुस्तक असून त्यांच्या हयातीत याच्या सहा आवृत्त्या निघाल्या होत्या. उत्तर अमेरिकेच्या मोहिमांतील अध्ययनांच्या आधारे त्यांनी ट्रॅव्हल्स इन नॉर्थ अमेरिका, वुइथ जिऑलॉजिकल ऑब्झर्व्हेशन्स (१८४५) व ए सेंकड व्हिजिट टू द युनायटेड स्टेटस् (१८४९) ही पुस्तके लिहिली. यामध्ये त्यांनी नायगारा धबधबा मागे हटण्याचा वेग, मिसिसिपी नदीच्या त्रिभूज प्रदेशातील गाळ साचण्याची त्वरा, व्हर्जिनियातील दलदलीतील साचणाऱ्या वनस्पती, नोव्हास्कोशातील दगडी कोळशाचे साठे वगैरेंविषयीची माहिती दिलेली आहे. द जिऑलॉजिकल एव्हिडन्स ऑफ द अँटिक्विटी ऑफ मॅन (१८८३) या पुस्तकात त्यांनी हिमकाळात साचलेल्या खडकांचे वर्णन दिले असून डार्विन यांच्या क्रमविकासाच्या सिद्धांताला पुष्टी दिली आहे. तसेच तेव्हा मानण्यात येत असलेल्या मानव जातीच्या पुरातनत्वाच्या काळापेक्षा मानव जाती पुष्कळच अधिक पुरातन असल्याचा दावा त्यांनी केला होता. यांशिवाय स्टुडंट्‌स एलेमेंट्‌स ऑफ जिऑलॉजी (१८७१) हे पुस्तक त्यांनी लिहिले असून क्वार्टर्ली रिव्ह्यू   आणि ट्रँझँक्शन्स ऑफ जिऑलॉजिकल सोसायटी  या नियतकालिकांतही त्यांनी बरेच लेखन केले होते.

लिनीअन व जिऑलॉजिकल सोसायट्यांचे फेलो (१८१९) आणि सचिव (१८२३-२६), रॉयल सोसायटीचे फेलो (१८२६), जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ लंडनचे अध्यक्ष (१८३५-३७ व १८४९-५१), नाईट (१८४८) व बॅरनेट (१८६४) हे किताब, कॉप्ली, रॉयल व वुलस्टन ही पदके बाथ येथील ब्रिटिश ॲसोसिएशनचे (१८६४) व ब्रिटिश ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स यांचे अध्यक्ष अमेरिकन फिलॉसॉफिक सोसायटी इन्स्टिट्यूट द फ्रान्स, रॉयल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस (बर्लिन) वगैरे संस्थांचे सदस्य ऑक्सफर्ड विद्यापीठाची डी. सी. एल्. पदवी, ऑर्डर ऑफ मेरीट (जर्मनी) वगैरे अनेक सन्मान लायेल यांना लाभले होते.

लायेल लंडन येथे मृत्यू पावले आणि राजघराण्यातील व्यक्तींसाठी असलेल्या वेस्ट मिन्स्टर ॲबे या दफनभूमीत त्यांचे दफन करण्यात आले. त्यांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावे एक निधी स्थापन करण्यात आला व १८७५ सालापासून त्यांच्या नावाने लायेल पदक देण्यात येऊ लागले.

संदर्भ: North, F. J. Sir Charles Lyell, London, 1965.

 ठाकूर, अ. ना.