लिमोनाइट : (ब्राउन हेमॅटाइट, ब्राउन आयर्न ओअर, ब्राउन आयर्न स्टोन क्ले). नैसर्गिक सजल लोह ऑक्साइडांचा गट. यात सामान्यतः गोएथाइट, हेमॅटाइट, मृत्तिका, वाळू, मँगॅनिजाची व लोहाची ऑक्साइडे यांचे कमीअधिक प्रमाणात मिश्रण झालेले असते व यात ⇨गोएथाइट सर्वाधिक प्रमाणात असते. याच्या सामान्यतः चूर्णरूप ते घट्ट राशी असून कधीकधी हे झुंबराकार, गुच्छकार, तंतुंमय अथवा संधितांच्या रूपातही आढळते. रंग तपकिरी किंवा पिवळसर तपकिरी, कधीकधी डांबराप्रमाणे चकचकीत काळा, कस पिवळसर तपकिरी. चमक मंद ते मातीसारखी. अपारदर्शक. रा.सं. Fe2O3.nH2O.याच्याशी तुल्य पण त्यात विविधता आढळते. शुद्ध लिमोनाइटाची कठिनता ५.५ व वि.गु. ३.६ ते ४ असते. बंद नळीत तापविल्यास पाणी बाहेर पडते. हे हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळते.

पायराइट, पायरोटाइट यांसारख्या लोहाच्या सल्फाइडी खनिजांनी व धातुकांनी (कच्च्या रूपातील धातूंनी) युक्त खडकांवर वातावरणक्रिया होऊन [विशेषतः ऑक्सिडीभवनाने ⟶ ऑक्सिडीभवन] भूपृष्ठालगत गॉसन नावाचा पट्टा तयार होतो. या पट्ट्यात लिमोनाइटाची तपकिरी पुटे निर्माण होतात. रुतणात किंवा दलदलीच्या उथळ भागात, सरोवरात किंवा समुद्रात सूक्ष्मजंतूद्वारे किंवा अवक्षेपणाने साचून (साका खाली बसून) निर्माण होते. वालुकाश्मात हे संयोजक (कण चिकटविणाऱ्या ) द्रव्याच्या रूपातही आढळते. हे लोहाच्या इतर धातुकांबरोबर जगात जवजवळ सर्वत्र आढळते. लोखंडाचे एक धातुक आणि पिवळे रंगद्रव्य म्हणून (उदा., रंगलेपात, शाईत) याचा उपयोग करतात. लॉरेन, लक्सेंबर्ग, बव्हेरिया व स्वीडन येथे याचा लोखंडाचे महत्त्वाचे धातुक म्हणून उपयोग होतो. यांशिवाय सॅक्सनी, नॉर्वे, ऑस्ट्रिया, नेदर्लंड्स, अमेरिका इ. प्रदेशांतही याचे साठे आढळतात परंतु तेथे याचा फायदेशीरपणे वापर करता येणे सध्या तरी शक्य नाही. भारतामधील लोखंडाच्या धातुकात मुख्यत्वे हेमॅटाइट, मॅग्नेटाइट व लिमोनाइट ही खनिजे असली, तरी  खाणकाम चालू असलेल्या अशा धातूकांत मुख्यतः हेमॅटाइट असते व लिमोनाइट गौण प्रमाणात आढळते. पूर्वी याला लिम्नाइट, हायपोझँथाइट किंवा झँथोसिडेराइट अशीही नावे होती. कुरणामध्ये वा दलदलीच्या भागात हे आढळत असल्याने किंवा यांच्या मूळ जर्मन नावाच्या आधारे कुरण या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याला हाउसमान यांनी १८१३ साली लिमोनाइट हे नाव दिले.

पहा : धातूक निक्षेप लोखंड

ठाकूर, अ. ना.