इओसीन:   भूवैज्ञानिक इतिहासातील एका विभागाचे नाव. कालाच्या विभागाला इओसीन युग व त्या युगात तयार झालेल्या खडकांच्या गटाला इओसीन माला म्हणतात. या युगाचा प्रारंभ सु. साडेपाच कोटी वर्षांपूर्वी होऊन ते सु. दोन कोटी वर्षे चालू राहिले. याच्या प्रारंभीचे सस्तन प्राणी लहान व आदिम होते. त्यांच्या पायाला पाच बोटे असत व त्यांचे मेंदू लहान असत. त्यांना बुटकी दंतशीर्षे (दातांचे माथे) असणारे चव्वेचाळीस दात असत. परंतु नंतरच्या कालात त्यांचा वेगाने विकास होऊन अधिक विशेषित व मोठ्या आकारमानाचे प्राणी अवतरले. सपुष्प वनस्पतींचा अतिशय उत्कर्ष झाला. सागरात फोरॅमिनीफेरांपैकी न्युम्युलाइट अतिशय विपुल व गॅस्ट्रोपोडा (शंखधारी)व बायव्हाल्व्हिया (शिंपाधारी) विपुल असत. भारतातील जम्मू, पंजाब, आसाम, राजस्थान, गुजरात, पाँडेचरी, राजमहेंद्री, सिमला टेकड्या इ. भागांत इओसीन कालातीत सागरी किंवा जमिनीवरील खडक आढळतात.

पहा : नवजीव तृतीय संघ.

 ठाकूर, अ. ना .