ऑलिव्हेनाइट : खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, प्रचिनाकार, पुष्कळदा सुईसारखे [→ स्फटिकविज्ञान ]. सुईसारख्या स्फटिकांचे पुंजके किंवा वृक्काकार (मूत्रपिंडाच्या आकाराचे), तंतुमय राशी आढळतात. भंजन शंखाभ ते खडबडीत. ठिसूळ. कठिनता ३. वि.गु. ४·१–४·४. दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक हिऱ्यासारखी ते काचेसारखी, तंतुमय प्रकाराची मोत्यासारखी. रंग पिवळसर हिरव्या रंगाच्या छटा, क्वचित पिवळा, उदी, करडा. कस हिरवट ते उदी. रा. सं. Cu2(OH)AsO4. तांब्याच्या धातुक निक्षेपात (कच्च्या धातुराशीत) विरळाच आढळणारे व द्वितीयक (नंतरच्या) प्रक्रियांनी तयार झालेले खनिज. कॉर्नवाल, डेव्हनशर, ओटाव्ही (नैर्ऋत्य आफ्रिका) व यूटातील (अमेरिकेची संयुक्त संस्थाने) खाणींत आढळते. ऑलिव्ह फळाच्या रंगासारखा रंग असल्यामुळे हे नाव दिले गेले.

ठाकूर, अ. ना.