अंदुकाश्म : काही चुनखडक बुंदीच्या कळ्यांसारख्या गोलसर व लहान कणांचे बनलेले असतात. ते पाण्यातील माशांच्या अंड्यांच्या पुंजक्यासारखे दिसत असल्यामुळे त्यांना ‘अंदुकाश्म’ किंवा ‘अंदुकी चुनखडक’ म्हणतात. त्यांच्या घटककणांना ‘अंदुके’ म्हणतात.  अंदुकाचा व्यास सुं ०·५ ते १·०० मिमी. इतका असतो. तो २ मिमी. पेक्षा अधिक असला म्हणजे त्या खडकाला ‘कलायाश्म’ (पिसोलाइट) असे नाव देतात. अंदुकांचा आकार सामान्यत: गोल व कधीकधी लंबगोल किंवा अनियमित गोलसर असतो. अंदुकांचा छेद घेऊन पाहिला तर  त्यांची संरचना सकेंद्री (कांद्याच्या पाकळ्यांसारखी) किंवा अरीय (चाकांच्या आऱ्यांसारखी) किंवा सकेंद्री व अरीय अशा दोन्ही प्रकारची असलेली आढळते.

अंदुकांची वाढ आतून बाहेर केंद्राभोवती पुटे साचून झाली असावी असे दिसते व कित्येकअंदकांच्या मध्याशी एखाद्या खनिजाचा किंवा प्राणिज कवचाच्या तुकड्याचा बारीकसा कण असलेला आढळतो. कित्येकांत तो नसतो किंवा असला तरी अंदुकाच्या मध्यातून छेद न गेल्यामुळे दिसत नाही.

कॅल्शियम कार्बोनेटाने तृप्त अशा नैसर्गिक पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेट निक्षेपित होऊन अंदुके तयार झालेली असतात. परंतु त्यांच्या संरचनेच्या उत्पत्तीविषयी मतभेद आहेत. रुक्ष प्रदेशातील सरोवरांचे किंवा इतर खारे पाणी लाटांमुळे सारखे हालत असले (उदा., उटातील (अमेरिका) मोठ्या खार्‍या सरोवरांच्या किनाऱ्या‍लगतचे पाणी) म्हणजे तळांशी घरंगळत सरकणाऱ्या‍ वाळूच्या किंवा कवचाच्या तुकड्याच्या कणांभोवती कॅल्शियम कार्बोनेटाचे पुटे साचत राहून अंदुके तयार होताना आजही दिसतात. बहुतेक अंदुकाश्म अशा रीतीने तयार झाले असावेत. काहींच्या मते अंदुके ही कॅल्शियम कार्बोनेटाचे ⇨कलिल स्वरूपात निक्षेपण होऊन तयार झाली असावीत. एखाद्या ⇨ पायसारख्या द्रव्याचे घनीभवन होताना ते शुद्ध असले तर अरीय संरचना व त्याच्याबरोबर इतर द्रव्ये असली तर सकेंद्रीय संरचना असलेली संघिते तयार होतात. अंदुके तशी संघिते आसावीत. कित्येक अंदुकांत सूक्ष्म तंतूंसारखे चूर्णमय शैवलांचे अवशेष आढळतात व शैवलांच्या क्रियेने ती अवक्षेपित झाली असावीत असे काहींनी सुचवलेले आहे.

अंदुकांचे कॅल्शियम कार्बोनेट प्रारंभी ॲरॅगोनाइट या खजिनाच्या स्वरुपात असते व आधुनिक अंदुके ॲरॅगोनाइटाची असलेली आढळतात. कालांतराने ऑरॅगोनाइटाचे स्थिर अशा कॅल्साइटामध्ये रूपांतर होते. पूर्वीच्या भूवैज्ञानिक कलातील अंदुके कॅल्साइटाची असलेली आढळतात.

झऱ्याच्या किंवा गुहांतील खळबळत असलेल्या पाण्यातील कॅल्शियम कार्बोनेटाचे अवक्षेपण होऊनही अंदुकाश्म तयार होतात. आधुनिक कालात तयार होत असलेले अंदुकाश्म, कॅल्शियम कार्बोनेटाचे, ऑरॅगोनाइटाचे, किंवा कॅल्साइटाचे असलेले आढळतात. परंतु पूर्वीच्या कालातील खडकांत सिलिका, डोलोमाइट, हेमॅटाइट, फॉस्फेट, पायराइट इत्यादींची अंदुके असलेले अंदुकाश्मही आढळतात. त्यांपैकी काही मूळच्या अंदुकाश्मातील कॅल्शियम कार्बोनेटाचे या पदार्थानी प्रतिष्ठापन होऊन तयार झालेले असतात. परंतु काही, विशेषत: फॉस्फेटी व लोही अंदुके, अवक्षेपणाने निर्माण झाली असण्याचा संभव आहे.

ठाकूर, अ.ना.