संक्रमण संघ : सर टी. एच्. हॉलंड यांच्या मते ⇨ आर्कीयन व ⇨ धारवाडी संघाच्या जटिल (गुंतागुंतीच्या) खडकांवर वसलेले भारताच्या द्वीपकल्पातील सर्व जीवाश्महीन (शिळारूप जीवावशेष नसणारे) शैलसमूह (खडकांचे गट) कँब्रियन-पूर्व म्हणजे सु.६० कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील आहेत. त्यांना हॉलंड यांनी पुराण गण व त्या कालखंडाला पुराण महाकल्प असे नाव दिले. त्या पुराण गणात रूपांतर न झालेले, मात्र काही प्रमाणात क्षुब्ध झालेले व घड्या पडलेले खडकांचे गट येतात. आर्कीयन आणि द्वीपकल्पातील अधिक नवीन जीवाश्मयुक्त खडक यांच्या दरम्यान पुराण गणाचे खडक येतात. अशा रीतीने आर्कीयन व धारवाडी संघातील स्फटिकी पट्टिताश्म व अतिशय रूपांतरण झालेले खडक आणि पुराजीव महाकल्पातील (सु. ६० ते २७.५ कोटी वर्षांपूर्वीच्या कालखंडातील) जीवाश्मयुक्त खडकांचे थर यांच्या दरम्यानचा पुराणगट ही संक्रमण अवस्था आहे. भारतीय भूवैज्ञानिक इतिहासातील या महत्त्वपूर्ण गणाच्या प्रमुख भागाला पूर्वी संक्रमण संघ म्हणत (संक्रमण संघ या संज्ञेव्दारे या खडकांच्या उत्पत्तीच्या तऱ्हेविषयीची उपपत्ती मांडण्याचा हेतू नव्हता, तर भूवैज्ञानिक इतिहासातील केवळ त्यांचे स्थान सूचित करण्यासाठीही संज्ञा वापरली होती). पूर्व व उत्तर विंध्य संघातील काही खडकांत नि:संशयपणे जैव अवशेष आढळले असून खडकांच्या काही गटांत जीवक्रिया घडल्याचे सूचित झाले आहे. यांवरून या खडकांचे वय कँब्रियन (सु. ६० ते ४९ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) इतके अलीकडचे आले आहे. पुराण गणाच्या खडकांची सर्वसाधारण जीवाश्महीनता ही अपघाती परिस्थितीमुळे उद्‌भवली असण्याची शक्यता आहे. कडप्पाद्रोणी (आंध्ररप्रदेश), छत्तीसगढ प्रदेश, विंध्यमहाद्रोणी (बिहारमधील ससराम ते उत्तर प्रदेशात आग्रा व राजस्थानातील चितोडपर्यंतचा प्रदेश) या प्रमुख क्षेत्रांत संक्रमण संघाचे खडक उघडे पडले आहेत. शिवाय आंध्रप्रदेश व उत्तर कर्नाटक येथे गोदावरी, कृष्णा व भीमा नदयांच्या खोऱ्यांना लागून यांचे सुटे प्रदेश आढळले आहेत. ⇨बुंदेलखंडी पट्टिताश्मांवर संक्रमण संघाचे खडक आढळले आहेत. महाराष्ट्रात चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा व रत्नागिरी जिल्ह्यांत हे खडक आहेत.

पहा : पुराण महाकल्प व गण.

ठाकूर, अ. ना.