स्तरवैज्ञानिक वर्गीकरण : खडकांच्या थरांची एकावर एक झालेली मांडणी म्हणजे अध्यारोपण आणि त्यांच्यामधील जीवाश्मांची ( शिळाभूत जीवावशेषांची ) स्वरूपे पाहून थरांच्या निर्मितीचा अनुक्रम निश्चित करतात. सर्वांत जुना थर तळाशी ठेवून इतर त्याच्यावर अनुक्रमाने रचल्याची कल्पना केल्यास थरांच्या होणार्‍या राशीच्या माथ्याशी सर्वांत नवीन थर आणि जसजसे खाली जावे तसतसे अधिकाधिक जुने थर असतील, अशा राशीला भूवैज्ञानिक अभिलेखमाला किंवा भूविज्ञान स्तंभ म्हणतात. भूवैज्ञानिक अभिलेखमालेला पृथ्वीच्या इतिहासातील घटनांचे पंचांग म्हणता येईल. म्हणजे तिच्यावरून पृथ्वीचा भूवैज्ञानिक इतिहास मिळविला जातो. थरांच्या रूपातील भूवैज्ञानिक अभिलेखमालेचे व्यवस्थित विभाग करण्याचे काम म्हणजे स्तरवैज्ञानिक वर्गीकरण होय.

पृथ्वीचा इतिहास अखंड आहे. तथापि, त्याच्या अध्ययनाच्या सोयीसाठी त्याचे विभाग करावे लागतात. असे विभाग करण्यासाठी कोणत्या तरी स्वेच्छ भूवैज्ञानिक निकषाचा उपयोग करावा लागतो. जो भूवैज्ञानिक निकष वापरून केलेले विभाग पृथ्वीच्या सर्व भागांत सोयीस्कर ठरतील आणि निरनिराळ्या प्रदेशांतील नैसर्गिक घडामोडींशी जुळणारे होतील, असा कोणताही एकमेव निकष उपलब्ध नाही. म्हणून कोणता निकष वापरावा याविषयी मतभेद असणे स्वाभाविकच आहे.

पृथ्वीच्या आंतरिक घडामोडींमुळे भूकवचाच्या हालचाली घडून येतात आणि पृथ्वीच्या भौगोलिक स्वरूपांमध्ये फेरबदल घडून येतात. पर्यायाने पृथ्वीवर राहणार्‍या जीवांमध्येही फेरबदल होऊ शकतात. अशा हाल-चालींमुळे खडकांमध्ये विसंगती ( म्हणजे स्तरवैज्ञानिक अनुक्रमांत खंड ) निर्माण होतात. या विसंगतींच्या आधारे पृथ्वीच्या इतिहासाचे निरनिराळे विभाग करता येतील अशी कल्पना होती. उदा., अशा प्रकारे भारताच्या भूवैज्ञानिक अभिलेखमालेचे आर्कीयन, पुराण, द्रविड आणि आर्य हे विभाग विसंगतींच्या आधारे केले आहेत. तथापि, पृथ्वीच्या संपूर्ण कवचावर ज्यांचा परिणाम झालेला आहे अशा हालचाली निश्चितपणे ओळखता आलेल्या नाहीत. शिवाय अशा विस्तीर्ण हालचालींव्यतिरिक्त लहानसहान क्षेत्रांत घडून येणार्‍या हालचालीही असतात. म्हणून समग्र पृथ्वीच्या इतिहासाच्या वर्गी-करणासाठी भूकवचाच्या हालचालींचा उपयोग करता येत नाही. परंतु सापेक्षतः मर्यादित क्षेत्रामध्ये त्यांचा उपयोग करणे शक्य असते आणि असा उपयोग सोयीस्करही ठरतो. भारतातील स्तरवैज्ञानिक वर्गीकरणात असा उपयोग करून घेतलेला आहे.

संपूर्ण भूकवचाच्या इतिहासाचे विभाग करण्यासाठी जीवाश्म अत्यंत उपयुक्त ठरले आहेत आणि त्यांच्यापेक्षा अधिक विश्वसनीय निकष मिळालेला नाही. पश्चिम यूरोपातील भूवैज्ञानिकांनी स्तरविज्ञानाचा पाया घातला आणि त्यांनी आपापल्या देशांतील खडकांच्या थरांची व त्यांच्या-तील जीवाश्मांची पाहणी करून त्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यांच्या या स्तरवैज्ञानिक वर्गीकरणात पॅलिओझोइक ( पुराजीव ), मेसोझोइक ( मध्यजीव ) व केनोझोइक ( नवजीव ) असे तीन मुख्य विभाग केले आहेत. त्यांनी या मुख्य विभागांचे उपविभाग ( उदा., कँब्रियन, सिल्युरियन, कार्बॉनिफेरस, ट्रायासिक इ. ) आणि उप-उपविभागही ( उदा., इओसीन, मायोसीन, होलोसीन इ. ) केले आहेत. पृथ्वीच्या इतिहासाचे त्यांनी केलेले हे विभाग, उपविभाग आणि उप-उपविभाग आणि त्यांना दिलेली नावे आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी सामान्यपणे वापरली जातात. परंतु सुरुवातीला विभागांच्या मर्यादा ठरविण्यात व त्यांना नावे देण्याच्या पद्धतीत काही विशिष्ट तत्त्वे वापरली नव्हती किंवा एकवाक्यता नव्हती. काही उप-विभागांची नावे ते खडक जेथे आढळले त्या प्रदेशाच्या वा तेथील लोकांच्या नावांवरून ( उदा., कँब्रियन हे वेल्सच्या मध्ययुगीन कँब्रिया नावावरून तर प्राचीन ब्रिटिश लोकांच्या सिल्युज नावावरून सिल्युरियन ) तर काही त्या उपविभागातील प्रमुख खडकांवरून ( उदा., दगडी कोळसा-युक्त कार्बॉनिफेरस ) आणि काही त्यांच्या रचनेवरून किंवा मांडणीनुसार ( उदा., ट्रायासिक म्हणजे त्रिभागी ) दिली गेली.

भूविज्ञानविषयक वर्णने कधी खडकांना तर कधी त्यांच्या निर्मितीच्या काळाला अनुलक्षून करावी लागतात. असे वर्णन निःसंदिग्ध होण्यासाठी प्रत्येक विभागाला त्याच्या खडकांसाठी एक व ते खडक ज्या काल-विभागात तयार झाले त्या कालविभागासाठी एक अशा दोन वेगळ्या संज्ञा देतात. खडकांच्या मुख्य विभागांना गण, उपविभागांना संघ व उप–उपविभागांना माला आणि काळाच्या विभागांना महाकल्प, उपविभागांना कल्प व उप-उपविभागांना युग म्हणतात. उदा., मध्यजीव महाकल्प हे कालविभागाचे नाव व मध्यजीव गण हे मध्यजीव महाकल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाचे नाव तसेच जुरासिक संघ म्हणजे जुरासिक कल्पात तयार झालेल्या आणि इओसीन माला म्हणजे इओसीन युगात तयार झालेल्या खडकांच्या गटाचे नाव होय. अशा रीतीने निरनिराळ्या प्रदेशांतील खडकांची तुलना करताना यूरोपमधील या विभागांचा उपयोग केला जातो. मात्र निरनिराळ्या प्रदेशांतील उपविभागांची नावे सारखीच असतील असे नाही. याचे स्पष्टीकरण पुढे दिले आहे.

पृथ्वीच्या इतिहासातील प्रमुख घडामोडी व मुख्यतः खडक तयार झाले त्या त्या काळातील जीवांची ( जीवाश्मांची ) स्वरूपे लक्षात घेऊन हे विभाग केलेले आहेत. क्रमविकास ( उत्क्रांती ) होताना जीवांमध्ये बदल होत गेले. यामुळे ठराविक जीव हे या भूवैज्ञानिक अभिलेखमालेतील विशिष्ट भागाचे वैशिष्ट्य असते. म्हणून खडकांचे सहसंबंध व कालानुक्रम ठरविण्यासाठी जीवाश्म उपयुक्त आहेत. ऐतिहासिक घडामोडी केव्हा घडून येतील हे नक्की नसते आणि त्या एका ठराविक काळाने घडून येतील असेही नसते. यामुळे निरनिराळ्या विभागांचे कालावधी सारखे नसून कमी-अधिक आहेत. जीवाश्मांसारख्या भूवैज्ञानिक निकषांवरून निश्चित केलेले काल म्हणजे वय सापेक्ष असतात. पृथ्वीवरील घटना कोणत्या क्रमाने घडून आल्या एवढेच या निकषांमुळे कळते. यातून खडकांची निरपेक्ष वये समजत नाहीत. उदा., जुरासिक संघ ट्रायासिक संघानंतर आणि क्रिटेशस संघाच्या आधी तयार झाल्याचे यावरून कळते परंतु तो किती वर्षांपूर्वी तयार झाला ते सांगता येत नाही.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात किरणोत्सर्गी खनिजांच्या साहाय्याने खडकाचे निरपेक्ष वय ठरविण्याच्या पद्धती पुढे आल्या. त्या पद्धती वापरून काही खडकांची निरपेक्ष वये काढली आहेत [⟶ खडकांचे वय ]. तथापि, पृथ्वीच्या इतिहासाची मिळालेली संगतवार माहिती ही कँब्रियन कल्पाच्या व त्यानंतरच्या कल्पांच्या जीवाश्मयुक्त खडकांवरून मिळाली आहे. कँब्रियन कल्पाची सुरुवात सु. साठ कोटी वर्षांपूर्वी झाली. मात्र किरणोत्सर्गी पद्धतींनी काढलेले पृथ्वीवरील सर्वांत जुन्या खडकांचे वय सु. ४.२ अब्ज वर्षे एवढे आले आहे. याचा अर्थ पृथ्वीच्या एकूण इतिहासाच्या फारच थोड्या भागाची म्हणजे साठ कोटी या अगदी अलीकडच्या काळाची संगतवार माहिती मिळाली आहे. त्याच्या आधीचा अतिदीर्घ काळाचा पृथ्वीचा संगतवार इतिहास जुळविणे शक्य झालेले नाही. थोडक्यात, पृथ्वीच्या एकूण इतिहासापैकी सु. १५ टक्केच इतिहास संगतवार कळला असून जवळजवळ ८५ टक्के इतिहास संदिग्धपणेच माहीत आहे. आर्कीयन नंतरच्या कँब्रियन कल्पाच्या आधीच्या खडकांच्या गटाचे अल्गाँकियन किंवा प्रोटिरोझोइक ( सुपुराकल्प ) आणि त्याच्याही आधीच्या खडकांच्या गटांचे ओझोइक ( अजीव ) हे दोन विभाग करतात. कॅनडाच्या सुपीरियर सरोवरालगतच्या अल्गाँकियन रहिवाशांच्या नावावरून आणि जीवहीन या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून ही नावे आली आहेत.

पहा : पुराजीवविज्ञान भूविज्ञान शैलसमूह, भारतातील स्तरविज्ञान.

ठाकूर, अ. ना.