पॉर्फिरी : मोठे व लहान स्फटिक एकत्रित असणार्‍या अग्निज खडकाकरिता स्थूलमानाने ही संज्ञा वापरतात. यामध्ये सापेक्षत: मोठे स्फटिक अतिसूक्ष्म वा अदृश्यकणी आधारकात विखुरलेले असतात. अशा पोताला पृषयुक्त वयन म्हणतात  व आता ही संज्ञा विशेषेकरून खडकाच्या वयनाच्या संदर्भात वापरली जाते.पृषयुक्त वयनाच्या इतर अग्निज खडकांपासून हा पुढील बाबींमुळे वेगळा ओळखता येतो. याच्यात मोठे स्फटिक विपूल असतात व हा खडक उथळ भागातील शिलापट्ट, भिंत्ती इ. अंतर्वेशित (घुसलेल्या) अग्निज राशींच्या रूपात आढळतो [⟶अग्निज खडक].

पॉर्फिरीचे संघटन विविध प्रकारचे असते व ते ज्या खडकाच्या संघटनाला जवळचे असते, त्याचे नाव पॉर्फिरीला देतात उदा., ग्रॅनाइट वा सायेनाइट पॉर्फिरी. यामध्ये पातालिक (खोल जागि तयार होणार्‍या) खडकापासून ते ज्वालामुखी खडकापर्यंतच्या सर्व प्रकारच्या श्रेणी असू शकतात. उदा., ग्रॅनइट गटाचे याचे पुढील सहा प्रकार असतात: पॉर्फिरिक ग्रॅनाइट (मोठे स्फटिक विपूल) ग्रॅनाइट पॉर्फिरि (मोठे स्फटिक कमी) रायोलाइट पॉर्फिरि (अंतर्वेशित प्रकार) पॉर्फिरिटिक रायोलाइट (बाहेर पडलेला लाव्हा) व्हिट्रोफायर (आधारक काचमय) आणि पॉर्फिरिटिक पिचस्टोन वा ज्वालाकाच (मोठे स्फटिक अगदी कमी).

पॉर्फिरीत मोठे स्पटिक सामान्यत: क्वॉर्टझ वा क्षारीय (अल्कली) फेल्स्पार (सॅनिडिन ऑर्थोक्लेज वा मायक्रोपर्थाइट) यांचे असतात प्लॅजिओक्लेज फेल्स्पाराचे मोठे स्पटिकही असतात व ते हॉर्नब्लेंड व इतर गडद रंगाच्या खनिजांच्या जोडीने आढळतात. पॉर्फिरितील मोठे स्पटिक ऑलिव्हीन, पायरोक्सीन, अँफिबोल,कृष्णाभ्रक इ. मॅफिक (लोह व मॅग्नेशियम विपूल असलेल्या) खनिजांचे असल्यास अशा पृषयुक्त वयनाच्या खडकाला लँप्रोफायर म्हणतात तर प्लॅजिओक्लेजाचे मोठे स्फटिक जास्त असल्यास त्या खडकाला पॉर्फराइट म्हणतात.

पॉर्फिरीचा रंग जांभळट तांबडा असून हा संगमरवारापेक्षा कठीण असतो. खोड, लॅकोलिथ, शिलापट्ट, भित्त इ. अंतर्वेशित राशिंच्या रूपात पॉर्फिरी आढळतात. शिलारस घन होताना अशा वयनाचा खडक विविध प्रकारे निर्माण होऊ शकतो. उदा., खोल जागी शिलारस सावकाश थंड होऊन मोठ् स्पटिक बनतात व नंतर शिलारस वर येउन जलद थंड होऊन सूक्ष्मस्फटिक वा काच बनते [⟶ अग्निज खडक].

भारतामध्ये हा खडक विविध ठिकाणी आढळतो उदा., राजस्थान क्वॉर्टझ पॉर्फिरी. श्रीरंगपट्टमचे पॉर्फिरी खडक बांधकामासाठी वापरतात. प्राचीन काळी हा दगड ईजिप्तमध्ये बांधकामासाठी व पॉलिश करून अंर्तगत सजावट, कलात्मक वस्तू इत्यादींसाठी तर रोमन लोक सुप्रसिध्द तांबडा पॉर्फिरी दगड बांधकामासाठी वापरीत असत.

आधारकाचा रंग सामान्यपणे जांभळट असल्याने त्यावरून जांभळा दगड या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे पॉर्फिरी हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.