पेग्मटाइट : पूर्ण स्फटिकी व (अंशतः) अतिशय भरडकणी खडक. फेल्स्पार व क्वार्टझ यांची आंतरवृद्धी (एकमेकांत घुसून बनलेली संरचना) हे या खडकांचे वैशिष्ट्य असून पूर्वी अशा संरचनेच्या म्हणजे आलेखी ग्रॅनाइटांनाच पेग्मटाइट म्हणत. पेग्मटाइट सापेक्षत: फिकट रंगाचे व भरडकणी वयनाचे (पोताचे) असतात, मात्र त्यांच्यातील कणांचे आकारमान खूप वेगवेगळे असते. त्यांतील कणांचे सरासरी आकारमान ८ ते १० सेंमी. असले, तरी कित्येक मीटर लांबीचे राक्षसी स्फटिकही त्यांत आढळतात. उदा., क्वार्टझ व फेल्स्पार यांचे कित्येक मीटर लांबीचे, तर अभ्रकाचे सु. ३ मी., वैदूर्याचे (बेरिलाचे) सु. ६ मी. आणि स्पॉड्युमिनाचे सु. २० मी. लांबीचे स्फटिक आढळले आहेत. या खडकांचे संघटन सिकत ते अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अधिक ते अल्प असलेले) असे विविध प्रकारचे असते. ग्रॅनाइटाच्या संघटनाचे पेग्मटाइट सर्वांत विपुल असून सायेनाइट, नेफेलीन सायेनाइट, गॅब्रो इत्यादींच्या संघटनांचे पेग्मटाइट थोड्या प्रमाणात आढळतात. सामान्य अग्निज खडकांतील खनिजेच पेग्मटाइटात आढळतात. क्वार्टझ व अल्कली फेल्स्पार (मायक्रोक्लीन, मायक्रोक्लीन पर्थाइट, सोटा प्लॅजिओक्लेज) ही यांच्यातील आवश्यक खनिजे असून त्यांत थोडेफार शुभ्र अभ्रकही असते. कृष्णाभ्रक, काळे तोरमल्ली, गार्नेट, फ्ल्युओराइट, ॲपेटाइट, लेपिडोलाइट इ. गौण खनिजे पेग्मटाइटात असतात. यांशिवाय यांच्यात अनेक विरल खनिजे (उदा.,मोनॅझाइट, मॉलिब्डेनाइट, सोडालाइट, ट्रायफायलाइट, अँब्लिगोनाइट, पोल्युसाइट इ.) व पोकळ्यांच्या कडांशी विविध रत्नेही (वैदूर्य, पुष्कराज, क्रिसोबेरील) अस्तररूपात आढळतात. कधीकधी विविध वयने व खनिजे यांमुळे पेग्मटाइटात पट्टित संरचना निर्माण झालेली असते. सामान्य पेग्मटाइट भित्ती व शिरांच्या रूपांत आढळतात. शिवाय मोठ्या अंतर्वेशित (घुसलेल्या) राशींपासून निघालेल्या शिरा व शाखा, तसेच ग्रॅनाइट, ग्रॅनोडायोराइट व ⇨बर्थोलिथ यांच्यात भिंगाकार वा अनियमित राशींच्या रूपात पेग्मटाइट आढळतात. रूपांतरित खडकामध्येही ग्रॅनाइट पेग्मटाइटाच्या अशा राशी आढळतात. पेग्मटाइटांच्या राशींची लांबी हजारो मीटर व रुंदी शेकडो मीटर असते. शेकडो मीटरपर्यंत जाड व २ किमी. पर्यंत लांब अशा पेग्मटाइटांच्या भित्ती आढळल्या आहेत.


पेग्मटाइट जगात सर्वत्र आणि सापेक्षत: अधिक जुन्या म्हणजे कँब्रियन (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीच्या) व कँब्रियन-पूर्व म्हणजे कँब्रियनच्या आधीच्या काळातील खडकांमध्ये विशेषेकरून आढळतात. ब्राझील, मॅलॅगॅसी (मादागास्कर), प. ऑस्ट्रेलिया, रशिया, आफ्रिका, उ.अमरिका इ. भागांत पेग्मटाइट मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतामध्ये हजारीबाग, मोंघीर, गया इ. ठिकाणच्या पेग्मटाइटांत विपुल अभ्रक आढळते तर राजस्थान, नेल्लोर, हजारीबाग इ. ठिकाणच्या पेग्मटाइटात विरळ खनिजे आढळतात. बुंदेलखंडी पट्टिताश्मात पेग्मटाइटांच्या शिरा आढळल्या आहेत. पेग्मटाइटांच्या उत्पत्तीचा प्रश्न अजून सुटलेला नाही मात्र ते अग्निज प्रक्रियेने वा रूपांतरणाने बनले असावेत, असे मानतात. या दोन्ही बाबतींत पाणी व बाष्पनशील (वाफेच्या रूपात उडून जाणारी) द्रव्ये असणे आवश्यक आहे. अंतर्वेशित शिलारसाच्या स्फटिकीभवनाच्या अखेरच्या अवस्थांतील द्रायुयुक्त (द्रव व वायुयुक्त) अशा अवशिष्ट भागापासून पुष्कळ पेग्मटाइट बनले असावेत. या अवशिष्ट भागात पाणी जास्त प्रमाणात असून त्यात बोरॉन, क्लोरीन, फ्ल्युओरीन वगैरेंसारखी बाष्पनशील द्रव्येही असतात. या द्रायूंमुळे शिलारस तरल (पातळ) बनतो, त्याची आत घुसण्याची क्षमता वाढते आणि त्याच्या स्फटिकीभवनाच्या तापमानाचा पल्ला घटल्याने तो कमी तापमानालाही द्रवरूप राहतो. या सर्व गोष्टींमुळे त्यातील रेणूंच्या हालचाली मुक्तपणे होऊन मोठे स्फटिक बनू शकतात. मोठे स्फटिक बनण्यासाठी बाष्प-अवस्था आवश्यक असल्याचे प्रयोगांवरूनही दिसून आले आहे. हे द्रायू शेजारील खडकांमधील पोकळ्यांत शिरून व बाहेरून आत थंड होत जाऊन पट्टीत रचनेचे पेग्मटाइट बनत असावेत. उलट द्रायू बाहेर न जाता एकत्रित येऊन त्यांच्यापासून अनियमित आकाराच्या पेग्मटाइटाच्या राशी बनत असाव्यात. अशाच तऱ्हेने गॅब्रोतील पट्टीत संरचनेला अनुसरून गॅब्रोच्या संघटनाचे पेग्मटाइट बनत असावेत. यांशिवाय रूपांतरणाने बनलेल्या पेग्मटाइटांच्या विपुल राशीही आहेत. आधीचे खडक अंशत: वितळून व वरील प्रकारच्या द्रायूंनी त्याचे प्रतिष्ठापन होऊन (एका घटकाच्या जागी दुसरा घटक येऊन) पुष्कळ पेग्मटाइट बनले असून त्यांच्यात प्रतिष्ठापन झाल्याच्या अनेक खुणा आढळतात. कॅनडामधील कँब्रियन-पूर्व पेग्मटाइट रूपांतरणाने आणि ग्रॅनाइटीभवनाने (खडकाचे संघटन ग्रॅनाइटासारखे होण्याच्या प्रक्रियेने) निर्माण झाले असावेत.

पेग्मटाइट हे आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचे असून काही दुर्मिळ मूलद्रव्ये फक्त पेग्मटाइटांतच आढळतात. अभ्रक, क्वार्टझ, फेल्स्पार, पुष्कळ रत्ने व कित्येक विरल मूलद्रव्ये मुख्यत: पेग्मटाइटांपासूनच मिळतात. कारण यांच्यात काही मूलद्रव्यांचे एकत्रीकरण झालेले असते. (उदा., बेरिलियम, सिरियम, टेल्यूरियम, युरेनियम, कथिल, निकेल इ.) यांच्यात आढळणारी काही विरल खनिजे व रत्ने पुढीलप्रमाणे आहेत : फेनॅसाइट, कॅसिटेराइट, टंगस्टनाची फॉस्फेटी खनिजे, ॲपेटाइट, स्पॉड्युमीन, तोरमल्ली, लेपिडोलाइट, सोडालाइट, टँटॅलाइट, कोलंबाइट, मॉलिब्डेनाइट, पिचब्लेंड, मोनॅझाइट, फ्ल्युओराइट, ॲक्सीनाइट, झिर्‌कॉन, क्रिसोबेरील, पुष्कराज, वैदूर्य इत्यादी. एकत्रित बांधून ठेवलेला वा जोडलेला खडक या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याला रने हॉय यांनी १८८२ साली पेग्मटाइट हे नाव दिले आहे.  

ठाकूर, अ. ना.