कच्छाचा जुरासिक शैलसमूह : कच्छाचे बरेचसे क्षेत्र जुरासिक कालीन (सु. १८.५ ते १५.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकांनी व्यापिलेले आहेत. त्या खडकांचा एक रुंद पट्टा सर्व कच्छभर पूर्व-पश्चिम गेलेला आहे. या खडकांना घड्या पडलेल्या आहेत व एकूण तीन विमुखनती (एक प्रकारच्या घड्या) येथे आढळतात. अगदी दक्षिणेकडील विमुखनतीच्या पायथ्यालगत तिच्या नतिलंब (खडकांच्या थराच्या कलास म्हणजे नतीस काटकोनात असलेल्या) दिशेस अनुसरून विभंग [भेग, →विभंग,खडकांतील], उत्पन्न झालेला आहे. अधिक उत्तरेस असलेल्या कच्छाच्या रणातील बेटावरही हे खडक आढळतात. काठेवाडाच्या पूर्वेकडील भागात ध्रांगध्राच्या भोवताली कच्छातल्या जुरासिक खडकांसारखेच खडक आढळतात. पूर्वी ते कच्छातल्या खडकांशी सलग जोडलेले होते.

उथळ सागरात गाळ साचून तयार झालेले वालुकाश्म, शेल व चुनखडक हे येथले मुख्य खडक होत व अशा खडकांचे थर आलटून पालटून साचविले जाऊन येथल्या खडकांची राशी तयार झाली आहे. तिची एकूण जाडी दोन हजार मी. पेक्षा किंचित अधिक आहे. गाळ उथळ पाण्यात साचलेले पण त्यांची जाडी इतकी जास्त असण्याचे कारण गाळ साचत असताना समुद्राचा तळ मंद गतीने खचून खाली जात होता हे होय. आजचे कच्छ व काठेवाड ही आहेत तेथे जुरासिक काली समुद्र होता. त्या समुद्राच्या तळाच्या भूमीत दोन विभंग निर्माण होऊन त्या दोहोंमधील जमीन खचून खाली जात होती. जमीन खचल्यामुळे त्या जागी एक द्रोणी तयार झाली. कच्छाचे खडक त्या द्रोणीत साचलेले आहेत.

पुराप्राणिविज्ञानाच्या (गतकालीन भूवैज्ञानिक कालखंडातील प्राण्यांचा व त्यांच्या अवशेषांचा अभ्यास करणाऱ्या विज्ञानाच्या) दृष्टीने कच्छातले जुरासिक कालीन खडक अत्यंत महत्त्वाचे आहेत. सागरी जीवांचे विशेषत: सेफॅलोपोडांचे विपुल जीवाश्म (शिळारूप अवशेष) त्यांच्यात आढळतात. त्यांच्या ११४ गोत्रांच्या व सु. ६०० जातींच्या प्राण्यांचे जीवाश्म आतापर्यंत आढळलेले आहेत. त्यांच्यापैकी सर्वांत विपुल म्हणजे ॲमोनाइटांचे जीवाश्म होत. त्यांच्यावरून कच्छातील खडकांचे भूवैज्ञानिक वय ठरविण्यास मदत होते.

कच्छातील या खडकांचे पाचम माला, चारी माला, काट्रोल माला आणि ऊमिया माला असे चार विभाग पाडण्यात आले आहेत.

पाचम माला : वरील विभागांपैकी हा विभाग सर्वांत जुना आहे. या मालेच्या तळाखाली कोणते खडक आहेत हे दिसत नाही. रणातील पाचम बेटात हे खडक चांगले दृष्टीस पडतात म्हणून मालेला हे नाव दिलेले आहे. वालुकाश्म व चुनखडक हे या मालेचे प्रमुख खडक आहेत. हिच्यात लॅमेलिब्रँकियांचे, ॲमोनाइटांचे आणि नॉटिलसांचे जीवाश्म आढळतात. पण हिच्यानंतरच्या दोन मालांत जितके जीवाश्म आढळतात तितके हिच्यात आढळत नाहीत. हिच्यावर चारी माला वसलेली आहे.

चारी माला : भूजजवळील चारी नावाच्या खेड्याजवळ या मालेचे उत्कृष्ट नमुने मिळल्यावरून हे नाव दिले. शेल, चुनखडक, अंदुकी (राजगिऱ्याच्या आकारमानाच्या गोलाकार कणांचे) चुनखडक (अंदुकाश्म) हे या मालेचे प्रमुख खडक होत. कच्छातील जुरासिक खडकांच्या मालांपैकी हिच्यात सर्वांत विपुल जीवाश्म आढळतात. ॲमोनाइटांचे विपुल जीवाश्म, नॉटिलसांचे कित्येक व बेलेम्‍नाइटांचे थोडे जीवाश्म चारी मालेत आढळतात.

काट्रोल माला : ही माला चारी मालेच्या माथ्यावर वसलेली आहे. शेल व वालुकाश्म हे या मालेतील प्रमुख खडक होत. हिच्यातही ॲमोनाइटांचे पुष्कळ जीवाश्म आढळतात.

ऊमिया माला : ही काट्रोल मालेवर वसलेली आहे. हिची जाडी बरीच, १,००० मी. म्हणजे जवळजवळ तिच्या खालच्या तिन्ही मालांच्या एकूण जाडीइतकी आहे. भुसभुशीत वालुकाश्म व वाळूमिश्रित शेल हे या मालेचे मुख्य खडक होत. या मालेच्या तळाकडचा थोडा भाग ⇨ पिंडाश्माचा बनलेला आहे. त्याच्यात ट्रायगोनिया नावाच्या शिंपाचे थोडे जीवाश्म आढळतात. पिंडाश्माच्या वर वसलेल्या वालुकाश्मात बरेच जीवाश्म आढळतात. त्यांपैकी काही ट्रायगोनिया, ॲमोनाइट, बेलेम्‍नाइट इ. सागरी प्राण्यांचे असून काही जमिनीवरील वनस्पतींचे आहेत. जमिनीवरील वनस्पतींचे जीवाश्म हे थेट उत्तर गोंडवनी संघाच्या खडकांत आढळणाऱ्या वनस्पतींच्या जीवाश्मांसारखे आहेत. त्यांपैकी मुख्य म्हणजे शंकुमंतांपैकी एलाटोक्लॅडस व ॲरॉकॅराइटस व सायकॅडांपैकी टायलोफायलम व विल्यमसोनिया हे होत. सागरी जीवाश्मांत क्रायोसेरस, ॲकँथोसेरस इ. ॲमोनाइटांचा, काही बेलेम्‍नाइट व ट्रायगोनिया यांचा समावेश होतो.

सागरी जीवाश्मांवरून कच्छच्या खडकांचे भूवैज्ञानिक वय अचूक ठरविता येते. ऊमियामालेच्या थरांत सागरी प्राण्यांच्या जीवाश्मांच्या जोडीने जमिनीवरील वनस्पतींचे जीवाश्मही सापडतात. म्हणून त्यांचे भूवैज्ञानिक वयही आपोआप ठरते. या वनस्पतींचे जीवाश्म भारतातील उत्तर गोंडवनी खडकांत आढळतात. त्यामुळे उत्तर गोंडवनी खडकांचे वयही तसेच ठरते. त्या दृष्टीने कच्छातील जुरासिक खडक हे अतिशय महत्त्वाचे आहेत.

केळकर, क. वा.