पिंडाश्म : (गोट्यांचा खडक, काँग्लोमरेट, पुडिंग स्टोन). आधीच्या खडकांचे मोठे व गोलसर झालेले तुकडे अधिक सूक्ष्मकणी (वाळू, गाळवट किंवा मृत्तिकेच्या) आधारकाने अथवा खनिजी संयोजकाने (सिमेंटने) वा दोन्हींनी चिकटविले जाऊन बनलेला गाळाचा खडक. हे तुकडे अणकुचिदार असल्यस खडकाला [ कोणाश्म म्हणतात. पिंडाश्म व कोणाश्म यांना मिळून उपलाश्मिक खडक म्हणतात [ गाळाचे खडक]. पिंडाश्म ही संज्ञा सामान्यात: पाण्याने साचलेल्या खडकांसाठी वापरली जाते. सपाट भूप्रदेशाच्या शेजारी उंच डोंगर असल्यास व त्यांच्यातील संपर्काची पातळी विभंग (तडा) असल्यास डोंगरावरून जमिनीकडे येणारे नद्यानाले वेगाने वाहतात व ते आपल्या प्रवाहाबरोबर गाळ घेऊन येतात. असा गाळ जेव्हा सपाट जमिनीवर साचतो तेव्हा त्याला पंख्यासारखा आकार येतो. अशा पंख्यावर तयार होणार्‍या अशा खडकांना फँग्लोमरेट म्हणतात, तर हिमनदीने वाहून आणलेल्या डबरापासून बनलेल्या खडकाला टीलाइट म्हणतात.

पिंडाश्म तयार होण्यासाठी जेथे खडकाचे तुकडे होतात असा भाग, झालेले तुकडे वाहून नेण्यासाठी पाणी व नंतर तुकडे साचण्यासाठी क्षेत्र या बाबी आवश्यक असतात. आधीच्या खडकांचे तुकडे पाण्याने वा समुद्राच्या लाटांनी वाहून नेले जातात. वाहतुकीमध्ये ते एकमेकांवर आदळून, घासटून व जमिनीवर घासले जाऊन त्यांचे कोनकोपरे झिजून ते गोलसर होतात. या गोलसर दगडगोट्यांमध्ये लुकण बसून किंवा ते संयोजकाने चिकटविले जाऊन पिंडाश्म तयार होतात. हे दगडगोटे दुसर्‍या गाळाखाली झाकले गेल्यावरही संयोजनाची क्रिया होत असावी. अशा प्रकारे उभ्या कड्याचे पर्वत, समुद्राचे किनारे, क्रियाशिल विभंग इ. ठिकाणी विशेष करून पिंडाश्म तयार होतात. पर्वताचे उत्थान (वर येण्याची क्रिया) होताना लगतची द्रोणी (व दरी) खचत असते. अशा द्रोणी कित्येक किमी. जाडीचे पिंडाश्माचे थर तयार होऊ शकतात. उदा., आल्प्स व जुरा पर्वतांतील मोलेसे (स्वित्झर्लंड) किंवा हिमालयाच्या पायथ्याजवळील टेकड्यांतील शिवालीक संघातील पिडाश्म. जेथे मुख्यत्वे रासायनिक विक्रियांद्वारे झीज होते अशा भागांत (उदा., उष्ण कटिबंधीय भागात) पिंडाश्म तयार होण्याची शक्यता कमी असते व तेथे सूक्ष्मकणी गाळाच्या मानाने पिंडाश्म मर्यादित क्षेत्रांत आढळतात.

पिंडाश्मातील खडकांच्या तुकड्यांचे आकारमान व संघटन भिन्न भिन्न असतात. यातील तुकड्यांचा व्यास २ मिमी. पेक्षा जास्त असतो कधीकधी तो ३ ते ६ मी. पर्यत असतो परंतु सर्वसाधारणपणे तो ३५ सेंमी.च्या जवळपास असतो. मात्र पिंडाश्मातील दगडगोटे आकारमानानुसार वेगवेगळे झालेले नसतात. हे तुकडे सामान्यत: क्वॉर्टझाइट, चर्ट, फ्लिंट, शिरेतील क्वॉर्टझ इत्यादींचे असतात, कारण हे खडक कठीण व चिवट असल्याने वरीलप्रकारे झीज होताना टिकून राहतात. यांशिवाय ग्रॅनाइट. पट्टिताश्म, वालुकाश्म व चुनखडक यांचे तुकडेही पिंडाश्मात असतात. पिंडाश्मातील दगडगोटे ज्यामध्ये जडविले गेलेले असतात त्या अधारकाचे द्रव्य वालुकामय असून ते सिलिकामय, कॅल्शियमी, लोहमय, डोलोमाइटी किंवा मृण्मय संयोजकाने चिकटविले गेलेले असते.क्वचित तांबेयुक्त संयोजकही असतो उदा., कीवीनॉ (मिशिगन, अमेरिका).

पिंडाश्मातील तुकड्यांच्या आकारमानानुसार त्यांचे सुक्ष्म, मध्यम किंवा भरडकणी असे प्रकार करतात. तसेच उपपत्तीनुसार त्यांचे नादेय (नदीमुळे बनलेले), सागरी नदीमुखीय व सरोवरी असेही वर्गीकरण करतात. यांपैकी नादेय हा प्रमुख व विपुलपणे आढळणारा प्रकार आहे.पिंडाश्म मुख्यत: जमिनीवर व सागराच्या किनार्‍याजवळ आढळतात. भूकवचाच्या स्वरूपात बदल घडवून आणणार्‍या आणि पर्वत निर्मिणार्‍या हालचालींच्या काळात वा तदनंतर तयार झालेल्या शैलसमुहांत पिंडाश्म सर्वत्र पसरलेले आढळतात, उदा., उ. अमेरिका, यूरोप व न्यूझीलंड येथील उत्तर कारबॉनिफेरस (सु. ३१ ते २७.५ कोटी वर्षापूर्वीच्या) वा ट्रायासिक (सु. २३ ते २० कोटी वर्षापूर्वीच्या)काळातील थरांमधील पिंडाश्म. भारतातील उत्तर शिवालिक संघातील भरड पिंडाश्म तसेच आहेत मात्र त्यांचा काळ पूर्व प्लायोसीन (सु. १.२ ते ०.७५ कोटी वर्षापूर्वीचा) आहे व त्याच्यात घोडा, हिप्पो, हत्ती इत्यादींचे जीवाश्म (जीवांचे शिळारूप झालेले अवशेष) आढळतात. याशिवाय भारतातील धारवाडी संघातील खडकांतही पिंडाश्म आढळतात.

पिंडाश्माचा आधारक व त्यातील तुकडे यांच्या रंगांत चांगला विरोधाभास असतो. त्यमुळे विशेषत क्वॉर्टझ व चुनखडकाचे तुकडे असलेले पिंडाश्म कापून व झिलई देऊन शोभिवंत दगड म्हणून वापरले जातात.

चेंडूच्या रूपात एकत्रित वा गोळा होणे या अर्थाच्या लॅटिन शब्दांवरून याचे काँग्‍लोमरेट हे इंग्रजी नाव पडले आहे. 

ठाकूर, अ. ना.