सेऱ्युसाइट : शिशाचे महत्त्वाचे खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, द्विप्रसूच्याकार व विविध ठेवणींचे स्फटिक सामान्यपणे आढळतात. त्यांची अनेक रूपे असून बऱ्याचदा वडीसारखे आणि सामान्यतः जुळे स्फटिक आढळतात. स्फटिकांचे ताऱ्यासारखे दिसणारे जालरूप गट तयार होऊ शकतात, यांशिवाय हे खनिज कणमय स्फटिकी पुंज, तंतुरूप, कणमय संपुजित, मातकट, संहत व कधीकधी झुंबराकार रुपांत आढळते. [ ⟶ स्फटिकविज्ञान] ⇨ पाटन (११०) व (०२१) स्पष्ट भंजन शंखाभ खूप ठिसूळ कठिनता ३-३·५ वि. गु. ६·५५ (धातूसारखी चमक नसलेल्या खनिजाच्या दृष्टीने वि. गु. उच्च) रंग पांढरा ते पिवळट करडा, समाविष्ट घटकांमुळे बऱ्याचदा उदी, हिरवट वा काळा पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी, कस रंगहीन व गलनक्षम चमक हिऱ्यासारखी [⟶ खनिजविज्ञान]. रा. सं. PbCO3 (यात थोडे जस्त वा स्ट्राँशियम असू शकते). गरम विरल नायट्रिक अम्लात सेऱ्युसाइट विरघळते व फसफसते. उच्च वि. गु., पांढरा रंग व हिऱ्यासारखी चमक या गुणधर्मांमुळे सेऱ्युसाइट वेगळे ओळखता येते. स्फटिकरूप व नायट्रिक अम्लातील फसफसण्याची क्रिया यांच्यामुळे सेऱ्युसाइट तरंगलांबीच्या जंबुपार प्रकाशाने सेऱ्युसाइट अनुस्फुरक (स्वयंप्रकाशी) होते. सेऱ्युसाइट हे शिशाचे महत्त्वाचे व्यापकपणे आढळणारे धातुक (कच्च्या रूपातील धातू) असून शिसे मिळविण्यासाठी याचा उपयोग होतो. शिशाच्या शिरांमध्ये वरच्या पट्ट्यातील गॅलेना या खनिजावर पाझरणाऱ्या कार्बन डाय- ऑक्साइडयुक्त पाण्याची क्रिया होऊन सेऱ्युसाइट बनते. यामुळे सेऱ्युसाइटाबरोबर गॅलेना व स्फॅलेराइट ही प्राथमिक तसेच अँग्लिसाइट, मॅलॅकाइट, पायरोमॉर्फाइट, स्मिथसोनाइट व लिमोनाइट यांसारखी द्वितीयक खनिजे आढळतात. स्पेन (मर्सिया), नॅसॉ (एम्स), नामिबिया (टीसमेब, ओटाव्ही), बोहीमिया (मीज), सायबीरिया (नेचिन्स्क), ऑस्ट्रेलिया (ब्रोकनहिल, न्यू साऊथ वेल्स), अमेरिका (पेनसिल्व्हेनिया, कोलोरॅडो, ॲरिझोना, न्यू मेक्सिको, आयडाहो), जर्मनी, ट्यूनिस व सार्डिनिया बेट येथे सेऱ्युसाइट आढळते. पांढरे शिसे या अर्थाच्या लॅटिन शब्दांवरून याचे सेऱ्युसाइट हे नाव पडले असून यामुळेच याला व्हाइट लेड ओअर असेही म्हणतात.

पहा : शिसे.

ठाकूर, अ. ना.