डेव्होनियन : भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. काळाच्या विभागाला डेव्होनियन कल्प व त्या कल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला डेव्होनियन संघ म्हणतात. हा कल्प सु. ४० कोटी वर्षांपूर्वीपासून ते सु. ३६·५ कोटी वर्षापूर्वीपर्यंत (३·५ कोटी वर्षे) होता. इंग्लंडातील डेव्हन परगण्यात असलेल्या जीवाश्ममय (जीवांच्या शिळारूप अवशेषांनी युक्त) सागरी खडकांवरून रॉडरिक इंपी मर्चिसन व ॲडम सेज्‌विक यांनी हे नाव दिले (१८३९). इंग्लंडातील खडकांपेक्षा चांगले खडक ऱ्हाइन नदीच्या खोऱ्यात व बेल्जियम–फ्रान्स सीमेजवळच्या आर्डेन भागात मागाहून आढळून आले व यूरोपातील खडकांचे अध्ययन करताना संदर्भासाठी त्यांचाच उपयोग केला जातो. त्याच कल्पात पण सागरात तयार न होता खंडांवर किंवा जमिनीने वेढलेल्या खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात किंवा नद्यांच्या मुखाशी आणि वाळवंटी हवामानात तयार झालेले लाल, तपकिरी किंवा जांभळ्या रंगाचे खडकही ब्रिटनमधील कॉर्नवॉल, वेल्स व स्कॉटलंड येथे आहेत. ब्रिटनमध्ये त्यांना ‘ओल्ड रेड सँडस्टोन’ म्हणतात. ते केवळ वालुकाश्म नसून त्यांच्या जोडीने पिंडाश्म, मृत्तिकाश्म व शेलही आढळतात. त्यांच्यासारखे व त्याच कल्पातले थर इतर देशांतही आढळतात. हे खडक सामान्यतः जीवाश्महीन असतात पण त्यांच्यातील काहींत गोड्या पाण्यात वा नद्यांच्या मुखाजवळच्या खारट पाण्यात राहणाऱ्या मत्स्यांचे व यूरिप्टेरिडांचे व जमिनीवरील वनस्पतींचे पुष्कळ जीवाश्म आढळतात. मत्स्यांपैकी प्रमुख गट म्हणजे ऑस्ट्रॅकोडर्मी आणि क्रॉसोप्टेरिजाय हे होत. फुप्फुसमीनही (फुप्फुसासारख्या वायुयुक्त पिशवीने व कल्ल्यांनीही श्वसन करणारे मासेही) या कल्पात अवतरले होते.

ब्रॅकिओपोडा विपुल व मुख्यतः आर्टिक्युलेटांपैकी होते आणि त्यांची सिल्युरियन काळातील (सु. ४२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) बहुतेक कुले टिकून होती. 

 सिल्युरियन काळाच्या मानाने ट्रायलोबाइटांचे पुष्कळ कमी वंश होते पण होते ते वंश सिल्युरियन काळातलेच होते. गोनियाटाइट अवतरून त्यांची वाढ झाली व सूचक जीवाश्म म्हणून त्यांचा उपयोग होतो. बायव्हाल्व्हियांची व गॅस्ट्रोपोडांची संख्या वाढली.

प्रवाळ व स्ट्रोमॅटोपोरॉयडिया विपुल होते. प्रवाळांपैकी टॅब्युलाटांची संख्या कमी होऊन रुगोजांची वाढत गेली. चुनखडकांत प्रवाळांचे व स्ट्रोमॅटोपोरॉयडियांचे पुष्कळ जीवाश्म आढळतात. वर उल्लेख केलेल्या इतरांचे जीवाश्म मुख्यतः वालुकामय खडकांत आढळतात. काही सागरी मृण्मय खडकांत सागरी मत्स्यांचे जीवाश्म आढळतात.

मत्स्य व जमिनीवरील वनस्पती ही पूर्वीच अवतरली होती, पण या कल्पातील खडकांत त्यांचे विपुल जीवाश्म प्रथमच आढळतात. मत्स्यांचे सर्व प्रमुख गट डेव्होनियन कल्पात होते व या कल्पाला मत्स्यांचे युग असे म्हणतात. जमिनीवरील वनस्पती मुख्यतः सायलोफायटेल व टेरिडोस्पर्म गटातील होत्या. ग्रीनलंडातील उत्तर डेव्होनियन खडकांत उभयचरांचे (जमिनीवर व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांचे) जीवाश्म आढळलेले आहेत. म्हणजे जमिनीवरील पृष्ठवंशीही (पाठीचा कणा असलेले प्राणीही) याच कल्पात अवतरले.

या कल्पाचे मुख्यतः सागरी व काही असागरी खडक ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, मॉस्को-प्रदेश, अल्ताई पर्वत, नैर्ऋत्य चीन, वायव्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया, ॲमेझॉनचे सखल खोरे, बोलिव्हिया, फॉकलंड बेटे, दक्षिण आफ्रिका, मोरोक्को, कॅनडा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इ. क्षेत्रांत आहेत. भारताच्या द्वीपकल्पात या काळाचे खडक आढळलेले नाहीत, पण अलमोडाजवळच्या हिमालयाच्या रांगांत, नेपाळात व ब्रह्मदेशात डेव्होनियन कालीन सागरी जीवाश्ममय खडक आहेत. हिमालयाच्या पंजाबातील रांगांतल्या मूथ क्वॉर्ट्‌झाइटांच्या माथ्याजवळचा भाग त्याच कल्पातला असावा.

केळकर, क. वा.