स्पिलाइट : हा अदृश्यकणी ते अतिसूक्ष्मकणी वा घट्ट असा उद्गीर्ण (ज्वालामुखी) अग्निज खडक आहे. यात नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारे स्फटिक नसून ते सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहता येतात. सामान्य-पणे हिरवट किंवा करड्या रंगाच्या या खडकाचे स्वरूप कमी-जास्त प्रमाणात बदललेले (अपघटित झालेले) असते. तो दिसायला बेसाल्ट खडकासारखा असला, तरी सामान्यपणे बेसाल्टात आढळणार्‍या लॅब्रॅडोराइट या फेल्स्पार खनिजाऐवजी त्यात अल्बाइट किंवा ऑलिगोक्लेज हे फेल्स्पार असते. मूळच्या उदी ऑजाइटात बदल होऊन बनलेली क्लोराइट, एपिडोट, कॅल्साइट व ॲक्टिनोलाइट ही खनिजे स्पिलाइटात आढळतात. ही खनिजे नीच तापमानाला सजल स्फटिकीभवनाद्वारे बनलेली असतात. सोड्याचे जास्त प्रमाण असलेले प्लॅजिओक्लेज यात असले, तरी याची वर्गवारी बेसाल्टाबरोबर करतात. कारण यात सिलिकेचे प्रमाण कमी (सु. ५०%) असते, तसेच बेसाल्टाचे वैशिष्ट्यपूर्ण पोत व संरचना यात आढळतात.

पुष्कळ वेळा स्पिलाइट पुळीदार म्हणजे पुटिका (देवीच्या व्रणासारखे लहान खळगे) असलेले असतात. या पुटिका सामान्यपणे विविध खनिजांनी भरलेल्या असल्याने त्यामुळे खडकाला कुहरयुक्त संरचना प्राप्त होऊ  शकते. ते बर्‍याच वेळा लाव्हा प्रवाह आणि कमी प्रमाणात भित्ती व शिलापट्ट या रूपांत आढळतात. त्याच्या लाव्ह्यात नमुनेदार गिरदी (पिलो) संरचना आढळते आणि ती इतर कोणत्याही खडकापेक्षा सर्वांत परिपूर्ण रीतीने विकसित झालेली असते. या संरचनेत एक मीटरपर्यंत लांबीचे, उशीच्या आकाराचे, लांबट व घट्टपणे भरलेले पिंडद आढळतात. गिरदी संरचना हे (सागरी) पाण्याखालील लाव्हाप्रवाहांचे नमुनेदार वैशिष्ट्य असते. गिरदी संरचनेचे काही स्पिलाइट खर्‍या अर्थाने लाव्हे नसतात. ते घट्ट न झालेल्या ऊझात शिलारस घुसून बनलेली उथळ अंतर्वेशने असतात. त्याचे उत्कृष्ट उदाहरण ऑस्ट्रेलियातील नंडल (न्यू साउथ वेल्स) येथे आढळणारा अंतर्वेशी स्पिलाइट आहे.

प्रथम बृहत्स्फटिक नसलेल्या व सुस्पष्ट पुळीदार पोत असलेल्या अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) लाव्ह्यांसाठी स्पिलाइट ही संज्ञा वापरीत. अशा रीतीने अल्बाइट, डोलेराइट, मिन्व्हेराइट, पिक्राइट, केरॅटोफायर, सोडा फेल्साइट व सोडा ग्रॅनाइट यांसारख्या खडकांच्या गटाला हे नाव देतात. काही शिलावैज्ञानिकांच्या मते स्पिलाइट हे केवळ अग्निज उत्पत्ती असलेले खडक नाहीत ते रूपांतरित बेसाल्ट मानतात. या रूपांतरणात कॅल्शियम विपुल असलेल्या प्लॅजिओक्लेजाच्या विक्रियेतून अल्बाइट आणि एपिडोट, कॅल्साइट, प्रेहनाइट व पम्पेलाइट यांपैकी एक वा अनेक कॅल्शियमयुक्त खनिजे निर्माण होतात. तसेच बेसाल्टातील प्राथमिक स्वरूपाच्या पायरोक्सीन व ऑलिव्हीन या खनिजांचे क्लोराइट, ॲक्टिनोलाइट व सर्पेंटाइन या खनिजांत नमुनेदार परिवर्तन होते. काही बेसाल्ट प्रवाहांच्या पुळीदार माथ्याचे स्पिलाइटात परिवर्तन झालेले आढळते. हे परिवर्तन जलऊष्मीय रूपांतरण असून ते गरम मिठवणीच्या क्रियेमुळे घडते. मिठवणीचे पाणी खडकांत झिरपते. गिरदी व पुटिमय संरचनेद्वारे ते प्राथमिक खनिजांपर्यंत पोहोचते. पूर्वीचे महासागरी भूकवच काही ठिकाणी जमिनीवर उघडे पडले आहे. अशा ठिकाणी स्पिलाइट व केरॅटोफायर (स्पिलाइटरूप झालेला अँडेसाइट खडक) यांचे गिरदी लाव्हे पुनःपुन्हा आढळतात. यावरून कमी तीव्रतेचे जलऊष्मीय रूपांतरण हे महासागरी भूकवचातील सामान्य रूपांतरण असल्याचे सूचित होते.

जगात विस्तृत क्षेत्रांवर व मोठ्या प्रमाणात स्पिलाइट उद्रेक पुनःपुन्हा झालेले आढळतात. जेथे सागरी तळाचे दीर्घ, अखंड व सौम्य अधोगमन झाले असून हालचाल थोडीच वरच्या दिशेत (ऊर्ध्वगामी) झालेली असते आणि जेथे मोठी विभंगक्रिया झालेली नसते, अशा नमुनेदार क्षेत्रांत स्पिलाइट गटातील खडक आढळतात. सामान्यपणे भूद्रोणीच्या सीमावर्ती भागात अशा लाव्ह्याचे उद्गीरण झालेले असते. अशा भूद्रोणीत काळे शेल, चुनखडक व रेडिओलॅरियन चर्ट साठतात. भूद्रोणी नंतरच्या वलीकरण हालचालींचे केंद्र असल्याने अनेक प्राचीन स्पिलाइटांमध्ये मोठ्या प्रमाणावर घड्या पडलेल्या असतात व त्यांचे रूपांतरण झालेले असते. त्यांच्यात रूपांतरित अल्बाइटासारखी खनिजे तयार झालेली आढळतात. ठिपका किंवा डाग या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून स्पिलाइट हे नाव पडले आहे.

पहा : अग्निज खडक बेसाल्ट रूपांतरित खडक शिलाविज्ञान.

संदर्भ : 1. Amstutz, G. C. and others, Eds., Spilites and  Spilitic Rocks, 1997.

           2. Bert, M. G. Igneous and Metamorphic Petrology, 2002.

 

ठाकूर, अ. ना.