गिब्साइट : (हायड्रार्जिलाइट). खनिज. स्फटिक एकनताक्ष चापट षट्‌कोनी वडीसारखे [→ स्फटिकविज्ञान]. कधीकधी गुच्छाकार, झुंबराकार व अस्पष्ट तंतुमय तसेच संधिताच्या रूपांतही आढळते. यमलन (जुळेपणा) सामान्य यमलनपृष्ठ (001). पाटन : (001) स्पष्ट [→ पाटन]. चिवट. कठिनता २·५ — ३·५. वि. गु. २·३ ते २·४. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. रंग पांढरा, करडसर, हिरवट किंवा तांबूस. चमक काचेसारखी, पाटनपृष्ठाची मोत्यासारखी. त्यावर फुंकर घातल्यास मातीसारखा वास येतो. रा. सं. Al (OH)3. हे ⇨ बॉक्साइटात आणि ⇨जांभ्यात बोहेमाइट व डायास्पोर यांच्या जोडीने आढळते. कधीकधी काही ॲल्युमिनियमयुक्त अग्निज खडकांमधील पोकळ्यांत आणि शिरांमध्ये हे आढळते. अमेरिकेतील खनिजवैज्ञानिक जॉर्ज गिब्ज यांच्यावरून गिब्साइट हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.