कॉर्डिएराइट : (इओलाइट, डायक्रोआइट). खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, आखूड प्रचिन चांगले स्फटिक विरळाच आढळतात. (110) किंवा (130) या पृष्ठांवरील यमलनामुळे (जुळ्या स्फटिकांमुळे) स्फटिक छद्मषट्कोणीय दिसतात [→स्फटिकविज्ञान]. सामान्यतः खडकात रुतलेल्या कणांच्या व संपुंजित स्वरूपात आढळते. पाटन: (010) अस्पष्ट [→पाटन]. किंचित बदल झाल्यावर स्फटिकात (001) ला समांतर अशी विभाजनतले दिसतात. भंजन काहीसे शंखाभ. ठिसूळ. कठिनता ७-७⋅५. वि. गु. २⋅६०-२⋅६६. पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. रंग सामान्यतः निळ्या रंगाच्या छटांचा कधीकधी जांभळा आणि क्वचित रंगहीन, उदी किंवा करडा. रा. सं. Mg2Al4Si5O18 . सामान्यपणे Mg जागी Fe2+ व Mn आणि Al च्या जागी Fe3+ येऊ शकते. कधीकधी यात Ca व (OH) हेही असतात. ॲल्युमिनियमयुक्त खडकांच्या मध्यम ते उच्च प्रतीच्या रूपांतरणाने व कधीकधी प्रत्यक्ष अग्निज क्रियेनेही कॉर्डिएराइट तयार होते. हवेत साध्या उघड्या पडण्यानेही कॉर्डिएराइट लगेच बदलत असल्यामुळे ते बदललेल्या स्वरूपातच सापडते. हे पट्टिताश्म, सुभाजा, हॉर्नफेल्स, ग्रॅनाइट, अँडेसाइट, डेसाइट, रायोलाइट इ. खडकांत गौण खनिज म्हणून आढळते. श्रीलंका, बव्हेरिया, फिनलंड, ग्रीनलंड व मॅलॅगॅसी या प्रदेशांत कॉर्डिएराइट सापडते. भारतात बस्तर, तामिळनाडू, कर्नाटक इ. भागांत कॉर्डिएराइटयुक्त पट्टिताश्म व सुभाजा आढळतात. कॉर्डिएराइटाचे चांगल्या रंगाचे व पारदर्शक स्फटिक रत्ने म्हणून वापरतात. ते श्रीलंकेमध्ये सापडतात. कॉर्डिएर ह्या फ्रेंच भूवैज्ञानिकांच्या नावावरून कॉर्डिएराइट हे नाव दिले गेले जांभळ्या रंगावरून इओलाइट आणि प्रकाशीय द्विवर्णी (दोन दिशांनी पाहिल्यास वेगवेगळे दोन रंग दर्शविण्याच्या) गुणधर्मावरून डायक्रोआइट ही नावे याला दिली गेली आहेत.

ठाकूर, अ. ना.