स्पेरिलाइट : हे नैसर्गिक स्थितीत आढळणारे प्लॅटिनम धातूचे ज्ञात असे एकमेव संयुग आहे. हे अतिशय विरळा आढळणारे खनिज असून त्याचे घनाकार किंवा घन-अष्टफलकीय बारीक स्फटिक आढळतात. [⟶ स्फटिकविज्ञान] कठिनता ६-७ वि. गु. १०·६ चमक धातूसारखी रंग कथिलासारखा पांढरा, कस काळा अपारदर्शक. [⟶ खनिजविज्ञान] रा. सं. झींई२ (प्लॅटिनम आर्सेनाइड). ड्यूनाइटासारख्या अत्यल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अत्यल्प असलेल्या) खडकांत प्लॅटिनमाचा स्रोत म्हणून याचा शोध घेतात. प्रत्यक्ष क्षेत्रात याच्याबरोबर सामान्यपणे ऑलिव्हीन, क्रोमाइट, पायरोक्सीन व मॅग्नेटाइट ही खनिजे आढळतात. प्लॅटिनमयुक्त अनेक निक्षेपांतही हे सामान्य खनिज असते. कॅनडाच्या आँटॅरिओ प्रांतातील सडबरीच्या पश्चिमेस असलेल्या व्हर्मिलिऑन खाणीत हे सर्वप्रथम आढळले (१९०२). त्याच भागात निकेलयुक्त धातुकात (कच्च्या रूपातील धातूत) आणि अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील रँब्लर खाणीत ते कोव्हेलाइटाबरोबर आढळले, तसेच ट्रान्सव्हालमधील (द. आफ्रिका) वॉटरबर्ग प्रदेशात याचे असाधारण मोठे स्फटिक आढळले (१९७५). अमेरिकेच्या नेव्हाडा व नॉर्थ कॅरोलायना या राज्यांतही स्पेरिलाइट आढळले आहे. अमेरिकी रसायनशास्त्रज्ञ फ्रॅन्सिस एल्. स्पेरी यांच्यावरून त्याचे स्पेरिलाइट हे नाव पडले आहे.

पहा : प्लॅटिनम.

ठाकूर, अ. ना.