तालचेर माला : भारतात आढळणाऱ्या ⇨ गोंडवनी संघ नावाच्या शैलसमुहाच्या तळाचा विभाग. ओरिसातील तालचेर जिल्ह्यात प्रथम ओळखण्यात आल्याने हे नाव पडले. या मालेत तळाशी गोलाश्म संस्तर, त्यावर शेल व वालुकाश्म आढळतात. या थरात धोंडे, गोटे, खडकांचे तुकडे, मृत्तिका इ. विविध आकार आणि आकारमान असलेल्या भिन्न संघटनाच्या पदार्थांची सरमिसळ आढळते. यातील वालुकाश्मात अपघटन (रासायनिक विक्रियेमुळे होणारा बदल) न झालेली ताजी दिसणारी खनिजे आहेत. त्यातील कित्येक दगडगोटे पैलूदार असून कित्येकांवर ओरखडण्यामुळे रेखांकन (रेघा उमटण्याची क्रिया) झालेली आढळते. गोलाश्म संस्तर १५ ते ६५ मी. जाड आहे. ही माला पूर्व गोंडवनी संघाचा भाग आहे. हिच्या तळाच्या भागात जीवाश्म (जीवांचे शिळारूप अवशेष) आढळलेले नाहीत. मात्र वरच्या भागात मुख्यत्वेकरून गॅंगॅमॉप्टेरीस, ग्लॉसोप्टेरीस या वनस्पतींचे व जमिनीवरील काही प्राण्यांचे थोडे जीवाश्म आढळतात. ही माला कार्‌बॉनिफेरस कालीन (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वींची) आहे. द. अफ्रिका, ऑस्ट्रेलिया व द. अमेरिका या भागातही या मालेशी तुल्य असे निक्षेप (खडकांच्या राशी) आढळतात.

ठाकूर, अ. ना.