दिल्ली संघ : दिल्ली ते ईडरपर्यंतच्या आणि अरवली पर्वताच्या अक्षाला समांतर असलेल्या पट्ट्यात आढळणाऱ्‍या खडकांचा गट. हे खडक भूकवचाच्या हालचालींमुळे विक्षाेभित झालेलेव पूर्व कडप्पा कालीन [⟶  कडप्पा संघ]आहेत. मात्र तीव्रविक्षोभ व अधिक तीव्रपणे पडलेल्या घड्या यांबाबतीत दिल्ली संघाचे खडक कडप्पा संघातील खडकांच्या सर्वसामान्य भूसांरचनिक (भूकवचाच्या हालचालींमुळे उद्‌भवणाऱ्या) वैशिष्ट्यांहून वेगळे आहेत. स्थानिक प्रकाराच्या गिरिजनक (पर्वत निर्माण करणाऱ्‍या) हालचालींनी खडकांना घड्या पडून विक्षोभित झाल्याने आणि ग्रॅनाइटअँफिबोलाइट या खडकांच्या मोठ्या अंतर्वेशनांमुळे (घुसलेल्या राशींमुळे) दिल्ली संघ हा कडप्पा संघाचा खास वैशिष्ट्ये असणारा स्थानिक असा प्रकार मानला जातो.

दिल्ली संघाचे खडक दिल्ली ते अजमेर–मेवाड मार्गे ईडर व पालनपूरपर्यंतच्या आणि नीमचपलीकडील प्रदेशांपर्यंत (सु.११० X ५० किमी. क्षेत्रावर)पसरलेले आहेत. अरवलीच्या प्रमुख समधोवलीत[खाली वाकलेल्या जटिल घडीत⟶ घड्या, खडकांतील]याचे चिंचोळे व अतिशय क्षरण (झीज) झालेले अधोवलीच्या (खाली बाक असलेल्या घडीच्या) रूपातील पट्टे आढळतात. त्यांच्यात अधूनमधून जलोढ (पाण्याने वाहून आणलेला गाळ) आढळतो. अजमेर–मेवाड व मेरवाड या भागांत हा संघपरीपूर्ण अवस्थेत आढळतो. यासंघाची एकूण जाडी ५,२०० ते ६,६०० मी. असून पाटीच्या दगड, फिलाइट, क्वार्ट्‌झाइट, रूपांतरित चुनखडक, खरीचा खडक इ. खडक यात आढळतात. विविध प्रकारच्या अग्निज खडकांची यातील अंतर्वेशने हे या संघाचे वैशिष्ट्य आहे. या संघात अल्प व अत्यल्प सिकत (सिलिकेचे प्रमाण कमी व अतिशय कमीअसलेल्या) अग्निज खडकांची अंतर्वेशनेही (उदा., शिलापट्ट, शिरा, ट्रॅपचे प्रवाह) यात आहेत. शिवाय ग्रॅनाइटाचे स्कंध व लॅकोलाइट हेही यात घुसलेले आढळतात [⟶ अग्निज खडक]. या अग्निज खडकांच्या जोडीने त्यांच्याशी संबंधित असेपेग्मटाइट व ॲप्लाइट खडकांचे गटही आढळतात. अग्नीज खडकांपैकी अल्पसिकत खडक पुष्कळच बदललेले आहेत. जुन्या अरवली खडकांच्या मानाने नवीन असलेले दिल्ली संघाचे खडकच अधिक तीव्रपणे रूपांतरित झालेले आढळतात. याचे एक स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे देतात : अरवली खडकांच्या दिल्ली संघाचे खडक समधोवलीच्या तळाशी अधिक खोलवर गाडले गेलेले आहेत उलट अरवली खडक घडीच्या बाजूंवर असल्याने त्यांचे रूपांतरण कमी प्रमाणात झाले असावे. दिल्ली संघांचे खडक अरवली खडकांवर आणि विंध्य संघाचे खडक दिल्ली संघाच्या खडकांवर  विसंगतपणे वसलेले आहेत. त्यामुळे दिल्ली संघ अरवली संघापेक्षा जुना ठरतो. अशा प्रकारे दिल्ली संघ पूर्व कडप्पाकालीन व पुराण महाकल्पाचा प्रारंभ मानतात [⟶ पुराण महाकल्प व गण]. किरणोत्सर्गी काल मापनानेही [⟶ खडकांचे वय] दिल्ली संघाचे वय पुराण कालीन (सु, ६१ ते ७२·५ कोटी वर्षे) आले आहे.

दिल्ली संघाचे वर्गीकरण ए. एम्. हेरन यांनी पुढीलप्रमाणे केले आहे.

विसंगती 

सेम्री माला (पूर्व विंद्ध) 

अजबगड माला (सु. १,६५० मी.) 

 

कुशलगड चुनखडक (सु. ४५० मी.) 

विसंगती 

अलवर माला (सु. ३०० ते ४,०२५ मी.) 

रायालो माला व पट्टिताश्म (अरवली) 

खेत्री–सिंघाना येथील तांब्याची व बबई येथील कोबाल्टाची धातुके (कच्च्या रूपातील धातू) दिल्ली संघाशी निगडित असलेल्या खडकांच्या जोडीने आढळणाऱ्‍या क्वॉर्ट्‌झाइट व पाटीच्या खडकांत आढळतात. तसेच अलवर क्वॉर्ट्‌झाइटामध्येही तांब्याच्या व लोहाची काही धातूके आढळली आहेत.

सी. ए. हॅकेट यांनी १८८१ साली दिल्ली शहरावरून या संघाला हे नावदिले.

पहा : अजबगड माला अलवर–माला कडप्पा संघ.

ठाकूर, अ. ना.