बोर्नाइट : (एरूबसाइट). खनिज. स्फटिक प्रचिनाकार पण क्वचित आढळतात. याची तीन बहुरूपे म्हणजे भिन्न स्फटिकीय रूपे माहीत आहेत. पैकी घनीय रूप २२८ से.पेक्षा जास्त तापमानाला स्थिर असते. जलदपणे थंड होताना मधले समांतर षट्फलकीय रूप बनते आणि हे मधले रूप सावकाशपणे बदलत जाऊन सर्वसाधारण तापमानास स्थिर असणारे चतुष्कोणीय रूप तयार होते [⟶ बहुरूपता स्फटिकविज्ञान]. सामान्यतः हे कणमय, संपुंजित, संहत वा स्तंभाकार रूपात आढळते. ⇨पाटन : (111) लेशमात्र. भंजन शंखाभ ते खडबडीत [⟶ खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ३. वि. गु. ५.०६-५.०८. चमक धातूसारखी. अपारदर्शक. रंग ताज्या पृष्ठाचा काशासारखा तांबडा (म्हणून हॉर्सफ्लेश ओअर हे नाव) ते उदी परंतु हवेत उघडे पडल्याने काही तासांतच सहजपणे पृष्ठ गंजते (मळते) व त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण जांभळा व तांबडा वर्णविलास दिसतो. यावरून या खनिजाला पिकॉक ओअर, पर्पल व व्हेरिगेटेड कॉपर ओअर व एरूबसाइट (तांबडा होणे या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून) ही नावे पडली आहेत. कस करडसर काळा व किंचित चकचकीत. रा. सं. Cu5FeS4. हे उघड्या नळीत तापविल्यास सल्फर डाय-ऑक्साइड वायू बाहेर पडतो. हे सहजपणे बदलून त्यापासून कॅल्कोसाइट आणि कोव्हेलाइट ही तांब्याची खनिजे तयार होतात. तांब्याच्या बहुतेक धातुक निक्षेपांत (कच्च्या धातूच्या साठ्यांत) हे तांब्याच्या इतर खनिजांबरोबर (उदा., कॅल्कोपायराइट, कॅल्कोसाइट इ.) आढळते. अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असणाऱ्या) अग्निज खडकांत, ग्रॅनाइटात, पेग्मटाइटात, तसेच काही रूपांतरित खडकांत हे आढळते. इंग्लंड व ऑस्ट्रियामध्ये याचे स्फटिक आढळतात. हे तांब्याचे गौण धातुक आहे मात्र चिली, पेरू, बोलिव्हिया, टास्मानिया, मेक्सिको, माँटॅना (अमेरिका), नामिबिया, प. जर्मनी व द. ऑस्ट्रेलिया येथे हे तांब्याचे धातुक म्हणून महत्त्वाचे ठरले आहे. ऑस्ट्रियन खनिजवैज्ञानिक इग्नाट्स फोन बोर्न (१७४२-९१) यांच्या नावावरून याचे बोर्नाइट हे नाव आले आहे.

पहा : तांबे.

ठाकूर, अ. ना.