क्रिसोकोला : खनिज. स्फटिक सुईसारखे. बहुधा गूढस्फटिकी (सूक्ष्मस्फटिकी) अथवा अस्फटिकी असते. सामान्यतः संपुंजित कधीकधी लेपाच्या, गुच्छाकार इ. स्वरुपांत आढळते. भंजन शंखाभ [→ खनिजविज्ञान]. दुधी काचेप्रमाणे पारभासी असलेले प्रकार ठिसूळ. कठिनता २–४. वि. गु. २–२·४. पारभासी ते अपारदर्शक. चमक काचेसारखी ते मातीसारखी. रंग हिरवा ते हिरवट निळा अशुद्ध प्रकाराच्या उदी ते काळा. रा. सं. जवळजवळ CuSiO3.nH2O. विशेषतः पाण्याचे प्रमाण बरेच बदलते. पुष्कळदा अशुद्ध असते. बंद नळीत तापविल्यास खनिज काळसर होऊन पाणी बाहेर पडते. हे द्वितीयक (नंतरच्या क्रियांनी बनलेले) खनिज असून तांब्याच्या शिरांमधील ऑक्सिडीभूत [→ ऑक्सिडीभवन] पट्ट्यात तांब्याच्या इतर खनिजांबरोबर आढळते. ॲरिझोना, न्यू मेक्सिको इ. भागांत सापडते. कधीकधी दागिन्यांसाठी व तांब्याचे गौण धातुक (कच्ची धातू) म्हणून वापरतात. सोन्याच्या डागकामासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रव्याप्रमाणे दिसते म्हणून सोने व सरस या अर्थाच्या ग्रीक शब्दांवरून क्रिसोकोला नाव पडले.

ठाकूर, अ. ना.