कोव्हेलाइट : खनिज. स्फटिक षट्फलीय वडीसारखे परंतु क्वचित सापडतात [→ स्फटिकविज्ञान]. बहुधा संपुंजित, पर्णित किंवा विखुरलेल्या कणांच्या रूपात आढळते. पाटन : (0001) अत्युत्कृष्ट [→ पाटन]. कठिनता १·५-२. वि.गु. ४·६ – ४·७६. अपारदर्शक. रंग निळीसारखा पुष्कळदा रंगदीप्त (एकाच नमुन्यात अनेक रंग दिसतात). कस शिशासारखा काळा. चमक धातूसारखी. रा.सं. CuS. हे उघड्या नळीत तापविल्यास सल्फर डाय-ऑक्साइडाचा वास येतो, तर बंद नळीत तापविल्यास गंधक बाहेर पडते. तांब्याच्या बहुतेक निक्षेपांतील द्वितीयक समृद्धिभूत (नंतरच्या क्रियांनी तांब्याच्या खनिजांचे प्रमाण वाढलेल्या) पट्ट्यात हे तांब्याच्या इतर सल्फाइडांबरोबर आढळते आणि हे त्यांच्यापासून बनलेले असते. हे यूगोस्लाव्हिया, ऑस्ट्रिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इ. देशांमध्ये सापडते. हे तांब्याचे गौण धातुक (कच्च्या स्वरूपातील धातू) आहे. एन्. कोव्हेली यांनी व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीतील खडकांतून हे खनिज शोधून काढले म्हणून त्यांच्या नावावरून कोव्हेलाइट नाव पडले.

ठाकूर, अ. ना.