मुलतानी माती : (फुलर्स अर्थ). खनिज वा वनस्पतिज तेलाचा रंग घालविणाऱ्या फायदेशीर अशा कोणत्याही नैसर्गिक मातकट द्रव्याला (उदा., मृत्तिका, गाळवट) हे नाव देतात. निरनिराळ्या ठिकाणी आढळणाऱ्या मुलतानी मातीच्या खनिज वा रासायनिक संघटनात तफावत आढळते. परिणामी खनिजविज्ञानाच्या दृष्टीने या संज्ञेला महत्त्व नाही. पूर्वी कधी लोकर स्वच्छ करण्यासाठी पाण्याबरोबर विशिष्ट प्रकारची माती वापरीत. त्यामुळे मळ व तेलकटपणा निघून जाऊन लोकर स्वच्छ होते. पुढे कापडाचा मळ व तेलकटपणा घालविण्यासाठी या मातीचा वापर होऊ लागला. या प्रक्रियेला ‘फुलिंग’ व कापड कापणाराला ‘फुलर’ म्हणत आणि यावरून अशा मातीला ‘फुलर्स अर्थ’ हे इंग्रजी नाव पडले. विशेषतः कापडातील मळ, धूळ, अनावश्यक रंग व त्यावरील तेलकट डाग नाहीसे करणाऱ्या मुलतानी मातीला ‘विरंजक मृत्तिका’ असेही म्हणतात. अशा मातीची विरंजनक्षमता (रंग घालविण्याची क्षमता) नैसर्गिक रीत्याच आलेली असते आणि तिच्यातील मृद्-खनिजांमधील पाणी घालवून टाकण्याइतक्या जास्त तापमानास तापविल्यास तिची विरंजनक्षमता नष्ट होते. काही मृत्तिकांची विरंजनक्षमता कृत्रिम रीतीने (उदा., अम्लाचे संस्करण करून) वाढविता येते मात्र सामान्यपणे त्यांना मुलतानी माती संबोधित नाहीत.

मुलतानी मातीच्या गुणधर्मांत पुष्कळ फरक आढळतात. कधीकधी एकाच निक्षेपातील (साठ्यातील) निरनिराळ्या ठिकाणच्या मातीचे गुणधर्मही एकसारखे आढळत नाहीत. पाण्याचे (व सामान्यपणे मॅग्नेशियाचे) जादा प्रमाण, सुकल्यावर जिभेला घट्टपणे चिकटणे व पर्णित (पानांसारख्या थरांची)रचना ही मुलतानी मातीची वैशिष्ट्ये असून ही आकार्य (सहज आकार देता येण्यासारखी) नसते. अटापुलगाइट, माँटमोरिलोनाइट, केओलिनाइट इ. मृद्-खनिजे हिच्यात असू शकतात परंतु ही खनिजे असणारी काही द्रव्ये अत्यंत कमी विंरजनक्षम असल्याने त्यांना ही संज्ञा वापरीत नाहीत. मूलतानी मातीचा रंग फिकट तपकिरी, करडा, पिवळा, पांढरा किंवा हिरवा असतो.

मुलतानी मातीमुळे विरंजन कसे होते, हे पूर्णतया समजलेले नाही. तेलातील रंगद्रव्य व इतर मलद्रव्य यांचे मुलतानी मातीने अधिशोषण (अणू वा रेणू पृष्ठभागी धरून ठेवले जाण्याची क्रिया) होते. अशा तऱ्हेने या मातीतून तेल गाळल्यावर रंग वा मलद्रव्य मातीच्या सरंचनेला घट्टपणे चिकटते व अशी माती परत परत वापरता येत नाही.

खडकांचे जागीच अपघटन (रासायनिक क्रियेने रेणूचे तुकडे) होऊन अथवा ज्वालामुखी काचेचे विकाचीभवन (काचमय पोताचे स्फटिकी पोतात रूपांतर होण्याची क्रिया) होऊन जे अवशिष्ट निक्षेप बनतात, त्यांच्यामध्ये मुलतानी माती निर्माण होत असावी. सर्व भूवैज्ञानिक काळांतील निक्षेपात ही माती आढळते. ही जगात सर्वत्र आढळते. मात्र अमेरिका (फ्लॉरिडा, इलिनॉय, जॉर्जिया, टेक्सस, नेव्हाडा व कॅलिफोर्निया), इंग्लड व जपान येथे या मातीचे सर्वांत मोठे साठे आढळले आहेत. भारतामध्ये राजस्थान (बिकानेर व जैसलमीर), मध्ये प्रदेश (कटनी व जबलपूर) आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांत ही माती आढळते. जम्मूतील साळखाला मालेच्या खडकांमध्ये या मातीचा सु. २ मी. जाड थर आढळला आहे.

मुलतानी माती मुख्यत्वे खनिज तेलाच्या शुद्धीकरणासाठी व परिष्करणासाठी (सु. ७०%) तसेच वनस्पतिज तेल, खनिज तेल रसायने, प्राणिज चरबी वगैरेंच्या विरंजनासाठी (सु. १०%) वापरली जाते. हिच्यामुळे वनस्पतिज तेलाचा केवळ रंग जातो, त्याच्या वैशिष्ट्यांत बदल होत नाहीत (उदा., तेलाला अनिष्ट चव वा स्वाद येत नाही). या मातीत जादा प्रमाणात तेल अडकून पडणे योग्य नसते अथवा अडकून पडलेले असे तेल विद्रावकाने (विरघळविणाऱ्या पदार्थाने) अथवा उष्णता संस्करणाने सहज परत मिळविता यावे अशी अपेक्षा असते. या मातीमुळे पाण्यातील मलद्रव्ये, तेलकटपणा व काही सूक्ष्मजंतू निघून जात असल्याने पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणासाठी हिचा वाढत्या प्रमाणात वापर होत आहे. याशिवाय खनिज तेलाच्या विहिरी खणण्यासाठी लागणारा चिखल, कीटकनाशके व पीडकनाशके, रबर, ओतकामाची वाळू, औषधे, सौंदर्यप्रसाधने वगैरेंच्या निर्मितीमध्ये मुलतानी माती वापरली जाते.

पहा : मृत्तिका मृद्-खनिजे.

आगस्ते, र. पां.