ऑनिक्स : खनिज. पांढऱ्या व इतर एखाद्या रंगाचे आलटून पालटून समांतर व सरळ पट्टे असलेल्या अकीकाचे नाव. पांढरे व तांबडे पट्टे असलेल्या प्रकाराला सार्‌डॉनिक्स आणि पांढरे व करडे पट्टे असणाऱ्या प्रकाराला कॅल्सिडॉनिक्स म्हणतात. नैसर्गिक ऑनिक्सातील पट्ट्यांना रंग देता येतात. आत खोदलेल्या किंवा पृष्ठभागांच्या वर आलेल्या उठावाच्या आकृत्या असलेली रत्ने तयार करण्यासाठी, लहान दागिने करण्यासाठी व सजावटीच्या कामासाठी याचा उपयोग होतो. भारत (गुजरातेतील राजपिपळ्याच्या क्षेत्रात), ब्राझील, अरबस्तान इ. प्रदेशांत ऑनिक्साचे चांगले नमुने आढळतात.

पहा : रत्‍ने.

ठाकूर, ना.