भर्तृहरि : संस्कृत साहित्यात ⇨वाक्यपदीय हा ग्रंथ लिहिणारा व्याकरणकार भर्तृहरी आणि शतकत्रयकर्ता भर्तृहरी असे एकाच नावाचे दोन ग्रंथकर्ते होऊन गेल्याचे दिसते. भारतात इ. स. च्या सातव्या शतकात आलेला चिनी प्रवासी इत्सिंग ह्याने भर्तृहरिनामक एका भारतीय विद्वानाचा उल्लेख आपल्या लेखनात केलेला आहे. हा भर्तृहरी बौद्ध धर्माचा पुरस्कर्ता होता आणि आपण भारतात येण्याच्या चाळीस वर्षे आधी ह्या भर्तृहरीचे निधन झाले होते, असे इत्सिंगने म्हटले आहे. इत्सिंगच्या ह्या लेखनाचा काळ इ. स. ६९१ हा असल्यामुळे त्याने उल्लेखिलेल्या ह्या भर्तृहरीचे निधन ६५१ मध्ये झाले असावे. वाक्यपदीय हा ग्रंथ ह्याच भर्तृहरीने लिहीला, असा स्पष्ट उल्लेख इत्सिंगने केलेला आहे. तथापि दिड़नागाच्या (४८०-५४०) त्रैकाल्यपरीक्षेच्या तिबेटी भाषांतरात भर्तृहरीचे काही श्लोक उदधृत केलेले असल्यामुळे चौथ्या शतकाचा शेवट किंवा पाचव्या शतकाची सुरुवात असा त्याचा काळ असावा, असे काही अभ्यासक मानतात. वाक्यपदीयकार भर्तृहरी आणि शतकत्रयकर्ता भर्तृहरी हे एकच असावेत किंवा काय, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि ते एक नसावेत, असे मानण्याकडे विद्वानांचा सर्वसाधारण कल आहे. शतकत्रयात व्याकरणाचे काही अपप्रयोग आलेले आहेत. ते लक्षात घेता, त्याचे कर्तृत्व महावैयाकरण असलेल्या वाक्यपदीयकार भर्तृहरीला देणे अवघड आहे. शिवाय, शतकत्रयातील काही उल्लेखांवरुन त्याचा कर्ता शैव-वेदान्ती असावा, असेही दिसते.

उपर्युक्त वाक्यपदीय ह्या ग्रंथात भाषाशास्त्र, अर्थविचार आणि तत्त्वमीमांसा ह्यांचे सिद्धांत एकत्र गुंफिलेले आहेत. अर्थविचाराला आणि तत्त्वमींमासेला व्याकरणशास्त्राची अंगे मानून कात्यायनाने त्यांना आपल्या वार्त्तिकांत पहिल्यांदा महत्त्व दिले. तथापि त्यांचा विस्तृत ऊहापोह मात्र भर्तृहरीनेच आपल्या वाक्यपदीयात केला. म्हणून संस्कृत व्याकरणाचा पहिला उपलब्ध दर्शनग्रंथ म्हणून वाक्यपदीयाला फार महत्त्व आहे. ह्या ग्रंथाखेरीज वैयाकरण भर्तृहरीचा आज उपलब्ध असलेला दुसरा ग्रंथ महाभाष्यादिपिका किंवा त्रिपदी हा होय. पतंजलीच्या महाभाष्यावरील ही टीका असून ती पहिल्या सात आहनिकांपर्यंत उपलब्ध आहे. भांडारकर प्राच्यविद्यासंशोधन मंदिराच्या वार्षिकांतून ती क्रमशः प्रसिद्ध झालेली आहे (१९६४-६९).

शृंगारशतकाच्या वाड्मयीन एकजिनसीपणावरुन व त्याच्याशी संबद्धअसलेल्या गूढकथांवरुन ते पूर्णतः एकाच कर्त्याचे-अर्थात भर्तृहरीचे-असावे, यात शंका नाही. तथापि परंपरेनुसार नीतिशतक आणि वैराग्यशतक याही कृती भर्तृहरीच्या मानल्या जातात. शतकत्रयातील श्लोक ‘मुक्तक’ या स्वरुपाचे म्हणजे सुटेसुटे असल्याने त्यांची उसनवारी अन्य ग्रंथांत होणे किंवा त्यांत भर पडणे किंवा स्वतः भर्तृहरीनेही एखाद दुसरा श्लोक अन्य ग्रंथांतून घेणे हे अस्वाभाविक नाही.

शृंगारशतक, नीतिशतक आणि वैराग्यशतक या तीन शतकांमध्ये परस्परविरुद्ध अशा बऱ्याच वृत्ती, भावना आणि विचार दिसून येतात. पण तेवढ्यावरुन या रचना भिन्नकर्तृक म्हणता येणार नाहीत, कारण मुक्तकरचनेमध्ये हेही अस्वाभाविक नाही. शिवाय, तो एकाच भर्तृहरीचा भिन्नभन्न काळचा वैयक्तिक आविष्कार असणेही असंभवनीय नाही.

शृंगारशतकाचे कवीने पाच विभाग कल्पिले असून त्यांत प्रणयाचे मोठे रम्य चित्रण केलेले आहे. स्त्रीसौंदर्य, स्त्रियांचे विभ्रम आणि विनयादी गुण, स्त्रीवाचून मनुष्यस्वभावात येणारी रुक्षता, विलोभनीयतेबरोबरच दुःख, मोह यांचेही कारण असणारी स्त्री यांचे कवीने मनोहर वर्णन केले आहे. यानंतर खरा विरक्त आणि विरक्तीचा आव आणणरा दांभिक यांतील भेद विशद करुन संपूर्ण विरक्ती, ईशभक्ती हेच जीवनाचे ध्येय असेल पाहिजे, असे प्रतिपादले आहे. उपसंहारात षड्ऋतूंतील सृष्टिसौंदर्यामुळे प्रणयजीवनातील उल्हास कसा वृद्धिंगत होतो, याचे काव्यमय वर्णन आहे.

नीतिशतक हे दहा ‘पद्धती’मध्ये विभागलेले असून प्रत्येक पद्धतीत दहा श्लोक आहेत. विद्वत्व, स्वाभिमान, शौर्य, द्रव्य, दुर्जननिंदा, सज्जनप्रशंसा, परोपकार, दृढनिश्चय, दैव आणि कर्म यांचे यात परोपरीचे वर्णन आहे. नीतिशतकात वेदान्त, नीतिबोध, धर्मपरता, उद्यमशीलता यांवरील भर सहज आणि स्पष्ट जाणवण्यासारखा आहे. त्यात भर्तृहरी हा ‘जीवनात वावरणारा एक सामान्य माणूस, पण अनुभवाने पोळलेला आणि मतांना धार आलेला एक गंभीर द्रष्टा’ अशा प्रकृतीचा कवी दिसतो. विविध अलंकार, पौराणिक निदर्शने, आशयघनता, खोली, व्यापकता, कळकळ, उपरोध, दैनंदिन जीवनातील उदाहरणे, रोखठोक शैली, अनघड पण हृद्याला भिडणारी शब्दचातुरी यांमुळे सर्वच काव्य अत्यंत रमणीय आणि रसपूर्ण झालेले आहे.

वैराग्यशतकात तृष्णा, सुखोपभोगांच्या नादी लागल्याने होणारी वंचना, याचकवृत्ती, यतिवृत्ती, वैराग्य, भक्ती, ज्ञानसाधना या सर्वांचे अतिशय कळकळीने वर्णन केलेले आहे. चित्ताला स्थैर्य आणि शान्ती लाभावी, यासाठी सगुणोपासना, योगसाधना, ब्रह्यानुभूती ही साधनप्रणाली भर्तृहरीने वैराग्यशतकात आवर्जून उपदेशिलेली आहे.

संदर्भ :  1. Dasgupta, S. N. De, S. K. A History of Sankrit Literature, Classical Perlod, Calcutta, 1962.

            2. lyer K.S. Subramaniya, Blrartrharl, Poona, 1969.

            3. Kosambi, D.D. The Epigrams Attributed to Bhartrihari, Bombay, 1948.

जोशी, शि. द. मंगरुळकर, अरविन्द